महाकुंभमेळ्यामुळे संघटित होत असलेले हिंदू मन लक्षात घेऊन पूर्वश्रमीचे पापक्षालन करण्याच्या हेतूने, गंगासागर मेळाव्याच्या जाहिराती देत हिंदूंसाठी पश्चिम बंगाल सरकार किती कष्ट घेते हे दाखवण्याचा उद्योग ममता बॅनर्जी यांनी चालवला आहे. मात्र, देशातील समस्त हिंदू संत ‘काय भुललासी वरलिया रंगा’ ही चोखोबांची शिकवण मनात दृढ धरून आहेत.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याची ख्याती! हिंदू समाजाच्या उत्सवांच्या वेळी त्यावर निर्बंध लादून, अल्पसंख्याक समाजास खूश ठेवण्याचा प्रयत्न ममता बनर्जी यांच्याकडून याआधी झाला अनेकदा झाला. विशेषतः दुर्गा पूजेच्यावेळी दुर्गा विसर्जन मिरवणुकावर ममता सरकारने निर्बंध आणले होते. मोहरमच्या मिरवणुका लक्षात घेऊन, दुर्गा विसर्जन मिरवणुकांवर प. बंगाल सरकारने बंधने आणली होती, याचे विस्मरण कोणालाही झालेले नाही. प. बंगालमध्ये प्रभू रामचंद्राच्या मिरवणुका काढण्यासही ममता बॅनर्जी यांनी विरोध केला होता. अल्पसंख्याक समाजास अनेक सवलती घोषित करण्यामध्येही, ममता सरकार आघाडीवर राहिले. पण आता देशातील एकूण बदलते वातावरण लक्षात घेऊन, ममता बॅनर्जी यांनाही आता हिंदू समाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे प्रकर्षाने वाटू लागले आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे, प. बंगालमधील गंगासागर मेळ्यासंदर्भात प. बंगाल सरकारने कालच्या सोमवारी प्रसिद्ध केलेल्या मोठ्या जाहिराती! गंगासागर मेळ्यासाठी आमच्या सरकारने कोणकोणत्या सोयीसुविधा केल्या, याची जंत्रीच, त्या सरकारने आपल्या जाहिरातींमधून सादर केली आहे. या जाहिराती पाहिल्या की, ममता बॅनर्जी यांना उशिरा का होईना, शहाणपण सूचले, असे म्हणता येईल! हिंदू समाजाची उपेक्षा करून चालणार नाही, तशी उपेक्षा करणे महागात पडेल, हेच ममता सरकारने या जाहिरातींद्वारे दाखवून दिले आहे. प्रभू रामचंद्राच्या मिरवणुका, प. बंगालमध्ये काढण्यास विरोध करणार्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारने, सोमवार, दि. १३ जानेवारी या दिवशी देशातील प्रमुख दैनिकांमध्ये दिलेल्या जाहिरातींमध्ये राजा दशरथ, कपिलमुनी, रामायण, महाभारत, रघुवंश यांचा ठळक उल्लेख केला. एवढेच नव्हे, तर ग्रीक आणि रोमन लोकांकडून गंगेचा उल्लेख ‘गंगारीदाई’ असा केला जात असे, तेही आवर्जून लक्षात आणून देण्यात आले. या पवित्र भूमीत देशाच्या कानाकोपर्यातून लाखो श्रद्धाळू भाविक येतात आणि गंगासागर मेळ्यामध्ये सहभागी होतात, याची माहिती सदर जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. गंगासागर मेळ्यासाठी प. बंगाल सरकारने ज्या विविध व्यवस्था केल्या, त्यांची माहिती या जाहिरातींमध्ये देण्यात आली आहे. देशातील विविध वृत्तपत्रांमधून प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या संदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या जाहिराती पाहून, आपणही हिंदू समाजासाठी खूप काही करीत आहोत, असे दाखवून देण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्या सरकारने केल्याचे या जाहिरातींवरून दिसून येत आहे. या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजास दुखावून चालणार नाही, त्या समाजाच्या धार्मिक उपक्रमांसाठी आमचे सरकार खूप काही करीत असल्याचे, या जाहिरातींच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांच्या सरकारने दाखवून दिले आहे. ‘मिलन तीर्थ गंगासागर २०२५’ असा गंगासागर मेळ्याचा उल्लेख जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. विशेष महासागर आरती, सागर प्रवचन केंद्र, गंगासागर मेळा कधीपासून सुरू झाला, या संदर्भातील चर्चासत्र आदी कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आल्याची माहिती, प. बंगाल सरकारच्या या जाहिरातींमधून देण्यात आली आहे. देशभर सर्वत्र कुंभमेळ्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ते लक्षात घेऊन गंगासागर मेळ्याच्या संदर्भात विस्तृत माहिती देऊन, गंगासागर मेळ्यासंदर्भात आमचे सरकारही मागे नाही, हेच या जाहिरातींमधून प. बंगाल सरकारने दाखवून दिले आहे. पण अशा जाहिरातींना भुलून बहुसंख्याक समाज आपल्याकडे वळेल, या भ्रमात ममता सरकारने राहू नये. कोण आपले आणि कोण आपल्या विरोधात आहे, याचा अनुभव हिंदू समाजाने गेल्या काही वर्षांत अनेकदा घेतला आहे. त्यामुळे गंगासागर मेळ्याच्या जाहिराती दिल्याने हिंदू समाजावर आपण जो अन्याय केला, त्या अन्यायाचे परिमार्जन होईल, हिंदू समाज मोठ्या संख्येने आपल्याकडे वळेल, असे ममता बनर्जी सरकारने समजून चालता कामा नये!
