मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vanavasi Krida Pratiyogita) 'राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धा' केवळ पदकं जिंकणे किंवा खेळ खेळण्यापुरता मर्यादित नसून हा कार्यक्रम खेळाडूंमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना आणि आपल्या सर्वांमध्ये एक असल्याची भावना जागृत करणार आहे.", असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी केले.
हे वाचलंत का? : राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धेत यूपीच्या तिरंदाजांचा डंका
'राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धा' छत्तीसगडच्या रायपूर येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत सुमारे ६०० जनजाती मुला-मुलींनी फुटबॉल व तिरंदाजी या खेळात सहभाग घेतला. अंदमान आणि निकोबार पासून संपूर्ण देशातील सुमारे ३० प्रांतातील आदिवासी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तिरंदाजी स्पर्धेत शेजारील देश नेपाळमधील खेळाडूंचा संघही सहभागी झाला होता. छत्तीसगडचे वनमंत्री आणि स्वागत समितीचे अध्यक्ष केदार कश्यप आणि क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री टंकराम वर्मा यांनी यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. समारोप समारंभात झालेल्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यात संथाल परगणा संघाने केरळचा पेनल्टी शूटआऊटमध्ये चार गोलने पराभव करून चॅम्पियन ट्रॉफी जिंकली.
उपस्थितांना संबोधत अतुल जोग पुढे म्हणाले, ही स्पर्धा १९९१ पासून सातत्याने आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा निव्वळ जनजाती खेळाडूंचा समावेश असलेली जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. यापूर्वी भोपाळ येथे झालेल्या स्पर्धेत ३१६ जनजाती तिरंदाजांनी केवळ धनुर्विद्या स्पर्धेत भाग घेऊन गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले होते. खेळाडूंनी नेहमीच कठोर परिश्रम करावे, खेळाशी जोडलेले राहावे आणि सतत सराव करावा, जेणेकरून आगामी काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव लौकिक मिळवून देता येईल.
वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एच.के.नागू यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देताना सांगितले की, खेळाला कोणतीही भाषा नसते, सीमा नसते. क्रीडा प्रतिभा ही खेळाडूची ओळख असते. शारीरिक आरोग्यासोबतच खेळ आपल्याला जीवनसंघर्षासाठीही तयार करतो. वनवासी कल्याण आश्रमतर्फे जनजाती खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंग, अखिल भारतीय क्रीडा प्रमुख फुलसिंग लेपचा, राष्ट्रीय सरचिटणीस योगेश बापट व इतर कार्यकर्ता अधिकारी सुद्धा उपस्थित होते.