मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोंदिया वन विभागातील दासगाव वनपरिक्षेत्रामध्ये आज सकाळी एका नर वाघाचा मृतदेह आढळून आला (tigers died). प्रथमदर्शनी या वाघाचा मृत्यू अज्ञात संसर्गामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे (tigers died). मात्र, नववर्षाच्या गेल्या चौदा दिवसांमध्येच राज्यात सहा वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (tigers died)
गोंदिया वनपरिक्षेत्रामधील कोहका-भानपुर परिसरात आज सकाळी एका वाघाचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी यासंबंधीची माहिती वन विभागाला कळवल्यावर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाघाची पाहणी केल्यानंतर हा वाघ निमवस्यक नर असून तो नागझिऱ्यामधील 'टी-१४' या वाघिणीचा २० महिन्यांचा बछडा असल्याचे लक्षात आले. 'टी-१४' ही वाघीण आपल्या बछड्यांना घेऊन नागझिऱ्याच्या पूर्व भागात राहत होती. काही दिवसांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला निमवस्यक बछडा दुसऱ्या मोठ्या नर वाघाच्या भितीने आईपासून वेगळा झाला होता. त्यानंतर आज सकाळी कोहका-भानपूर परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. या वाघाचे अवयव शाबूत असल्याने त्याची शिकार झाल्याची शक्यता नाही. मात्र, अज्ञात संसर्गामुळे या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याने त्याचे अवयव तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळी गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, विभागीय वनाधिकारी प्रितमसिंग कोडापे, सहा. वनसंरक्षक योगेंद्र सिंह, सचिन डोंगरवार, अपर्णा पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक आणि मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार उपस्थित होते.
१४ दिवसांत ६ वाघांचा मृत्यू
नवीन वर्ष सुरू झाल्याच्या गेल्या १४ दिवसांमध्ये राज्यात सहा वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
- २ जानेवारी, २०२५ रोजी ब्रम्हपूरी वन विभागात सिंदेवाहीजवळील लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. या वाघाचे वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
- ६ जानेवारी, २०२५ रोजी भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचे चार तुकडे आढळून आले होते. शिकाऱ्यांनी रानटी डुकरांची शिकार करण्याकरिता ११ हजार केव्हीच्या विद्युत तारांवर आकोडा टाकला होता. मात्र, त्यात तीन वर्षीय सुमारे दीडशे किलो वजनाची वाघीण अडकली आणि तिचा तडफडून मृत्यू झाला. शिकारी जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा तिथे भलीमोठी वाघीण फासात अडकून मृत पावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी आरोपींची भंभेरी उडाली आणि त्यांनी मद्यप्राशन करून वाघिणीची विल्हेवाट लावण्याकरिता तिचे अक्षरश: चार तुकडे केले. या आरोपींना वन विभागाने अटक केली असून त्यांच्यावर न्यायालयीन खटला सुरू आहे.
- ७ जानेवारी, २०२५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागाअंतर्गत उकणी कोळसा खाण परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या वाघाचे दोन मुख्य दात आणि १२ नख गायब होती. त्यामुळे या वाघाची शिकार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
- ८ जानेवारी, २०२५ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात देवलापार वनपरिक्षेत्रात मादी बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू नैसर्गिक होता.
- ९ जानेवारी, २०२५ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोनमध्ये मादी बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. या वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत होते. वाघांच्या लढाईमध्ये हा मृत्यू झाल्याचे अंदाज वर्तवण्यात आला होता.
- १४ जानेवारी, २०२५ गोंदियातील दासगाव वनपरिक्षेत्रामध्ये नर वाघाचा मृतदेह आढळून आला.