हजारो कंटेनर घेऊन निघालेले महाकाय जहाज समुद्रात लुप्त झाल्याचे, अनेक प्रसंग आपण सिनेमात पाहतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी एक हजार कंटेनरपैकी दहा शिपिंग कंटेनर हे सागरी प्रवासादरम्यान नाहीसे होतात. ‘वर्ल्ड शिपिंग काऊन्सिल’च्या आकडेवारीनुसार, दरवर्षी १ हजार, ४०० कंटेनर हे सागरी प्रवासादरम्यान गहाळ होतात. ही आकडेवारी आज कमी दिसत असली, तरी अब्ज डॉलर्स किमतीचा माल असलेल्या या जहाजांच्या दुर्घटनेकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे.
मागील काही वर्षात, हजारो शिपिंग कंटेनर ओव्हरबोर्डवर कोसळले आहेत. बहुतेक कंटेनर अखेरीस समुद्राच्या तळाशी बुडतात. १९८५ ते २००७ सालापर्यंत कंटेनरसहित सागरी व्यापार, आठपटीने वाढला आणि जगभरात अंदाजे पाच ते सहा दशलक्ष कंटेनर, सातत्याने सागरी वाहतुकीत असतात. ‘वर्ल्ड शिपिंग काऊन्सिल’च्या अहवालानुसार, २०१८ ते २०१९ दरम्यान समुद्रात सरासरी १ हजार, ३८२ कंटेनर गहाळ झाले. वर्ष २०१३ मध्ये ‘एमओएल कम्फर्ट हिंद’ महासागरात बुडाले आणि ४ हजार, २९३ कंटेनर गहाळ झाले. नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान यात आणखी भर पडली. असा अंदाज आहे की, उत्तर पॅसिफिकमध्ये पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये, जवळजवळ तीन हजार कंटेनर गहाळ झाले.
दि. २६ फेब्रुवारी २००४ रोजी सॅन फ्रान्सिस्को खाडीतून लॉस एंजेलिस बंदराकडे जाताना, एम/व्ही मेड तैपेईला वादळाचा सामना करावा लागला. चाळीस फूट उंचीचे १५ शिपिंग कंटेनर ‘मॉन्टेरी बे नॅशनल मरीन सेन्च्युरी’ मध्ये आणि नऊ कंटेनर अभयारण्याच्या दक्षिणेस वाहून गेले. यापैकी एक कंटेनर ‘मॉन्टेरी बे अॅक्वेरियम रिसर्च इन्स्टिट्यूट’ला आढळून आला. लुईसच्या समुद्रकिनार्यावर वाहून गेलेला बराचसा कचरा, नोव्हेंबर २०२० साली ‘वन ओपस’ या मालवाहू जहाजातून हरवलेल्या वस्तूंशी जुळला. चीनहून कॅलिफोर्नियाला जाणार्या प्रवासात, एका जहाजाला जोरदार लाटेची धडक झाली. तेव्हा दोन हजार कंटेनर पॅसिफिक समुद्रात घसरले. या जहाजात एक लाख डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे सायकल हेल्मेट, असंख्य कार्टन क्रॉक्स, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर धोकादायक वस्तू होत्या. ज्यात बॅटरी, इथेनॉल आणि ५४ कंटेनर फटाके होते. संशोधकांनी हजारो मैल अंतरावर असलेल्या पॅसिफिक किनारपट्टीवर कचर्याच्या प्रवाहाचे मॅपिंग केले. ज्यामध्ये लुईसचा समुद्रकिनारा आणि हवाईयन बेटांजवळील लाखो समुद्री पक्ष्यांसाठी राष्ट्रीय वन्यजीव आश्रयस्थान असलेल्या दुर्गम मिडवे अॅटॉलचा समावेश आहे.
जहाजांवरून कंटेनर का पडतात? २०२०-२१च्या नुकसानापूर्वी, ‘वर्ल्ड शिपिंग काऊन्सिल’ने याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला. ‘वर्ल्ड शिपिंग काऊन्सिल’, ‘इंटरनॅशनल चेंबर ऑफ शिपिंग बाल्टिक अॅण्ड इंटरनॅशनल मेरीटाईम काऊन्सिल’ने ‘इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन’च्या ‘मेरीटाईम सेफ्टी कमिटी’ला सांगितले की, “या घटनांना कोणताही एक घटक कारणीभूत नाही, तर याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये वादळी हवामान, जहाजाची रचना आणि कंटेनर कसे ठेवले जात आहेत, कंटेनरची खराबी आणि धातूची क्षमतादेखील महत्वाची असते. याचसोबत, ही जहाजे आणि त्यांच्यावरील सामानाचे आकारन्मान वाढते, तशी त्यांची स्थिरता धोक्यात येते. जेव्हा लाटा एका कोनात जहाजाच्या पुढच्या भागावर आदळतात, तेव्हा पॅरामेट्रिक रोलिंग नावाची घटना घडू शकते. जहाज चालकांचे म्हणणे आहे की, जहाज ऑपरेटर असे सेन्सर बसवण्याचा विचार करत आहेत, जे वादळी नुकसान टाळण्यासाठी समुद्राच्या परिस्थितीबद्दल चेतावणी देऊ शकतात.”
समुद्रात पडणार्या आणि किनार्यावर वाहून जाणार्या कंटेनरची संख्या आज तुलनेने कमी असली, तरी स्थानिक किनारी समुदायांसाठी, सागरी आणि जमिनीवरील प्राण्यांसाठी हे कंटेनर विनाशकारी ठरू शकतात. नवीन नियम, मजबूत अंमलबजावणी आणि सुधारित सुरक्षितता यामुळे यापैकी अनेक घटना घडण्यापासून रोखल्या पाहिजे. मात्र तरीही, काही तुटलेल्या शिपिंग कंटेनरचा वाहून आलेला ढांचा, विनाशकारी आणि महाग असू शकतो. मात्र, ते साफ करण्यासाठी प्रत्यक्षात कोण जबाबदार आहे? याबद्दल वेगवेगळ्या अधिकार क्षेत्रांमध्ये, गोंधळ निर्माण होऊन बचाव कार्यात अडथळा निर्माण होतो. यासाठी जागतिक स्तरावर धोरण आखणे काळाची गरज आहे.