संजय राऊत केवळ बोलघेवडेपणा करू शकतात; विकासात्मक काम त्यांच्याकडून होऊ शकत नाही!

भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकरांची टीका

    20-Jan-2025
Total Views |
Pravin Darekar And Raut

मुंबई
: संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची काळजी करावी. कुणाचा उदय होतोय हे पाहण्यापेक्षा आपल्या पक्षाचा अस्त होतोय त्याची काळजी करावी. राऊत केवळ बोलघेवडेपणा करू शकतात. कुठलेही रचनात्मक, विकासात्मक भाष्य त्यांच्याकडून होऊ शकत नाही, हे महाराष्ट्र पाहतोय, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना आमदार दरेकर यांनी राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, आमचे नेतृत्व सक्षम आहे. काही मतभेद, मनभेद निर्माण झाले तर ते आम्ही एकत्रित बसून संपवू. राज्यातील जनतेला या सरकारकडून अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे, याचे भान आणि जाणीव महायुतीतील सर्वांना आहे. संजय राऊतांनी आपल्या पक्षाची काळजी घ्यावी. महाविकास आघाडी विस्कळीत होतेय, त्यांना सुर सापडत नाहीये, त्यांना एका सुरात आणण्याचा प्रयत्न करावा. आपले बघायचे सोडून दुसऱ्याकडे वाकून बघायची गरज नाही, असा टोलाही दरेकरांनी राऊत यांना लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गावावर आणि मातीवर प्रेम आहे. ते अधून मधून गावी जात असतात, असेही दरेकर म्हणाले.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. यावर दरेकर म्हणाले कि, ज्यावेळी एकापेक्षा अनेक पक्षांचे सरकार असते त्यावेळी मंत्री किंवा पालकमंत्री पदाचे वाटप करणे जिकरीचे असते. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक पक्षाचे आमदार असतात, त्याचबरोबर तिन्ही पक्षांना न्याय द्यायचा असतो. अशा परिस्थितीत सुवर्णमध्य काढून मुख्यमंत्री किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. लोकांनी महायुतीला बहुमत दिलंय. कोण मंत्री, पालकमंत्री होणार यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. पक्षाच्या चार भिंतीत बसून, महायुतीत हा विषय सोडवला जावा. रस्त्यावर उतरून महायुतीत विसंवाद आहे, असं चित्र उभं करणं हे महायुती व महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने हिताचे नाही.

तसेच मंत्रीपद मिळाले नाही तर माणुस नाराज होतो, मनासारखे खाते मिळाले नाही तर नाराज होतो, पालकमंत्री व्हावेसे वाटते, पालकमंत्री झालो तर निवडक जिल्हा हवा, असे वाटते. या सर्व न संपणाऱ्या गोष्टी आहेत. पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ आणि परिपक्व नेत्या आहेत. कोणीही नाराज राहणार नाही. लोकांची सेवा सर्वांसाठी महत्वाची आहे आणि महायुतीत एकत्र राहून पुढे जाणे हेच महायुतीच्या दृष्टीने हिताचे असल्याचे दरेकर म्हणाले.