निकोलाय वाविलोव्ह आणि कृषी संग्रहालय

Total Views |
Agricultural

एखादा देश एखाद्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होतो, तेव्हा त्या यशामागे अनेकांचे बहुमोल योगदान असते. शास्त्रज्ञ असो वा शेतकरी, या सर्वांचेच मोल राज्यकर्त्यांना समजले पाहिजे. तसे न झाल्यास, राष्ट्राच्या प्रगतीसाठी ते अहितकारक ठरते. रशियाच्या बाबतीत हे चपखल लागू होते. शास्त्रज्ञांच्या दूरदृष्टीमुळे रशिया अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला, या सत्याचा हा मागोवा...

बायबलच्या जुन्या करारातले म्हणजे ‘ओल्ड टेस्टामेंट’मधले पहिलेच पुस्तक किंवा प्रकरण आहे, ‘जेनेसिस’ म्हणजे उत्पत्ती. जलप्रलय होऊन त्यात सगळे जग बुडून जाणार आहे, अशी सूचना देव नोहा या प्रेषिताला देतो. मग नोहा एका होडीमध्ये जगातल्या सर्व सजीव-निर्जीव गोष्टींचा एक एक नमुना ठेवतो आणि स्वतःही त्या होडीत बसतो. देवाच्या सूचनेनुसार प्रलय होऊन, त्यात सगळे जग बुडून नष्ट होते. नोहा आणि त्याची होडी त्यातल्या सर्व नमुन्यांसकट बचावते. महापुराचे पाणी ओसरल्यावर, नोहा त्या नमुन्यांद्वारे सर्व सृष्टी पुन्हा निर्माण करतो.

लेनिनग्राडच्या ‘ऑल युनियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट ब्रीडिंग’ या संस्थेतल्या शास्त्रज्ञांसमोर, अशीच जणू प्रलयकालीन परिस्थिती उभी होती. हिटलरचा सेनापती जनरल लिब याच्या सेनेने, लेनिनग्राडला सर्व बाजूंनी वेढा घातला होता. रस्ते, रेल्वे, समुद्र, हवाई मार्ग सगळेच नाझी सैन्याने पक्के आवळून धरले होते. हिटलरचा पश्चिम युरोपातल्या ब्रिटन फ्रान्सपेक्षा, पूर्व युरोपवर आणि त्यातही रशियावर भयंकर राग होता. त्याच्या मते पूर्व युरोपातले स्लाव्ह वंशीय लोक पूर्व युरोपीय ज्यू, तार्तार वंशीय लोक ही माणसे नसून पशू होते. त्यामुळे त्या सगळ्यांची वांशिक कत्तल उडवायची, असा त्याचा बेत होता. सेंट पीटर्सबर्ग उर्फ पेट्रोग्राड उर्फ लेनिनग्राड या शहराला, रशियन जनतेच्या मनात अनन्यसाधारण स्थान होते. म्हणूनच ते शहर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाका, असा स्पष्ट आदेश हिटलरने जनरल लिबला दिलेला होता. त्यामुळे लेनिनग्राडचा रसदपुरवठा पूर्ण बंद होता आणि वर उल्लेख केलेल्या संस्थेत जगभरातल्या विविध अन्नधान्याची अडीच लाख रोपे, नमुने म्हणून काळजीपूर्वक जतन करून ठेवली होती. ती खाऊन भूक भागवायची? की देशाच्या पुढच्या काळातल्या कृषी प्रगतीसाठी, रोपे वाचवून स्वतः उपाशी राहायचे?

