काश्मीरमधील हिंसाचार हा पाकपुरस्कृत असल्याचा उच्चार लष्करप्रमुखांनी केला आहे. आतापर्यंतच्या दहशतवादी घटनांनी वेळोवेळी ही बाब ठळकपणे मांडली आहे. भारताने दहशतवादाविरोधात राबविलेल्या ठोस उपाययोजना, तसेच काश्मीरच्या विकासासाठी राबविलेले धोरणात्मक निर्णय भारताला बळ देणारे ठरले आहेत.
भारतामधील दहशतवादाचा केंद्रबिंदू पाकिस्तान असल्याचे, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अधोरेखित केले आहे. २०२३ मध्ये भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये मारले गेलेले दहशतवादी हे ६० टक्के पाकी होते, तसेच आजही खोर्यात असलेले ८० टक्के दहशतवादी हे पाकीच आहेत, हे वास्तव त्यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काही महिन्यात, खोर्यात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली असली, तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, पाकिस्तानने गेली काही दशके खोरे धगधगते ठेवले, हेच आजवर वेळोवेळी सिद्ध झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्षांच्या पाठबळाने खोर्यात घुसखोरी घडवून आणली गेली, असा आरोप सुरक्षा यंत्रणांनी केला होता. राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच फुटीरतावादी नेते दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत, असेही सुरक्षा यंत्रणांनी म्हटले होते. भारताला दहशतवादाचा जो धोका आहे, तो मुख्यत्वे पाकिस्तानमुळेच आहे हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानला त्यांनी ‘दहशतवादाचे केंद्र’ असे जे संबोधले आहे, ते योग्य असेच.
काश्मीरमध्ये पाककडून होणार्या दहशतवादी कारवाया तसेच करण्यात येणारी घुसखोरी, हे भारतीय सुरक्षा स्थिरतेसाठी दीर्घकालीन आव्हान राहिले आहे. प्रारंभापासूनच पाकिस्तानने काश्मीरमधील दहशतवादाला प्रोत्साहन दिले आणि त्याची तीव्रता आणि प्रमाण काळानुसार वाढवले. पाकिस्तानने त्यांच्या सुरक्षा धोरणामध्ये, दहशतवादाला एक अस्त्र म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सीमा पार दहशतवादी गटांना वित्तीय तसेच लष्करी समर्थन पुरवणे यांचा समावेश आहे. या दहशतवादी गटांचा वापर करून, पाकिस्तानने खोर्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्याचा थेट फटका खोर्यातील जनतेला तर बसलाच, त्याशिवाय सुरक्षा दलेही प्रदीर्घ काळापासून खोर्यात कार्यरत ठेवावी लागली.
केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी वेळोवेळी सांगितले आहे की, पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया आणि घुसखोरीमुळे काश्मीरमधील शांतता बिघडली आहे. लष्कराने आणि अन्य सुरक्षा दलांनी या दहशतवादावर कठोर प्रहार केले आहेत. तथापि, पाकिस्तानने आगळीक करणे काही थांबवलेले नाही. मात्र, भारताने वेळोवेळी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकचा मुखवटा फाडण्याचे काम केले आहे. त्याशिवाय, ‘दहशतवादाला पाठिंबा देणारा देश’ म्हणून त्याचा वारंवार उल्लेख केला आहे. पाकला जागतिक समुदायासमोर एकटे पाडण्याचे काम भारताने केले आहे.
काश्मीर प्रश्न कधीही सुटू नये अशी काँग्रेसी मानसिकता असल्याने, तेथील वादग्रस्त ‘कलम ३७०’ हटवण्यासाठी काँग्रेसने कधीही राजकीय इच्छाशक्ती दाखवलेली नाही. त्याउलट, खोर्यातील फुटीरतावादी नेत्यांची मनधरणीच काँग्रेसने केली. भाजपने जेव्हा हे वादग्रस्त ‘कलम ३७०’ मागे घेण्याचे संकेत दिले, त्यावेळी याच फुटीरतावादी नेत्यांनी खोरे पेटेल अशी वल्गनाही केली. तथापि, प्रत्यक्षात ते हटवले गेले तेव्हा एक दगडही तेथे पडला नाही. खोर्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच काश्मिरी पंडितांना न्याय देण्यासाठी, हे कलम मागे घेणे अति आवश्यक असेच होते. ते मागे घेतल्यानंतर, तेथील परिस्थितीमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. ‘कलम ३७०’ हटवल्यामुळे जम्मू आणि काश्मीर दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे. या बदलामुळे स्थानिक राजकारणावर विशेषतः कट्टरतावाद आणि दहशतवादावर नियंत्रण मिळवणे, हे तुलनेने सोपे झाले. त्याचवेळी, केंद्र सरकारने काश्मीरमध्ये विविध योजना लागू करण्यास सुरुवात केली. या योजनांमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी, शिक्षण आणि आरोग्य यांचा लाभ घेता येणे शक्य झाले. विकासाच्या गंगोत्रीपासून खोर्यातील जनता वंचित राहिली होती, तिलाही त्याचा लाभ मिळू लागला. त्यामुळेच, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीत सकारात्मक बदल घडले. देशात लागू असलेले कायदे जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू झाले. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तथापि, केंद्र सरकारने तो हाणून पाडला. ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे, भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला ठणकावून सांगितले. फुटीरतावादी नेत्यांकडून दहशतवादाला जे प्रोत्साहन मिळत आहे, त्याला बर्याच अंशी आळा बसला, हे मात्र कोणीही नाकारणार नाही.
