मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते १८ लक्ष ५५ हजार रूपयांचा धनादेश प्रदान
17-Jan-2025
Total Views |
मुंबई : मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने नुकसान झालेल्या नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ लक्ष ५५ हजार रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका मालकाला हा धनादेश देण्यात आला. यावेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
२८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई समुद्रात हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई या मासेमारी नौकेला मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती. या धडकेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मासेमारी नौकेचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक परवाना अधिकारी, सागरी पोलीस, बंदर निरीक्षक आणि मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला होता. त्यानुसार रुपये १८ लक्ष ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित जहाज कंपनी आणि अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. टिपरी यांना या नुकसान भरपाईचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.