घर फिरले की वासेही फिरतात, असे म्हटले जाते. काँग्रेसची आजची दशा त्याहून वेगळी नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर कार्यकर्ता खचलाच, शिवाय नेत्यांनीही नांग्या टाकल्या. या पराभवाचे खापर वरिष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर फोडले. त्यांना तत्काळ पदच्युत करण्याचा अहवालही हायकमांडकडे पाठवला. दिल्लीतूनही पटोलेंना ‘ना-ना’ करण्याची तयारी सुरू झाली. परंतु, अस्थिपंजर झालेल्या प्रदेश काँग्रेसची धुरा सांभाळायला कोणीच पुढे येत नसल्याने हायकमांडचीही कोंडी झाली. ज्येष्ठत्वाचा मान ठेवून बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचारणा झाली. पण, संगमनेरमधील पराभवाचा धक्का पचवता न आलेल्या बाळासाहेबांनी स्पष्ट नकार कळवला. एका नवख्या उमेदवाराकडून आठवेळच्या आमदाराचा पराभव होणे, ही बाब अद्याप त्यांच्या पचनी पडलेली नाही. प्रदेशाध्यक्ष झाल्यास महाराष्ट्रभर ‘पराभूत उमेदवार’ म्हणून हिणवले जाईल, या विचारापोटी त्यांनी माघार घेतली. पृथ्वीराज चव्हाणांबाबत हायकमांड फारशी अनुकूल नव्हती. मात्र, अन्य कोणी ज्येष्ठ नेता तयार होत नसल्याने त्यांच्या गळ्यात घंटा बांधण्याचे ठरले. अध्यक्षांकडून बोहल्यावर चढण्याबाबत फोनही आला. परंतु, पृथ्वीबाबांनी नकार दर्शवला. ना केडर, ना नेत्यांची फौज, ना आर्थिक बळ मिळण्याची शक्यता. त्यात तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. अशा स्थितीत पक्ष चालवायचा कसा, याचा सारासार विचार करून पृथ्वीराज चव्हाणांनी साफ नकार कळवला. त्यामुळे विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत आणि सतेज पाटलांनी सर्वाधिक आनंद व्यक्त केला. पृथ्वीबाबांनी नाही म्हटल्यावर हर्षभरित झालेल्या यशोमतीताईंनी तर प्रदेशाध्यक्ष होण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली. महिलेला या पदावर काम करण्याची संधी मिळाल्यास महाराष्ट्र स्वागत करेल, असा शेराही लावला. त्यामुळे दुखावलेल्या वडेट्टीवारांनी हायकमांडकडे तक्रार केली. आपण याआधी विरोधी पक्षनेते पदावर काम केलेले असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष होण्यास पात्र असल्याचा त्यांचा दावा. मात्र, त्यांच्याआधी सतेज पाटील हे सचिन पायटलांकरवी ‘फिल्डिंग’ लावून मोकळे. अशा हाणामारीच्या स्थितीत नादुरुस्त गाडीचे ‘स्टेअरिंग’ कोण्याच्या हाती द्यावे, असा पेच काँग्रेस हायकमांडसमोर आहे. त्यातून मार्ग निघाला तर ठीक, अन्यथा काँग्रेसची शेकापपेक्षाही वाईट स्थिती ओढवेल!
महाराष्ट्र काँग्रेसचा कारभार सांभाळण्यास ज्येष्ठ तयार नसेल, तरी किमान कनिष्ठ इच्छुक असल्याचे दिसते. पण, मुंबई काँग्रेसचे काय? विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आझाद मैदानाशेजारचे त्यांचे कार्यालय पूर्णतः ओस पडल्यात जमा. ना बैठका होत, ना अध्यक्ष-पदाधिकार्यांच्या गाड्या फिरकत. लवकरच मुंबई पालिकेची निवडणूक होऊ घातली असताना ही मरगळ भवितव्यास घातक. कारण, महायुतीच नव्हे, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असताना, काँग्रेस नेते झोपेतच दिसतात. एव्हाना त्यांनी विभाग स्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अध्यक्ष धारावीच्या बाहेर आणि अन्य पदाधिकारी त्यांच्या विभागाबाहेर पडताना दिसत नाहीत. या स्थितीला केवळ विधानसभा निवडणुकीतील पराभव नव्हे, तर पक्षांतर्गत संघर्षही कारणीभूत. वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडल्यापासून पक्षावर एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या नादात त्यांनी अनेकांना दुखावले. प्रिया दत्त, संजय निरुपम, भाई जगताप, मिलिंद देवरा, अशी अनेक नावे सांगता येतील. भाई जगताप यांची खुर्ची काढून हायकमांडने गायकवाड यांना अध्यक्षपदावर बसवले. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झालेला. भाईंना पुन्हा खुर्चीची लालसा, तर वर्षाताईंना खुर्ची जाण्याची भीती. यावरून सुरू झालेले कुरघोडीचे राजकारण एकमेकांचा राजकीय काटा काढण्यापर्यंत पोहोचले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या दोघांच्या भांडणाला कंटाळून अनेक माजी नगरसेवकांनी महायुतीची वाट धरली. रवी राजा यांच्यासारखा अभ्यासू नेता त्यांना टिकवता आला नाही. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील या स्थितीचा गुप्त अहवाल नसीम खान यांच्या नेतृत्वाखालील काही नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पोहोचवला. त्यात म्हणे वर्षा गायकवाड यांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली. पण, गायकवाड यांना साधी विचारणाही झाली नाही. खर्गे आणि गायकवाड कुटुंबातील जुन्या संबंधांमुळे त्यांनी बहुधा दुर्लक्ष केले असावे. परंतु, पक्षातील अंतर्गत कलह शांत झाला नाही, तर पालिका निवडणुकीआधी मुंबई काँग्रेसची उरली-सुरली ताकदही क्षीण होईल, हे निश्चित.