पाकने उरी येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर, भारताने थेट सीमेपार जात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्याला ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे म्हटले गेले. या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने पाकचे कंबरडे तर मोडलेच, त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर तो उघडाही पडला. पाक दहशतवादाला सक्रिय प्रोत्साहन देतो, या भारताच्या दाव्याची पुष्टी या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने केली. या कारवाईत सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील काश्मीरमध्ये, दहशतवादी तळावर हल्ले केले. ‘सर्जिकल स्ट्राईक’ने भारतीयांमध्ये एकजुटीची भावनाही निर्माण केली. या कारवाईने, पाकी दहशतवादी गटांना भारताच्या लष्करी क्षमतांनी एक स्पष्ट संदेश देण्याचे काम केले. सर्जिकल तसेच ‘एरियल स्ट्राईक’नंतर पाकला दहशतवादी कारवायांबाबत विचार करण्यास भाग पाडले. आंतरराष्ट्रीय समुदायात भारताने आपल्या सुरक्षा क्षमताही दाखवून दिल्या. अमेरिका, इस्रायलच्या पाठोपाठ ‘दहशतवाद्यांवर कठोर कारवाया करणारा देश’ असाही भारताचा लौकिक प्रस्थापित झाला.
पाकिस्तान आता एकाचवेळी भारत आणि अफगाणिस्तान या दोन आघाड्यांवर लढत आहे. भारताने पाकमधील दहशतवादी तळांवर कारवाई करत त्याचे कंबरडे मोडून काढले असले, तरी पाकची खुमखुमी अद्यापही मिटलेली नाही. तथापि, अफगाणिस्तानशी लढताना तो जेरीला आला आहे. पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करीत असून, त्याच्या लष्करी क्षमतांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. तसेच, दहशतवादाला निधी पुरवण्यावरही त्याला मर्यादा येत आहेत. पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणांनी दीर्घकाळ दहशतवादाचा आधार घेतल्यामुळे, आता त्यांच्या स्थानिक गटांमध्ये गोंधळ आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये, पाकिस्तानच्या आंतरिक सुरक्षेची स्थिती खूप गंभीर असून लष्करी गटांमधील तणावही वाढला आहे. दहशतवादाला समर्थन दिल्याबद्दल, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढत आहे. त्यामुळे त्याला अनेक धोरणात्मक बदल करावे लागले आहेत.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यामुळे, तेथून पाकला असलेला धोका कैक पटींनी वाढला आहे. तालिबानने विविध दहशतवादी गटांना आश्रय दिला असून, हे गट पाकिस्तानवर केव्हाही आक्रमण करतील, अशी परिस्थिती आहे. अफगाणिस्तानच्या सीमेलगत पाकिस्तानमध्ये होणारे दहशतवादी हल्ले वाढले असून, हे हल्ले शक्यतो दहशतवादी गट किंवा तालिबानच्या सहकार्याने केले जात आहेत. त्यामुळे पाकमधील अस्थिरता वाढीस लागली आहे. पाकने संयुक्त राष्ट्र परिषदेचा वापर काश्मीरप्रश्नी अपप्रचार करण्यासाठीच केला. तथापि, भारताने पाकची दुटप्पी भूमिका जगासमोर उघड केली असल्याने, पाकला आता काश्मीरचे तुणतुणे तेथे वाजवता येत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाक आता एकटा पडला असल्याने, तसेच भारताच्या धोरणांना वाढता पाठिंबा मिळत आहे. भारताने शांतता आणि स्थिरतेसाठी घेतलेली ठोस भूमिका,त्याला समर्थन देणारी ठरली आहे. विकासात्मक धोरणांमुळे, काश्मीरला एक नवीन दिशा मिळाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेला समर्थन देण्यात त्याची मोलाची भूमिका असेल.