नाशिकच्या समृद्धीसाठी वाढवण बंदर

बंदर निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा येणार आहे.

    16-Jan-2025
Total Views |

vadhavan nashik
देशातील सर्वांत मोठे बंदर वाढवणमध्ये उभारण्यात येणार आहे. या बंदराशी राज्यातील अधिकाधिक जिल्हे जोडण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन सुरूये. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईनंतर नाशिक हे महाराष्ट्राचे तिसरे औद्योगिक केंद्र आहे. नाशिक शहराचे मुख्य औद्योगिक शहर मुंबई आणि पुणे पासून केवळ २०० किमी अंतरावर आहे. नाशिकमध्ये अनेक सरकारी कंपन्या तसेच उपक्रम आहेत.
नाशिकमधील द्राक्षे युरोप, मध्य पूर्व आणि आशियामध्ये निर्यात केली जातात. जिल्ह्यातील वाईनच्या बाजारपेठेमुळे नाशिकला भारताचे वाईन कॅपिटल असेही म्हटले आहे. संपूर्ण भारतातील ४६ पैकी नाशिकमध्ये २२ वाइनरी आहेत. नाशिकमध्ये कापड उद्योगही आहे. नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अॅण्ड रूरल डेव्हलपमेंटने येवल्यातील पैठणी साडी निर्मितीला क्लस्टर विकासासाठी मोठा हातभार लावला आहे. या पैठणीची निर्यात सुलभ करण्यासाठी, केंद्र सरकारद्वारा एमआयडीसी अंबड याठिकाणी एक कंटेनर फ्रेट स्टेशन सुरु करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आहेत. इगतपुरी-नाशिक-सिन्नर हा दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पात महत्त्वाचा नोड आहे.
नाशिक शहरापासून १६किमी अंतरावर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे विमान निर्मिती क्षेत्र आहे. नाशिकमध्येच भारतीय चलन व सरकारी मुद्रांक छपाई करणारे करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्योरिटी प्रेस आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई-नाशिक हा प्रवास वेगवान होण्यात आता समृद्धी महामार्ग महत्वाची भूमिका बजावणार आहे. फेब्रुवारी महिन्यात समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी दरम्यानचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल. याच मार्गात वाढवण बंदराला जोडणारा हरित मार्ग असण्याची शक्यता आहे.
इगतपुरीतील भरवीर फाटा येथे मुंबई-आग्रा महामार्ग आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहनांना एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर ये-जा करता येते. वाढवण बंदराशी जोडणारा नवीन मार्ग याच भागाशी संलग्न करण्याची योजना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील आखली आहे. भरवीर फाटा हे समृद्धी महामार्गासह नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील वाहनांना वाढवण बंदराकडे ये-जा करण्यासाठीचे महत्वाचे केंद्र ठरेल. ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच अलीकडील भागातून वाढवण बंदरास जोडणाऱ्या नव्या हरित मार्गावर विचार झालाय. या माध्यमातून नाशिकसह उत्तर महारा्ष्ट्राच्या विकासाला वेग मिळणार असल्याचा विश्वास जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी नुकताच आपल्या मुलाखतीतून वक्त केला होता.
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर आणि नाशिक जिल्हा जलदगती मार्गाने जोडण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसारच ‘एमएसआरडीसीकडूनही हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळतोय. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिकमधील कृषी, औद्योगिक उत्पादनांना कमी वेळेत वाढवण बंदराकडे माल पोहोचवणे शक्य होईल. तसेच, यामुळे शेतीमालाचे आणि कृषी उत्पादनाचे नुकसानही टाळता येईल. इतकेच नाहीतर या प्रकल्पामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. पालघर जिल्ह्यानंतर सर्वात जास्त वाढवण बंदराचा फायदा नाशिक जिल्ह्याला होणार आहे.
बंदर निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा येणार आहे. वाढवनमुळे नाशिक ते वाडा दरम्यान अविकसित भागाच्या विकासाला चालना मिळेल. वातानुकुलित वाहनाचा वापर न करता शेतमाल दुबईला आणि इतर देशांत पाठवता येईल. सध्या इतर राज्यांबरोबरच बंगालमध्ये कांदा रस्ते मार्गाने पाठवला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. मात्र हाच कांदा वाढवण बंदरातून पाठवला, तर तो अर्ध्या किमतीत पोहोचेल, असा विश्वास व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी व्यक्त केला.