धारावी आकार घेतेयं...

Total Views | 51
 Dharavi

वर्षानुवर्षे तत्कालीन सत्ताधार्‍यांची अनास्था, सरकारी लालफितशाहीचा कारभार आणि स्थानिकांच्या विरोधामुळे ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’ला विलंबाचे ग्रहण लागले. पण, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात या प्रकल्पाने वेग घेतला आहे. धारावीकरांमध्ये गैरसमज, अफवा पसरविणारे अनेक विरोधी गट छुपे अजेंडे राबवित असतानाच, दुसरीकडे जागरूक धारावीकर मात्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या समर्थनार्थ उभे आहेत. उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणार्‍या धारावीकरांना उच्च राहणीमान आणि रोजगाराच्या संधी देणारे विविध उपक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून धारावीत राबविले जात आहेत. तेव्हा, आजच्या लेखातून ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’च्या प्रगतीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा...

धारावीचा पुनर्विकास सिंगापूरच्या धर्तीवर केला जाणार आहे. ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’साठी सिंगापूर हे प्रेरणादायी उदाहरण आहे. आजच्या धारावीसारख्याच झोपडपट्ट्या आणि वस्ती असे १९६० सालच्या दशकात सिंगापूरचे चित्र होते. तेथून सुरुवात करत, सन १९६९ मध्ये स्थापन झालेल्या ‘सिंगापूर गृहविकास मंडळा’ने १२ लाख घरांची उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यातून जागतिक दर्जाच्या एकात्मिक पायाभूत सुविधा आणि एका प्रगतीशील समाजाची निर्मिती झाली. या प्रवासातून मिळालेल्या अनमोल कौशल्य व अनुभवांचा उपयोग करून त्यांचा समावेश धारावीतील पुनर्विकास प्रकल्पात राबवून परिवर्तनीय करायचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.

वर्ष २०२२ नवधारावीच्या निर्मितीचे

धारावीच्या विकासासाठी १९८० साली पहिल्यांदा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव प्रकल्प बारगळला. वर्ष २०२२ मध्ये आलेले महायुती सरकार धारावीकरांसाठी नवी उमेद घेऊन आले. दि. २२ डिसेंबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’साठी निविदेच्या अटी ठरल्या आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले. दि. १३ जुलै, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये धारावी अधिसूचित क्षेत्राअंतर्गत ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’च्या अंमलबजावणीकरिता मुख्य भागीदाराची नियुक्ती करण्यात आली. ‘राज्य सरकार आणि अदानी प्रॉपर्टीज लिमिटेड’च्या भागीदारीसह संयुक्त उपक्रम म्हणून तयार करण्यात आलेला ‘नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड’ अंतर्गत प्रकल्पाचे काम सुरू झाले. ‘नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून ६२० एकरच्या या ‘प्राईम लोकेशन’चे मुंबईच्या आकर्षक व्यवसाय आणि निवासी केंद्रात रूपांतर करण्याची योजना राज्य सरकार आखत आहेत.

धारावीकरांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालयाची सुविधा

मागील पाच दशकांच्या कालावधीत, सिंगापूरमधील अनुभव गाठीशी असलेल्या व्यावसायिकांकडे जे ज्ञानाचे भांडार आहे, त्याचा उपयोग ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त केला जाणार आहे. धारावीतील पुनर्विकास करण्यात येणारे क्षेत्र हे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या अंदाजे तीन-चतुर्थांश आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील दाट लोकवस्ती असलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये उघड्या गटार आणि सामायिक शौचालये असलेल्या झोपडपटट्ट्यांमध्ये राहणार्‍या सुमारे लाखो धारावीकरांना ३५० चौरस फूटांपर्यंतचे सर्व सुविधांनी युक्त असे घर मोफत दिले जाणार आहे. धारावीत आजमितीस अंदाजे दहा लाख नागरिक वास्तव्यास आहेत. निविदेतील अटीशर्तींनुसार, सर्व पात्र आणि अपात्र रहिवासी सदनिकाधारकांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालयासह घर उपलब्ध होणार आहे.

जागतिक तज्ज्ञांचा मास्टरप्लॅन

धारावीमध्ये कपडे आणि चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करणार्‍या हजारो औद्योगिक आणि व्यावसायिक युनिट्सचा समावेश होतो. त्यापैकी अनेकजण जगभरात विकल्या जाणार्‍या मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचे पुरवठादार आहेत, ज्याची उलाढाल लाखो डॉलर्समध्ये आहे. ते स्थानिक आणि जागतिक स्तरावर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी उत्सुक आहेत. हे पाहता व्यवसाय आणि निवासी या दोघांना सामावून घेणारा असा हा पुनर्विकास आराखडा जगप्रसिद्ध शहर नियोजनकार आणि पायाभूत क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती तयार करत आहेत. ‘नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ने (एनएमडीपीएल) जगप्रसिद्ध शहर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील नियोजनकार व तज्ज्ञांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी करत आशियातील सर्वात मोठ्या आणि सर्वात चैतन्यशील वसाहतीच्या पुनर्ररचनेसाठी मोठी झेप घेतली. ‘एनएमडीपीएल’ने या प्रकल्पासाठी प्रसिद्ध वास्तुविशारद ‘हाफीज कॉन्ट्रॅक्टर’ तसेच ‘सासाकी’ ही रचनाकार फर्म आणि ‘बुरो हॅपोल्ड’ या सल्लागार कंपनीसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय, सिंगापूरमधील तज्ज्ञदेखील या प्रकल्पात सहभागी झाले आहेत.