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे, असे फक्त सांगितले जाते. परंतु, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांचा सगळा ओढा हा कारखानदारीकडे होता. त्यामुळे त्यांच्या १७ वर्षांच्या पंतप्रधान कारकिर्दीत त्यांना नको असलेल्या, पण नाईलाजाने मंत्रिमंडळात घ्यावे लागलेल्या माणसाला कृषिमंत्रिपद दिले जायचे, असे दिसते आणि तरीही एकही माणूस त्या पदावर पूर्ण पाच वर्षे टिकला नाही. ही स्थिती लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यावर थोडी बदलली. शास्त्रीजी आणि त्यांचे कृषिमंत्री सी. सुब्रह्मण्यम् (चिदंबरम् सुब्रह्मण्यम्) यांनी भारतात हरितक्रांती घडवून आणण्याचा निर्धार केला. भारत-पाक युद्ध निर्विवादपणे जिंकल्यावर शास्त्रीजींनी दिलेली, ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा अन्य काँग्रेसवाल्यांप्रमाणे पोकळ घोषणा नव्हती, तर तो एक निर्धार होता. दुर्दैवाने शास्त्रीजी फारच अल्प काळात निधन पावले. परंतु, सुदैवाने त्यांच्या जागी आलेल्या इंदिरा गांधींनी सी. सुब्रह्मण्यम् यांच्या कामात अडथळा न आणता, त्यांना ‘गो अहेड’चा आदेश दिला.

केंद्रीय कृषिमंत्री सी. सुब्रह्मण्यम् यांच्याकडून हिरवी झेंडी मिळताच, ‘इंडियन अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’चे एम.एस.स्वामिनाथन, दिलबागसिंग अठवाल, आत्माराम जोशी आणि इतरही अनेक कृषितज्ज्ञ पुढे सरसावले आणि पंजाब, हरियाणा नि पश्चिम उत्तर प्रदेश एवढ्या भागात तरी ‘हरितक्रांती’ खरोखरच अवतरली. मानकोंब सांबारीवन स्वामिनाथन उर्फ एम. एस. स्वामिनाथन् यांचे सप्टेंबर २०२३ रोजी निधन झाले. कृषी क्षेत्रातील युगप्रवर्तक कामगिरीमुळे त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला, हे आपल्याला माहितच आहे.

आपल्याला साधारणपणे माहीत नसतात किंवा मुद्दामच आपल्यापासून दडवल्या जातात, अशा वरील संदर्भातल्या दोेन गोष्टी - एम. एस. स्वामिनाथन यांच्यावर स्वामी विवेकानंद, रमण महर्षी आणि महात्मा गांधी यांचा प्रभाव होता, तर सी. सुब्रह्मण्यम् हे काँग्रेसी नेते असले, तरी त्यांच्यावर त्यांचे गुरू स्वामी चिद्भवानंद यांचा प्रभाव होता. स्वामी चिद्भवानंद हे स्वामी विवेकानंदांचे गुरूबंधू असणार्‍या स्वामी शिवानंद यांचे शिष्य होते. चिद्भवानंदांनी तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली भागात ‘श्रीरामकृष्ण तपोवनम्’ नावाची संस्था स्थापन करून अगणित सेवा प्रकल्प सुरू केले.

या गोष्टी आपल्यापासून लपवल्या का जातात? तर आपल्या देशातल्या सामाजिक अगर वैज्ञानिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या व्यक्तींची प्रेरणास्थाने, धार्मिक-आध्यात्मिक होती हे सांगणे लेखक-साहित्यिक-पत्रकार यांना आवडत नाही. त्यातही पुन्हा चिद्भवानंद, विवेकानंद, रमण महर्षी हे सगळे हिंदू होते ना! हां, एखाद्याची प्रेरणा मदर तेरेसा असली, तर या लेखकांनी ती गोष्ट तोंड फाटेपर्यंत सांगितली असती.

असो. तर लालबहादूर शास्त्री, सी. सुब्रह्मण्यम् एम. एस. स्वामिनाथन अशा अनेक लोकांमुळे, आपला देश आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.

लेनिनग्राडच्या वेढ्याची गोष्ट सांगताना मध्येच भारताच्या कृषी क्षेत्राबद्दल सांगण्याचा उद्देश एवढाच की, लेनिनग्राडच्या या कृषी संग्रहालयाचे आणि ते निर्माण करणार्‍या निकोलाय वाविलोव्ह या शास्त्रज्ञाचे महत्त्व लक्षात यावे.

