डोंबिवली : एक सुवाच्य गाव

    17-Jan-2025
Total Views |
Dombivli

‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली (पू) येथे आज शुक्रवार, दि. १७ जानेवारी ते रविवार दि. २६ जानेवारी या कालावधीमध्ये पुस्तक आदान-प्रदान सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने डोंबिवलीच्या वाचनसंस्कृतीचा आढावा घेणारा श्रीकांत पावगी यांचा हा लेख...

१९५३ सालची मे महिन्याची सुटी संपल्यानंतर जून महिन्यात माझा आतेभाऊ श्याम बापटबरोबर मी इगतपुरीच्या रेल्वे मेन्स लायब्ररीमध्ये वाचनासाठी पहिले पाऊल टाकले. तेव्हा ‘दि साप्ताहिक केसरी’चा अंक वाचण्याची गोडी लागली आणि ‘जगात वागायचे कसे’ या पुस्तकाचे दोन भाग वाचल्याचीही आठवण आजही ताजी आहे.

दि. १५ ऑगस्ट आणि दि. १६ ऑगस्ट, १९५७ रोजी मी डोंबिवलीला आलो अन् दोन-तीन दिवसांतच तत्कालीन ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयातील पुस्तके वाचू लागलो. वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्या ‘ययाति’ व ‘दौलत’ कादंबर्‍यांबरोबरच डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची पुस्तके माफक वर्गणीत वाचून काढली. नंतर नगरपालिकेने व १९८३-८४ मध्ये त्याच ग्रंथालयाचे महापालिका ग्रंथालयात रुपांतर केले. गेली काही वर्षे ग्रामदैवत श्रीगणेश मंदिरातर्फे या वाचनालयाचे प्र. के. अत्रे ग्रंथालय व वाचनालय असे रुपांतर झाले असून, मी गेली ६७-६८ वर्षे सदस्य आहे.

१९६४ साली एल्फिस्टन, विल्सन, झेवियर्स, रुईया-पोद्दारमध्ये शिक्षण घेताना, आम्हा डोंबिवलीच्या विद्यार्थ्यांना तेथील ग्रंथालयांमध्ये संदर्भ ग्रंथ उपलब्ध होणे दुरापास्त असल्याने ‘युवक संघ’ या नव्या संस्थेने ‘यंग मेन्स लायब्ररी’च्या इमारतीमध्ये ग्रंथालयाचा मी सभासद झालो. ‘युवक संघा’ने विद्यार्थी सत्कार, रक्तदान, क्रीडास्पर्धा, रंजन प्रबोधन, वसंत व्याख्यानमाला, ‘युवक संघा’चे मुखपत्र प्रकाशन, निधी संकलनासाठी नाट्य प्रयोग इ. उपक्रम उत्साहाने साजरे केले. तत्पूर्वीपासूनच ‘यंग मेन्स लायब्ररी’ ही वाचक चळवळदेखील १९८०च्या आसपास अस्तंगत झाली. मोकाशी, साने-केतकर व गाडगीळ अशा व्यक्ती घरोघर मासिक व नियतकालिके पुरवून आमचा वाचनानंद द्विगुणित करत असत.

१९६५च्या आसपास साईनाथ, फिनिक्स, अभिरुची, योगायोग वाचनालये वाचकांच्या उत्तम प्रतिसादामुळे बहरली, समृद्ध झाली. ‘गुड लंच हॉटेल’ आणि ‘कामथ कंपनी’च्या औषध दुकानांच्यामध्ये एका गाळ्यात छत्रे बाईंच्या वाचनालयाला वाचकाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता. संध्याकाळी कामावरून येणारे वाचक टांगा पकडण्यापूर्वी आधी पुस्तकांची अदलाबदल मोठ्या उत्साहाने करीत असत. सकाळच्या घाईगडबडीत पुस्तकांची निवड करता करता ८.३५ किंवा ९.०१ची लोकल हमखास चुकल्यामुळे कार्यालयात पोहोचायला उशीर होत असे.

विष्णू नगरमधील देशपांडे यांच्या ‘अमृता वाचनालया’बरोबरच ‘आरती प्रकाशना’ने नटश्रेष्ठ दत्ता भट यांच्या ‘झाले मृगजळ आता जलमय’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करून डोंबिवलीचे नाव उज्ज्वल केले. ‘विकास वाचनालया’चे परांजपे, ‘ज्ञानदा ग्रंथ वितरण’चे वाडेकर आणि पत्रकार श्रीकांत टोळ यांचे ‘विकास वाचनालय’ याद्वारे ग्रंथवितरणाबरोबरच सुजाण वाचक निर्माण करण्याचे संस्कार घडवत. ग्रंथालयामध्ये आकर्षक पद्धतीने पुस्तकांची मांडणी करून जाणकार वाचकांचे पुस्तक अभिप्राय सजावटीद्वारे सादर करून वाचकांची अभिरुची, आवड वृद्धिगंत करून जाणकार वाचक निर्माण करीत असत.

