भारतीय वनस्पतींच्या मुळावर आणखी दोन विदेशी प्रजाती; आफ्रिकेतील प्रजाती आल्या भारतात
18-Jan-2025
Total Views |
मुंबई (अक्षय मांडवकर) - भारतीय जंगलांमध्ये काही विदेशी झाडे, झुडूपे आणि वेलींनी आपली पाळेमुळे पसरली असतानाच यामध्ये अजून दोन प्रजातींची भर पडली आहे (exotic plant species). आफ्रिका खंडात आढळणाऱ्या 'हिबिस्कस सिडिफॉर्मिस' या औषधी वनस्पतीची आणि 'कॉन्व्होल्वुलस फॅरिनोसस' या वेलीची भारतामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे (exotic plant species). या प्रजाती अनुक्रमे गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आढळून आल्या आहेत. त्यामुळे भारतीय प्रजातींवर अजून दोन नव्या विदेशी प्रजातींचे आक्रमण झाले आहे. (exotic plant species)
भारतात आयात होणार्या तर्हेतर्हेच्या शेतमालामधून विशिष्ट आणि विदेशी वनस्पती भारतीय जमिनीवर पाय ठेवतात. भारताची माती अशा वनस्पतींना हातपाय पसरायला ओसरी देते. पोषक हवामान लाभल्याने त्या इथल्याच बनतात आणि विक्राळ रूप धारण करतात. यामध्ये रान तुळशीचे प्रकार, रानभेंडी, रानमोडी अशा काही प्रजातींचा समावेश आहे. यामध्ये आता आफ्रिकेतून आलेल्या दोन प्रजातींची भर पडली आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ काझबानू सुमरा, किशन प्रजापती, चिंतन भट्ट आणि पौरव मेहता यांनी 'हिबिस्कस सिडिफॉर्मिस' या वनस्पतीची नोंद गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून केली आहे. तर कोल्हापूरच्या दि न्यू महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे पी.व्ही.सुतार, एस.बी.पाटील, ए.पी.जंगम आणि व्ही.बी. शिंपळे यांनी 'कॉन्व्होल्वुलस फॅरिनोसस' या वेलीची नोंद तामिळनाडू जिल्ह्यातील निलगिरी पर्वतरागांमधून केली आहे.
'हिबिस्कस सिडिफॉर्मिस' ही प्रजात जास्वंद म्हणजेच मालवेसी कुटुबांतील वनस्पती आहे. जगात या कुटुंबामधील वनस्पतीच्या ४३४ प्रजाती आढळतात. भारतात 'हिबिस्कस' या कुळातील दहा प्रजाती आढळतात. 'हिबिस्कस सिडिफॉर्मिस' या प्रजातीचा शोध १८८५ साली आफ्रिकेत लागला होता. आता वनस्पती शास्त्रज्ञांनी ही प्रजात कच्छमधील दोन गावांमध्ये नोंदवली असून याठिकाणी तिचा प्रसार होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. या प्रजातीच्या बिया बहुधा सागरी मालवाहतूकीमधून आल्याची शक्यता वनस्पतीशास्त्रज्ञ चिंतन भट्ट यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही प्रजात पूर्वीपासून या प्रदेशात असू शकते मात्र ती कोणाच्या निदर्शनास न आल्याने तिचा उलगडा न झाल्याचा कयास देखील भट्ट यांनी लावला आहे. 'कॉन्व्होल्वुलस' या कुळाला 'बाइंड वीड' म्हणून ओळखले जाते. जगात 'कॉन्व्होल्वुलस' कुळामध्ये १९० प्रजाती आढळतात. त्यामधील १० या भारतात सापडतात. 'कॉन्व्होल्वुलस फॅरिनोसस' ही प्रजात वेलवर्गीय असून आम्हाला ती उटीमधील रस्त्यालगत दिसल्याची माहिती अक्षय जंगम यांनी दिली. या वेलीवर दिवसा पांढरी फुले उमलतात आणि अजूनतरी ती उटी भागात मोठ्या प्रमाणावर पसरली नसल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.