नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपला मिळणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास
21-Jan-2025
Total Views |
मुंबई : नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपला मिेळेल, असा विश्वास महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २१ जानेवारी रोजी व्यक्त केला. मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये योग्य पद्धतीने पालकमंत्रीपदाचे वाटप झाले आहे. नाशिक आणि रायगडबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून आल्यावर मार्ग काढतील. एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारसुद्धा आमच्या भूमिका ऐकून घेतील. पुढच्या काळात कुंभ २०२६ आहे. गिरीष महाजन यांनी मागे योग्यपद्धतीने कुंभाचे काम हाताळले. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीष महाजन यांना द्यावे, अशी एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांना आमची मागणी होती. दोन्ही नेते आमची विनंती ऐकतील आणि आग्रह सोडतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "महायुतीचे सरकार चालवताना एका जिल्ह्यात तीन-चार मंत्री असल्यावर कुणालातरी कुठलातरी जिल्हा सांभाळावा लागणार आहे. परंतू, कुठलाही जिल्हा मिळाला तरी आपल्याला तो सांभाळावा लागतो. त्यामुळे हा जिल्हा हवा, तो जिल्हा हवा करण्यापेक्षा महायुती सरकारने जनतेला दिलेली वचने पार पाडण्याकरिता सर्वांना काम करायचे आहे. त्यामुळे कुठला जिल्हा कुणाला मिळाला हे बघण्यापेक्षा ज्यांना जो जिल्हा मिळाला तिथे सरकार म्हणून सामुहिक काम करण्याचा संदेश देऊन पालकमंत्रीपदाची यादी देवेंद्रजींनी जाहीर केली आहे. आपल्या सरकारचे काम आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी सर्वांना काम करायचे आहे," असे ते म्हणाले.
महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणे सोडले!
"महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणे बंद केले आहे. माध्यमे त्यांना ऐकतात आणि नंतर आमच्याकडे येतात. पण महाराष्ट्राने त्यांना ऐकणे सोडले आहे. त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही," असा टोलाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.