बेट द्वारका अतिक्रमणमुक्त होणार!
‘भगवान श्रीकृष्णाची पवित्र भूमी’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या, बेट द्वारकेमध्ये मुस्लीम समाजाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून तेथील बरीच जमीन बळकावली आहे. पण गुजरात सरकारने बेट द्वारका परिसरात अहिंदू समाजाने जी बेकायदेशीर बांधकामे उभारली होती, ती पाडून टाकण्यास प्रारंभ केला आहे. बेट द्वारकेचे पावित्र्य राखण्याच्या हेतूने, सरकारने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये त्या बेटावरील ५२ बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकण्यात आली. बेट द्वारका ही हिंदू समाजाची पवित्र भूमी. पण या बेटावर मुस्लीम समाजाने बेकायदेशीरपणे घरे, दुकाने आणि अन्य धार्मिक बांधकामे केली होती. जणू काही या पवित्र भूमीस या अनधिकृत बांधकामांनी घेरले होते! या पवित्र भूमीचे धार्मिक महत्त्व आणि सांस्कृतिक परंपरा लक्षात घेऊन, गुजरात सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आणि मुस्लिमांनी उभारलेली अतिक्रमणे दूर केली. गुजरातच्या प. किनार्यावर असलेल्या बेट द्वारका येथे भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहे. या तीर्थस्थळास दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. पण या बेट द्वारकावर मुस्लीम समाजाने अतिक्रमण करून जी बांधकामे केली होती, ती पाहून भाविकांची मनेही दुखावली जात होती. पण गुजरात सरकारने ही अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याचा निर्धार केला आणि तो प्रत्यक्ष कृतीतही आणला. सरकारच्या कृतीविरुद्ध काहीजण न्यायालयात गेले आहेत. असे असले तरी, बेट द्वारका ही पवित्र भूमी अतिक्रमण मुक्त करायचीच असा सरकारचा निर्धार आहे. गुजरात सरकारची ही ‘बुलडोझर कारवाई’ केवळ बेट द्वारकेपुरतीच मर्यादित राहणार नाही. सोमनाथ, पोरबंदर आणि कच्छच्या हजारो एकर परिसरात जी अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत, तीही पाडून टाकण्याचे गुजरात सरकारने ठरविले आहे.
रामललाची मूर्ती घडविलेली साधने
अयोध्येमधील भव्य राममंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन एक वर्ष पूर्ण झाले. ही मूर्ती ज्या शिल्पकाराने घडविली, त्याचे नाव अरुण योगीराज. ही राममूर्ती ज्या साधनांचा वापर करून अरुण योगीराज यांनी घडविली, ती साधने अरुण योगीराज यांनी सर्वांच्या प्रदर्शनार्थ आपल्या स्टुडिओमध्ये ठेवली होती. या साधनांमध्ये सोन्याची छिन्नी, चांदीचा हातोडा आदींचा समावेश होता. प्रतिष्ठा द्वादशीचा योग साधून हे प्रदर्शन योजण्यात आले होते. शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामललाची अत्यंत मनोवेधक मूर्ती घडविल्याबद्दल, त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा दगडी पुतळा कोरण्याची जबाबदारी, त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील वाडा मार्गावरील माराडेपाडा येथे उभारण्यात येत आहे. ‘शिवक्रांती प्रतिष्ठान’कडून, या मंदिराची उभारणी केली जात आहे. शिवाजी महाराज यांचा दगडी पुतळा घडविण्याची संधी मला मिळाली आहे, असे शिल्पकार अरुण योगीराज यांनी म्हटले आहे. या मंदिर प्रकल्पाचे भूमिपूजन २०१८ मध्येच झाले होते. पण ‘कोविड’ महामारीमुळे मंदिर उभारणीचे काम लांबणीवर पडले होते. या मंदिरात उभारण्यात येणार्या विविध ४० दालनांमधून, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर सर्व शिवप्रेमी जनतेसाठी ते प्रेरणाकेंद्र ठरेल, असा प्रकल्पाची उभारणी करणार्यांना विश्वास आहे.
९८६९०२०७३२