सेवा परमो धर्मः

    15-Jan-2025   
Total Views | 106


सेवा परमो धर्मः	 
 
‘सेवा हाच धर्म’ या विचाराने, ग्रामीणवासीयांसाठी रुग्णसेवेतून विशेष सेवा पूरवणार्‍या दीपीशा कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉ. दीपाली गोडघाटे यांच्याविषयी..
 
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या असलेल्या डॉ. दीपाली गोडघाटे, गेली 18 वर्षे आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. पैशांपेक्षा सेवा हाच उदात्त हेतू समोर ठेवून , समाजातील विविध वर्गांसाठी त्या कार्य करत आहेत. नुकताच त्यांना ‘सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट’च्या वतीने, ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ प्राप्त झाला. ग्रामीण महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी, ‘दीपीशा फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि या माध्यमातून त्या अविरतपणे ग्रामीण भागातील विविध वर्गासाठी कार्य करत आहेत.
 
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात दि. 4 नोव्हेंबर 1982 रोजी, डॉ. दीपाली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेल्वे मध्ये नोकरीला होते. रेल्वेत असले, तरी त्याकाळी पगार फारसा नव्हता. त्यामुळे आठ-दहा जणांचे कुटुंब चालवणे आणि पाच मुलींना उच्चशिक्षण देणे, तेव्हा सोपे काम नव्हते. मात्र, दीपाली यांच्या आई सौ. पुष्पा गोडघाटे यांचा, दीपाली यांच्या वडीलांना भक्कम आधार होता. गावातीलच एका शाळेत दीपाली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण, तालुक्याच्या ठिकाणी झाले. बारावी नंतर 2000 साली मुंबईत, मेडिकलसाठी प्रवेश घेतला. 2005 साली चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर, ‘शिर्डी साई संस्थान’ येथे एक वर्ष इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी, ‘सिम्बियोस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सायन्स, पुणे’ येथून ‘इमरजेन्सी मेडिकल सर्व्हिसेस’चा कोर्स पूर्ण केला. ठाण्यातील ‘क्रिटिकेअर हॉस्पिटल’मध्ये पहिली नोकरी केल्यानंतर, कळव्यातील ‘प्रमिला हॉस्पिटल’ व पुढे ‘एशियन हार्ट इंस्टिट्यूट बांद्रा’ येथे काम केले. यूएस हेल्थकेअरसाठीही त्यांनी तीन वर्षे काम केले आहे. इतकेच नव्हे, तर ’दुबई केअर संस्था’ तसेच, ’वॉलेंटीअर्स इन यूएई अ‍ॅण्ड वॉलेंटीअर्स ग्लोबली’ सारख्या संस्थांसोबतही काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
 
2015 साली भारतात परतल्यावर, त्यांनी स्वतःचे ‘स्मार्टकेअर’ नावाने डायग्निस्टिक सेंटर सुरू केले. दरम्यान ‘हेल्थ चेकअप कॅम्प’सारखे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. 2021 साली पहिला ट्रॉमा सेंटर सुरु केले. 2022 साली त्यांच्या आईंना कर्करोग झाल्यामुळे, पुढचे तीन वर्षे या आजारामध्ये वेगवेगळे हॉस्पिटल आणि उपचार करण्यात गेले. त्यादरम्यान त्यांना विचार आला की, आपण स्वतः एक परिचित डॉक्टर असूनही आपल्याला जर एवढा त्रास होत असेल, तर ग्रामीण भागातील लोकांना जिथे कुठलीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, अशा लोकांना किती त्रास होत असेल. अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, डॉ. दीपाली यांनी ‘दीपीशा फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि त्यातून पुढे कुठल्याही रुग्णाला उपचारासाठी फिरायची गरज पडणार नाही या उद्देशाने, ‘दीपीशा कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्युट’ची स्थापना केली.
 
जेव्हा ‘स्मार्टकेअर’ नावाने डायग्नोस्टिक सेंटर सुरू केले होते, तेव्हा रक्त तपासणी, डिजिटल एक्स-रे, अल्ट्रा सोनोग्राफी, कलर डॉप्लर, ईसीजी आणि 2 डी इको या मूलभूत सुविधा त्यांनी पुरवण्यास सुरुवात केली. तसेच, ग्रामीण भागासाठी विनामूल्य स्मार्ट हेल्पलाईन क्रमांक देऊन, समाजातील गरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गेल्या पाच-सहा वर्षांत ग्रामीण भागात अनेक मोफत आरोग्य शिबिरे घेऊन, जनमानसात त्यांनी आरोग्याबाबत जनजागृती केली. स्मार्ट केअरच्या पाच शाखा परिसरात जेव्हा सुरू केल्या, तेव्हा शाखांचा व्याप आणि तेथील मनुष्यबळ, रुग्णांना सेवा देताना त्यांनी तडजोडीची भूमिका कधीही घेतली नाही. विशेषतः कोरोना काळात आपले स्मार्ट केअर कायम सुरू ठेवून, तेथील नागरिकांच्या सेवेत त्या तत्पर होत्या. त्यामुळे कोरोना काळात सर्वसामान्यांना जणू डॉ. दीपालींच्या रुपात परमेश्वर दिसला असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.
 
गेल्या 18 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात त्या प्रामाणिकपणे काम करीत आहेत. एक डॉक्टर म्हणून ग्रामीण रुग्णालयापासून ते ‘दीपीशा कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्युट’च्या संचालिका म्हणून, त्यांनी समाजासाठी अविरत कार्य केले आहे. अंथरुणाला खिळलेले रुग्ण, जनजाती बांधव, अपंग यांच्यासाठी सदैव तत्पर सुविधा देण्यावर, डॉ. दिपाली गोडघाटे यांनी आजवर भर दिला आहे. शहरी व ग्रामीण भागात त्यांची आरोग्यसेवा एकाअर्थी सेवाधर्म ठरत आहे.
 
दि. 12 जानेवारी रोजी, नवी मुंबईतील उलवे येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त संपन्न झालेल्या ‘सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट’ आयोजित स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार सोहळ्यात, डॉ. दीपाली गोडघाटे यांना आरोग्य क्षेत्रामधील विशेष कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करण्यासाठी अथकपणे व निरलसपणे कार्य करणार्‍या, डॉ. दीपाली गोडघाटे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा!

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121