स्वतःला शेतकरीपुत्र म्हणवणारे आणि इतरांना ‘भुईमूग जमिनीवर उगवतो की जमिनीखाली? जित्राप या शब्दाचा अर्थ सांगा’ असे त्यांच्या मते अवघड प्रश्न टाकणारे चतुर कृषिमंत्री, आपल्याच देशात असतात. ‘शेती करूच नका. जमिनीचे भूखंड बनवा आणि विका. अन्नधान्य काय, आयात करता येईल’ असा बरसल्ला शेतकर्‍यांना फक्त तेच देऊ शकतात.

जगभरचे शेतीतज्ज्ञ, वैज्ञानिक हे सतत वेगवेगळ्या बियाण्यांचा, त्यांच्या संकरित रोपांचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवता कसे येईल, रोपामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल या प्रयत्नात असतात. ते शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन, सतत वेगवेगळे प्रयोग करून पाहत असतात. निकोलाय वाविलोव्ह असाच एक वैज्ञानिक होता. त्याचा जन्म १८८७ साली रशियात झाला. त्याकाळात रशियावर झारचे राज्य होते. कृषिप्रधान देश असल्यामुळे रशियात वारंवार दुष्काळ पडत असे. शेवटी तज्ज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ आणि जनुक शास्त्रज्ञ असणार्‍या वाविलोव्हने आपले ध्येय ठरवून टाकले, रशियातून दुष्काळ पार हद्दपार झाला पाहिजे. त्यासाठी त्याने गहू, मका आणि कडधान्ये यांचे विविध वाण शोधून काढण्यावर आपले सगळे लक्ष केंद्रित केले.
वाविलोव्ह ३० वर्षांचा असताना रशियात क्रांती झाली आणि बोल्शेव्हिक पक्ष म्हणजेच, व्लादिमीर लेनिनचा साम्यवादी पक्ष सत्तेवर आला. पण, वाविलोव्हवर त्याचा परिणाम झाला नाही. कारण, वाविलोव्ह नास्तिक आहे, हे लेनिनला माहीत होते आणि त्याच्या संशोधनाचे महत्त्व तर लेनिन चांगलेच जाणून होता. त्यामुळे उलट वाविलोव्हला, मॉस्कोतल्या ‘अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स’चे सदस्यत्व देण्यात आले. एवढ्या कमी वयाचा अ‍ॅकेडमीत तो एकमेव सदस्य होता. शिवाय त्याला साम्यवादी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीचे देखील मानद सदस्यत्व देण्यात आले.

वाविलोव्हला लेनिनच्या राजकारणात काडीचाही रस नव्हता. अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे, यावर त्याचे सगळे चित्त एकवटलेले होते. आता सोव्हिएत केंद्रीय कार्यकारिणी सदस्य या नात्याने, त्याने जगभर दौरा केला. प्रथम तो अमेरिकेत गेला. तिथून आफ्रिकेत आणि मग आशिया खंडात आला. जगभरच्या सर्व जुन्या संस्कृती, त्यांच्या शेती करण्याच्या पद्धती, त्यांचे बि-बियाणे, त्यांचे कृषी, जलव्यवस्थापन यांचा त्याने फार बारकाईने अभ्यास केला. गहू या धान्याच्या किती जाती, किती वाण आपल्याला माहिती आहेत? वाविलोव्हला गव्हाच्या तीन हजार जाती, त्यांच्या सगळ्या वैशिष्ट्यांसह माहिती होत्या. त्याच्या मते, आज जगभर प्रचलित असलेल्या अन्नधान्याच्या सर्व जाती मुळात आशिया, आफ्रिकेचा उत्तर किनारा नि युरोपचा दक्षिण किनारा म्हणजेच भूमध्य समुद्राचा काठ आणि दक्षिण अमेरिका इथल्या आहेत. उत्तर अमेरिकेत मुळातले काहीच नाही. केवढे आश्चर्य! कारण, आज सर्व प्रकारच्या अन्नधान्याचे सर्वाधिक उत्पादन अमेरिका हा देश करतो.

