केरळमधून जास्तीत जास्त महिला आखाती देश किंवा इतर मुस्लीम देशांमध्ये परिचारिका म्हणून काम करण्यासाठी जातात. त्यापैकीच एक येमेन देशामध्ये परिचारिका म्हणून काम करण्यास गेलेली निमिषा प्रिया. मात्र, तलत महदीचा खून केला, म्हणून येमेनमध्ये निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
केरळमधून जास्तीत जास्त महिला आखाती देश किंवा इतर मुस्लीम देशांमध्ये परिचारिका म्हणून काम करण्यासाठी जातात. त्यापैकीच एक येमेन देशामध्ये परिचारिका म्हणून काम करण्यास गेलेली निमिषा प्रिया. मात्र, तलत महदीचा खून केला, म्हणून येमेनमध्ये निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.केरळच्या मजूर कुटुंबात जन्मलेल्या प्रियाने नर्सिंगचे शिक्षण घेतले. 2008 साली ती येमेनमध्ये नोकरीसाठी गेली. 2011 साली ती भारतात आली आणि तिचा टॉमी थॉमस याच्याशी विवाह झाला. निमिषा आणि टॉमी दोघेही मग येमेनला गेले. त्यांना एक मुलगी झाली. यादरम्यान टॉमीला चांगली नोकरी मिळाली नाही. खर्च भागत नसल्याने मग टॉमी लेकीसकट 2014 साली भारतात परतला. जवळ जवळ आठ वर्षे येमेनमध्ये राहिलेल्या निमिषाला वाटले की, इथे आपण नर्सिंग होम उघडले, तर चांगले चालेल. अर्थार्जन वाढले की, टॉमीला आणि लेकीला पुन्हा येमेनला बोलवू. पण, येमेनच्या नियमाप्रमाणे, परदेशातील व्यक्तींना येमेनमध्ये इस्पितळ उभारायचे असल्यास येमेनच्या नागरिकांना भागीदार म्हणून घ्यावे लागते. त्यामुळे नर्सिंग होम उघडण्यासाठी निमिषाने तलत अब्दो महदी या येमेनी नागरिकाला भागीदार म्हणून सोबत घेतले. नर्सिंग होमसाठी पैसे उभे करण्याची जबाबदारी निमिषाची होती.
पुढील कारवाईसाठी निमिषा 2015 साली तलत अब्दो महदीसोबत केरळमध्ये आली. तलतने निमिषाच्या घरच्यांना विश्वासात घेतले. नर्सिंग होमसाठी 50 लाख रूपये खर्च होणार, असेही सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार निमिषाच्या कुटुंबाने पैसे उभे केले. यानंतर निमिषा तलतसह पुन्हा येमेनला आली. नर्सिंग होम उभे राहिले. काही महिन्यांतच निमिषाच्या मेहनतीने नर्सिंग होम चांगले चालू लागले. मात्र, तलत महदीने निमिषाचा हिस्सा देण्याचे नाकारले. त्याने पारपत्र आणि तिची इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. घरातल्यांच्या सल्ल्यानुसार, निमिषानेे तलत महदीविरोधात येमेन पोलिसांना कळवले, तर तिथे तिलाच तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. तुरुंगातून बाहेर आल्यावर ती पासपोर्ट आणि कागदपत्रे घेण्यासाठी तलतकडे गेली. तेव्हा तिला कळले की, तलत महदीने ती त्याची पत्नी आहे, अशी खोटी कागदपत्रे बनवली आहेत. का तर ‘शरिया’ कायद्यानुसार ती तलतची पत्नी आहे, म्हणून नर्सिंग होमचे आणि निमिषा बाबतचे इतर सर्वाधिकार तलतकडे राहतील.
पारपत्राशिवाय निमिषा भारतात जाऊ शकत नव्हती आणि येमेनमध्ये गृहयुद्ध भडकल्याने भारतातूनही तिचे कुणीही नातेवाईक येमेनला येणे शक्य नव्हते. मग काय, एकट्या पडलेल्या निमिषाचे तलतने लैंगिक, मानसिक शोषण केले. खोट्या कागदपत्रांनुसार तो तिचा पती असल्याने ती याविरोधात कुठेच दाद मागू शकत नव्हती. निमिषाला कळले की, तलतला अमली पदार्थांचे व्यसन होते. नशेचे औषध देऊन त्याला बेशुद्ध करायचे आणि पारपत्र घेऊन भारत गाठायचे, असे तिने ठरवले. ठरल्याप्रमाणे तिने केले. मात्र, औषधाचा डोस जास्त प्रमाणात दिला गेला आणि तलत बेशुद्ध न पडता थेट मेलाच. त्याचा मृत्यू झाल्यामुळे ती घाबरली. मृतदेहाची विल्हेवाट लावून, खून पचवण्याचा तिने प्रयत्न केला. पण, बिंग फुटले. तलतच्या खुनासाठी तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
इस्लामिक देशात ‘शरिया’नुसार ‘ब्लड मनी’ प्रथा आहे. त्यानुसार ज्याचा खून झाला, त्याच्या नातेवाईकांनी खुनी गुन्हेगाराला क्षमा केली, तर त्या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही. ‘ब्लड मनी’ प्रथेनुसार निमिषाला न्याय मिळावा, यासाठी ‘सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन काऊन्सिल’ अंतर्गत केरळचे नागरिक एकवटले आहेत. तलतच्या कुटुंबाने निमिषाला क्षमा करावी, त्या बदल्यात त्यांना पैसे देण्याचे ठरवले आहे. मात्र, अशाप्रकारे फसणारी निमिषा पहिली नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. कितीतरी लोकांना आखाती देशांत गेल्यावर कळले की, तिथे त्यांना गुलाम म्हणून विकले गेले होते. सन्मान तर सोडाच, तिथे जीवाचीही सुरक्षा नव्हती, माणूस म्हणून सगळे जगणे नाकारले होते. कुटुंबासाठी येमेनमध्ये अर्थार्जन करु इच्छिणार्या निमिषासोबत तरी काय झाले होते? सुखी जीवनाचे स्वप्न पाहणार्या निमिषाला इतके भयंकर जगणे नशिबी यावे? परदेशात विशेषत: मुस्लीम देशांमध्ये पैसे कमावण्याची इच्छा असणार्या मुली-महिलांनी निमिषाच्या जीवनाची कथा नव्हे, व्यथा जरूर समजून घ्यावी.