‘अभ्युदय प्रतिष्ठान’तर्फे सहकार भांडाराच्या मागील बाजूस ‘नाना ढोबळे स्मृती ग्रंथालय’ थाटले आहे, तर नांदिवलीमधील स्वामी समर्थ मठामध्ये संस्कारक्षम धार्मिक व सांस्कृतिक रुची वाढवणारे ‘समृद्ध वाचनालय’ स्थापन झाले आहे. ‘टिळक नगर शिक्षण मंडळा’चे माजी कार्याध्यक्ष हेमंत टिळक व त्यांच्या शिक्षिका पत्नी सुमित्रा टिळक यांनी आपल्या घरातच विद्यार्थ्यांसाठी एक ग्रंथालय खुले करून दिले. चंद्रशेखर टिळक, विनायक जोशी, अजित अभ्यंकर, अरविंद विंझे यांसारख्या अनेक विद्यार्थ्यांवर वाचनसंस्कार केले. विष्णू नगरमध्ये पोलीस स्थानकाच्या अस्थायी इमारतीमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांच्या मार्गदर्शनखाली, प्रकाश चितळे, प्रा. संध्या टेंबे, ज्योती चितळे यांनी डोंबिवली ग्रंथालयाची स्थापना करून पश्चिमेकडील वाचकांची वाचनभूक भागवली आणि म्हणून ‘डोंबिवली-एक सुवाच्च गाव’ खर्‍या अर्थाने साध्य झाले.

डोंबिवली ‘सुवाच्य गाव’ म्हणून गाजत असताना साहित्य समृद्धीच्या नभांगणात वाचनवेड्या पुंडलिक पै यांचा ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ हा नवतारा अवतरला. कलेकलेने चंद्र वाढतो, या न्यायाने वाचनालयाच्या चार शाखा, ३० हजारांहून अधिक वाचकवर्ग, मराठीबरोबरच, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, कन्नड, मल्याळी इ. भाषांतील चार लाखांहून अधिक पुस्तकांनी वाचकांची अभिरुची संपन्न केली आहे. वेबसाईटद्वारे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या अभिनव संकल्पनेद्वारे ठाणे, मुंबई, नवी मुंबई व पुण्याच्या ३० हजार वाचकांची आवड पै जोपासत आहेत, समृद्ध करीत आहेत. दहा वर्षांपूर्वी म्हणजे दि. १ जानेवारी २०१५ या नववर्ष दिनी एकाच दिवशी १ हजार, २१ वाचक सभासद नोंदणी करून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’चा विक्रम नोंदविला गेला आहे. ज्ञान संपादन व उच्च कारकीर्द गाजवू इच्छिणार्‍या होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘पै फ्रेंड्स’ने २४ तासांची अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. ‘जागतिक पुस्तक दिना’चा एक भाग म्हणून ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ने २०२३ आणि २०२४ मध्ये श्री गणेश मंदिर, फडके रोड येथे पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत ‘बुक स्ट्रीट’ हा आणखी एक स्तुत्य उपक्रम साजरा केला. या उपक्रमाअंतर्गत १७ हजार पुस्तके विनामूल्य वितरित झाली.

पाश्चात्य देशांमधील वाचक, आपआपल्या घरातील वाचून झालेली पुस्तके एका ठिकाणी भेटून अदलाबदल करून घेतात. या अभिनव संकल्पनेचा भारतातील पहिला प्रयोग कार्यान्वित करण्याचा मान ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ने २०१७ साली आयोजित करण्याचा मान मिळवला. या उपक्रमात डोंबिवलीच नव्हे, तर ठाणे, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, नवी मुंबईमधील हजारो वाचकांचा उत्तम सहभाग वाढतच आहे. या विभागातील दीडशेहून अधिक शाळांतील विद्यार्थी, आदान-प्रदानात सहभागी तर होत आहेत, पण नव्या पुस्तकांच्या विक्रीसही त्यांचा प्रतिसाद मिळतो व विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवली जाते.

गेल्या वर्षी झालेल्या आदान-प्रदान उपक्रमाअंतर्गत विज्ञान आणि वैज्ञानिक असा विषय निवडण्यात आला होता. विज्ञानविषयक पुस्तके, लेखकांचे विचार, कट आऊट्स, स्लोगन इ. मांडून मंडप सुशोभित करण्यात आला होता, तर प्रवेशद्वाराजवळ २० हजार पुस्तकांद्वारे भव्य राममंदिर प्रतिकृती सादर करण्यात आली होती.

आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत, बालसंस्कारवर्ग, पुस्तक प्रकाशन समारंभ, संध्याकाळच्या सत्रात नामवंत लेखक-प्रकाशक यांची व्याख्याने, मुलाखती इ. कार्यक्रमांनी रंजन-प्रबोधन होत असते. ‘कल्याण-डोंबिवली महापालिके’च्या सहयोगाने यंदाचा आदान-प्रदान महोत्सव शुक्रवार, दि. १७ जानेवारी ते दि. २६ जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित केला असून उद्घाटन समारंभास उदय सामंत, मंत्री, मराठी भाषा आणि उद्योग महाराष्ट्र राज्य, डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा, रविंद्र चव्हाण, आमदार, डोंबिवली, कार्यकारी अध्यक्ष भाजप, महाराष्ट्र प्रदेश, राजेश मोरे, आमदार, कल्याण ग्रामीण, ऐश्वर्या नारकर , ज्येष्ठ अभिनेत्री, इंदू राणी जाखड, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त लोहमार्ग, गुलाब वझे, अध्यक्ष, आगरी युथ फोरम आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘लायन्स क्लब’चा उत्सव आणि गुलाब वझे यांच्या आगरी महोत्सवाप्रमाणेच पुंडलिक पै यांचा पुस्तक आदान-प्रदान कार्यक्रम आबालवृद्धांनी आपलासा केला आहे.

श्रीकांत पावगी
९९२०८३५४६२