असो. तर जगभरच्या विविध प्रकारच्या अन्नधान्याचे बियाणे किंवा रोपे मिळवून, यांचा संग्रह वाविलोव्हने लेनिनग्राडच्या ‘ऑल युनियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट ब्रीडिंग’ या संस्थेत केला. रशियन शेतकर्‍यांना उत्पादन वाढवण्यासाठी इथून मार्गदर्शन केले जात असे.

पण, १९४१ साली वाविलोव्हचे ग्रह फिरले. त्रोफिम लायसेन्को हा वाविलोव्हपेक्षा कनिष्ठ शास्त्रज्ञ , स्टॅलिनच्या कानाशी लागला. स्टॅलिनच्या खास पद्धतीनुसार, वाविलोव्हला पकडून त्याच्यावर ‘राजद्रोह’ केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्याला गोळीच घालणार होते, पण कुठेतरी चक्रे फिरली आणि त्याला जन्मठेपेवर पाठवण्यात झाले. तिथे तो अतिश्रम, उपासमार, हगवण यामुळे आपोआपच मेला.

इकडे ऑक्टोबर १९४१ साली जर्मनांनी लेनिनग्राडला जो वेढा घातला होता, तो जानेवारी १९४४ सालापर्यंत चालू होता. जगाच्या इतिहासात हा वेढा ‘९०० दिवसांचा वेढा’ म्हणून कुख्यात आहे. अगदी काटेकोरपणे सांगायचे, तर हा वेढा ८७२ दिवस चालू होता. दोन्हीकडचे सैनिक किती मेले ते सोडा. पण, उपासमारीने किमान साडेदहा लाख सामान्य नागरिक तडफडून मेले. लोकांनी चामड्याचे पट्टे, चामड्याचे बूट, पाळलेली कुत्री-मांजरी, पक्षी काय वाटेल ते खाल्ले. शेवटी तर शहरात अनेक ठिकाणांहून, नरमांस भक्षणाच्या बातम्या यायला लागल्या. स्टॅलिनचे साम्यवादी कार्यकर्ते लगेच जागे झाले आणि त्यांनी त्या भीषण स्थितीतही, नरमांस भक्षकांना पकडून आणले. ज्यांचे बाप, भाऊ, नवरे, मुलगे युद्धात ठार झालेत, अशा या बिचार्‍या बायका होत्या. स्वतःच्या आणि एखाद-दोन छोट्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर पडलेली प्रेते खाल्ली होती.

अशा भयंकर प्रलयकालीन स्थितीत ‘प्लांट ब्रीडिंग इन्स्टिट्यूट’मधल्या शास्त्रज्ञांसमोर खरा पेच होता. ही अडीच लाख रोपे रोज थोडी थोडी खाऊन स्वतःचा जीव वाचवायचा की, युद्धानंतरच्या भावी पिढीसाठी हे दुर्मीळ वाण जतन करायचे? त्या बहाद्दरांनी दुसरा पर्याय स्वीकारला, त्यामुळे त्यांच्यातले किमान १७ जण उपासमारीने मेले. पण, ती रोपे शिल्लक राहिली.

युुद्धोत्तर काळातल्या सोव्हिएत रशियाने जगाला शीतयुद्धाच्या भीतीने हैराण केले होते ते सोडा, पण अन्नधान्याच्या बाबतीत सोव्हिएत रशिया स्वयंपूर्ण होऊ शकलाा. कारण, ही बचावलेली रोपे. म्हणजे नुसती रोपे नव्हेत, त्यांच्या उत्पादनाचे संपूर्ण जैविक विज्ञान.

सायमन पर्किन या अगदी तरुण ब्रिटिश पत्रकाराने या प्रकरणावर एक पुस्तकच लिहिले आहे. त्याचे नाव आहे, ‘द फर्बिडन गार्डन ऑफ लेनिनग्राड.’

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.