सिंधुदुर्गात उडणाऱ्या खारीचे प्रथमच दुर्मीळ दर्शन; 'या' गावात दिसली खार

    15-Jan-2025   
Total Views |
 flying squirrel in sindhudurg
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यामधील जंगलात उडणाऱ्या खारीचे दुर्मीळ दर्शन झाले आहे (flying squirrel in sindhudurg). दि. १४ जानेवारी रोजी वन्यजीव निरीक्षकांना रात्री या दुर्मीळ खारीचे दर्शन झाले (flying squirrel in sindhudurg). 'इंडियन जाईन्ट फ्लाईंग स्क्विरल' या प्रजातीच्या उडणाऱ्या खारीची ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच छायाचित्रित नोंद आहे (flying squirrel in sindhudurg). महाराष्ट्रातील सह्याद्रीत या प्रजातीची अजूनही अधिकृतरित्या शास्त्रीय नोंद करण्यात आलेली नाही. (flying squirrel in sindhudurg)
 
 
 
दक्षिण आशियामध्ये उडणाऱ्या खारीच्या अनेक प्रजाती सापडतात. या प्रदेशामधून उडणाऱ्या खारींच्या एकूण १७ प्रजातींच्या नोंदी आहेत. भारतात यापैकी बहुतेक प्रजाती या पूर्व हिमालय आणि ईशान्य भारतामधील भागात आढळतात, जिथे हिमालय आणि इंडो-मलय या दोन जैवभौगोलिक प्रदेशांचा संगम होता. पश्चिम घाटात 'इंडियन जाईन्ट फ्लाईंग स्क्विरल' आणि 'त्रावणकोर फ्लाईंग स्क्विरल' या दोन प्रजाती आढळतात. त्यापैकी 'इंडियन जाईन्ट फ्लाईंग स्क्विरल' या प्रजातीच्या अधिवासाचा विस्तार हा केरळ, कर्नाटक, गोवा आणि गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्राच्या विचार करावयाचा झाल्यास 'इंडियन जाईन्ट फ्लाईंग स्क्विरल' या प्रजातीची अधिकृत शास्त्रीय नोंद ही मेळघाटच्या जंगलामधून आहे. इतर प्रदेशामधून अधिकृत शास्त्रीय नोंद नाही. अशा परिस्थितीत या प्रजातीचे दर्शन आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे.
 
 
दोडामार्ग तालुक्यातील 'वानोशी फोरेस्ट होम स्टे'च्या रात्र सफारीदरम्यान डाॅ. श्रीकृष्ण मगदूम यांना मंगळवारी रात्री उडणाऱ्या खारीचे दर्शन घडले. रात्र सफारीदरम्यान आंब्याच्या झाडावर आम्हाला एका प्राण्याची हालचाल दिसली. सुरुवात आम्हाला हा प्राणी उदमांजर वाटला. आब्यांचा झाडावर बसून तो मोहोर खात होता. त्यावेळी आम्ही त्याचे छायाचित्रण केले. सफारीनंतर हे छायाचित्रण तज्ज्ञांना दाखवल्यानंतर ही प्रजात 'इंडियन जाईन्ट फ्लाईंग स्क्विरल' या उडणाऱ्या खारीची असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचे डाॅ. मगदूम यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले.
 
 
ही खार कशी उडते
- या खारींना उडणाऱ्या खारी म्हणत असले तरी, त्या हवेवर तरंगत जातात.
- शरीराच्या दोन्ही बाजूंवर पातळ केसाळ त्वचेने त्यांचे हात पाय जोडलेले असतात.
- या प्रजाती प्रामुख्याने वृक्षचर असल्याने दूरच्या फांदीवर किंवा झाडावर जाण्यासाठी हातपाय ताणून त्या हवेत सूर मारतात. अशावेळी पातळ केसाळ त्वचेचा पडदा उघडतो आणि हवेवर तरंगून त्या इच्छित झाडावर पोहोचतात.
- या प्रजाती निशाचर असून झाडांच्या पोकळीत घरटे तयार करतात.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.