केंद्रीय स्वास्थ्य योजनेचे ‘वेलनेस सेंटर’ लवकरच ठाण्यात
केंद्र शासनाच्या आजी-माजी कर्मचार्यांना मोफत आरोग्य सेवा
17-Jan-2025
Total Views |
ठाणे : केंद्र शासनाच्या आजी-माजी कर्मचार्यांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही महिन्यात ठाण्यातील चरई येथील ‘एमटीएनएल’मधील जागा (वेलनेस सेंटर) ( Wellness Center ) आरोग्य केंद्रासाठी मंजूर झाली आहे. केंद्र शासनाच्या निवृत्त कर्मचार्यांच्या ‘सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन’ या संघटनेने ठाण्यात ‘सीजीएचएस’चे ‘वेलनेस सेंटर’ (केंद्रीय स्वास्थ्य योजना) सुरू व्हावे, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली होती.
‘सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन,’ ठाणे हे गेली अनेक वर्ष ‘सीजीएचएस’चे ‘वेलनेस सेंटर’ ठाण्यात सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. केंद्र सरकारकडे असोसिएशनचा पाठपुरावा सुरू होता. तर खासदार म्हस्के यांच्याकडे शिष्टमंडळाने चर्चा करीत लवकर हा प्रस्ताव मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय पातळीवर चक्रे फिरली.
‘एमटीएनएल’चे अधिकारी, ‘सीजीएचएस’ अधिकारी व असोसिएशनचे पदाधिकारी यांनी तीन महिन्यांपूर्वी चरईतील जागेची पाहणी केली. त्यानंतर ‘सीजीएचएस’ने याबाबतचा प्रस्ताव ‘एमटीएनएल’कडे पाठवला. ‘एमटीएनएल’ने हा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य खात्याकडे पाठविला. खासदार म्हस्के यांनी दिल्लीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पाठपुरवा करून ठाण्यातील चरई येथील ‘एमटीएनएल’चा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
‘एमटीएनएल’ येथील जागा ही प्रशस्त तीन हजार चौरस फुटात आहे. या जागेपोटी ‘एमटीएनएल’ला केंद्र शासनाकडून खासदार म्हस्के यांनी वार्षिक भाडेही मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे असोसिएशनने अध्यक्ष सुभाष पटवर्धन, सचिव शरद भोळे, उपाध्यक्ष अरुण राऊत, खजिनदार चंद्रकांत कांबळे यांनी खासदार यांची भेट घेऊन आभार मानले.
रेल्वे विभाग सोडून केंद्र सरकारचे सर्व विभाग, कस्टम, आयकर, नेव्ही, बी.एस.एन.एल., एम.टी.एन.एल., एअर इंडिया, पोस्ट आदी सर्व विभाग तसेच संसद सदस्यांना या आरोग्य केंद्राचा मोफत लाभ घेता येणार आहे. सरकार स्वास्थ्य आरोग्य योजनेतर्गत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांचा यात समावेश आहे. या योजनेत सध्याचे कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा समावेश होतो. पात्र कुटुंब सदस्यांमध्ये जोडीदार, आश्रित पालक, २५ वर्षांपर्यंतची आश्रित मुले आणि अविवाहित मुलींचा या योजनेत समावेश आहे, अशी माहिती खासदार म्हस्के यांनी दिली.