‘सासाकी’ची छाप

अमेरिकेतील ‘सासाकी’ ही प्रसिद्ध आंतरशाखीय रचना फर्म आहे. वास्तुकला, इंटेरिअर डिझाईन, वास्तुकला, नियोजन, शहरी डिझाईन, सिव्हील इंजिनिअरिंग या क्षेत्रात या कंपनीचा हातखंडा आहे. मागील ७० वर्षांपासून ‘सासाकी’ने या क्षेत्रात आपल्या कामाची छाप उमटविली आहे. कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील, अशी शाश्वत रचना तयार करण्यासाठी त्यांची जागतिक स्तरावर ओळख आहे.

‘बुरो हॅपोल्ड’

‘बुरो हॅपोल्ड’ ही ब्रिटनमधील प्रसिद्ध सल्लागार कंपनी आहे. ‘बुरो हॅपोल्ड’ शहरांची पर्यावरणीय आणि सामाजिक ओळख अबाधित ठेवून तेथे सर्जनशील व मूल्याधारित पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

‘हाफिज कॉन्ट्रॅक्टर’

मुंबई हे गगनचुंबी इमारतींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ देशातील इमारतींची वेगळी आखणी करणारे, गगनचुंबी इमारतींची निर्मिती करून मुंबईचे रुपडे पालटणारे आणि डिझाईन क्षेत्रातील प्रकल्पांच्या माध्यमातून देशातील पायाभूत सुविधांना चालना देणारे ‘हाफिझ कॉन्ट्रॅक्टर’ हे धारावीतील पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टरप्लॅन बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

वाहतूक व्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवल्यामुळे रिअल इस्टेटला ‘बूस्ट’

‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’चा परिणाम आजूबाजूच्या रिअल इस्टेट मार्केटवरही दिसून येईल. धारावी हे मुंबईच्या मध्यभागी स्थित आहे. याचसोबत, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) या व्यावसायिक क्षेत्राला लागून आहे. ‘बुलेट ट्रेन’, ‘भूमिगत मेट्रो’, ‘एलिव्हेटेड मेट्रो’ आणि रस्त्यांसह उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी असल्याने धारावीच्या पुनर्विकासाला महत्त्व आहे. याचसोबत धारावीकरांना या पुनर्विकासाचा फायदाच असेल. भविष्यात धारावी हे भारतातील सर्वात महागड्या कार्यालयीन क्षेत्र आणि निवासी इमारती असणारे ठिकाण असेल. क्षमता, उत्कृष्ट स्थान आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईतील विकासकांमध्ये सध्या या प्रकल्पाची चर्चा आहे. धारावी आणि आसपासच्या परिसरात को-वर्किंग स्पेस, रिटेल आऊटलेट्स आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायांमध्ये देखील वाढ होणार आहे. हा परिसर पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ आहे. याशिवाय, वरळी सी लिंकपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. नवी मुंबईत बांधल्या जाणार्‍या नवीन विमानतळाला जोडणार्‍या कोस्टल रोडचाही भाग आहे. धारावीच्या आसपासचा परिसर लक्झरी आणि मध्यम श्रेणीच्या प्रकल्पांसाठी आदर्श ठरु शकतो. अशावेळी धारावीतील पात्र धारावीकरांना एका प्राईम लोकेशनला निवासी आणि व्यावसायिक पुनर्वसन मिळणार असल्याने आता धारावीकरांनाही पुनर्विकासाची आस लागली आहे.

अत्याधुनिक सर्वेक्षण पद्धती

धारावी पुनर्विकासासाठी सर्वेक्षणाला कमला रमण नगर येथून प्रारंभ झाला. प्रत्येक अनौपचारिक सदनिकांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येत आहे. यानंतर संबंधित गल्लीचे लेझर मॅपिंग करण्यात येते. ज्याला ‘लिडार सर्व्हे’ म्हणून ओळखले जाते. त्यानंतर कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी एक प्रशिक्षित टीम घरोघरी जाऊन कागदपत्रे जमा करते. धारावीत आजतागायत अंदाजे सहा लाख घरांवर विशिष्ट क्रमांक देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर तीन लाख नागरिकांचे कागदपत्रे घरोघरी जाऊन जमा करून घेण्यात आले आहेत.

‘धारावी सोशल मिशन’

धारावीकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ‘धारावी सोशल मिशन’च्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ब्युटी थेरपी आणि इतर कोर्सेस, युवक-युवतींसाठी मोबाईल रिपेरिंग कोर्सेस, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावा अशा विविध उपक्रमांसह सामाजिक भान जपणारे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘डीएसएम’च्या माध्यमातून राबवले जात आहेत. उद्योगांना असणारी गरज लक्षात घेऊन त्यानुसार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ‘डीएसएम’कडून केला जात आहे.
आतापर्यंत या उपक्रमातून शेकडो तरुणांनी प्रशिक्षण घेत रोजगाराच्या संधींचा लाभ घेतला आहे. यासाठी धारावीतच ‘धारावी सोशल मिशन’चे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात धारावीकरांची मतं जाणून घेतली जातात. यासोबतच, सर्व प्रशिक्षण धारावीकरांना मोफत उपलब्ध करून दिली जातात. लवकरच धारावीतील उद्योजक होऊ इच्छिणार्‍या तरुणांच्या पाठीशी उभे राहत प्रशिक्षण ते उद्योजक या संपूर्ण प्रवासात ‘धारावी सोशल मिशन’ तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी!

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी!

लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यातर्फे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने अधिकृत घोषणा करण्यात आली. “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहता, आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून, हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच, आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121