लोककलेच्या आणि लोककलाकारांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारे प्रा. डॉ आनंद गिरी. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा आढावा...
दिक शाहिरी म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारी शाहिरी आहे. लोककलेची ही परंपरा टिकवली पाहिजे.” दामोदर गिरी त्यांच्या लेकाला आनंद यांना हेच सांगत असत. तेच आनंद म्हणजे, प्रा. डॉ. आनंद गिरी हे महाराष्ट्र शासनाच्या ‘वृद्ध साहित्य व कलावंत मानधन समिती’वर सदस्य आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो वृद्ध लोककलाकारांना त्यांनी शासनाची मदत मिळवून दिली आहे. नुकतीच ‘इंडियन पोलीस मित्र’ या संस्थेच्या प्रमुख सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्रातील लोककलांशी संबंधित ४० जातींवर, १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार जातींवर त्यांचा अभ्यास आहे. लोककला आणि लोककलाकार यांच्या संदर्भात कार्य करण्यासाठी त्यांनी ‘सुरभी, शाहीर लोककला अकादमी’ या दोन संस्थाची स्थापना केली. लोककलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे, समाजामध्ये लोककलेबाबत आणि लोककलाकारांबाबत जागर करणे, लोककला आयामात स्पर्धा आयोजित करणे, लोककलाकारांना आर्थिक आणि इतर सर्वोतोपरी साहाय्य करणे इत्यादी कार्य ते करत असतात. लोककला आणि समाजजीवन यांवर त्यांनी तब्बल २१ पुस्तके लिहिली आहेत. ‘भेदक शाहिरी कलगी तुरा’, ‘पारंपरिक लोककला आणि लोककलावंत’, ‘१२ बलुतेदार ब्रम्हनिष्ठ’, ‘कवी हैबती खंड १ व २’, ‘तुरा सम्राट संभूराज खंड १ व २’, ‘पेशवाईतील लावण्या खंड १ व २’, ‘आनंद यात्री’, ‘लोककला यात्री’, ‘फिरस्ते’ आणि ‘लोककलाउपासक’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
दशनाम पंथी गोस्वामी संप्रदायाचे दामोदर गिरी आणि गंगुबाई हे दाम्पत्य, मुळचे कोल्हापूर पन्हाळ्याजवळील आपटी गावचे. दामोदर मुंबईमध्ये गिरणी कामगार होते. तिथे असताना त्यांनी रात्रशाळेत शिक्षण घेतले. तिथेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या शाहिरीशी त्यांची ओळख झाली. तसे दामोदर हे भेदिक शाहिरी करणारे कलाकार. पुढे ते गावी परतले. शेती करू लागले. गावातत्यांनी किराणामालाचे दुकान टाकले. त्यांचे सुपुत्र आनंद. दामोदर आणि त्यांचे बंधु शामराव, हे भेदिक शाहिरीचे कार्यक्रम करत असत. शाहिरीसंदर्भातले अनेक बारकावे घरात चर्चिले जात. समाजाच्या आध्यात्मिक वारशाबद्दलही मुलांना संस्कार दिले जात असत. गावातल्या ग्रामदेवतेचे पुजारी म्हणूनही, गावात गिरी कुटुंंबाला मान होताच. या सगळ्या धार्मिक संस्कारात आनंद याचे बालपण सुसंस्कारीत झालेे.
६०चे दशक होते. गावात वासुदेव, आराधी गोंधळी, पिंगळा, जोशी तसेच दिमडीवर पोवाडा म्हणणारा दांगट शाहीर यायचे. गावातली लहान मुले, या सगळ्यांच्या पाठीमागे गावभर फिरायची. या सगळ्यांबाबत आनंद यांच्या मनात त्याही वेळी खूप उत्सुकता असे. त्यांचे पारंपरिक कौशल्य, प्रथा-परंपरा आणि एकंदर जीवनशैली याबाबत आनंद यांना अनेक प्रश्न पडत. मात्र, गावागाड्याचे हे सोबती, समाजरचनेतले १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार हे प्राणस्तंभ आहेत, हे त्यांना कळत होते. कारण, अर्थातच त्यांचे वडील दामोदर हे समाजसंस्कृतीचे जाणते होते. बालपणासोबत असलेला शाळेचा उंबरठा ओलांडून, आनंद हे महाविद्यालयात शिक्षण घेऊ लागले. या काळात ते पोवाडा, शाहिरी आणि सोंगी भजन यांमध्ये चांगलेच रूळले. ते कार्यक्रमामध्ये ढोलकीवादनही करू लागले. त्यावेळी त्यांच्या बाबांनी त्यांना सांगितले की, “हे सगळे ठीक आहे, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये तू उच्चशिक्षण घ्यायला हवेस.” बाबांनी त्यांची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ती घटना घडली. हृदयविकाराच्या झटक्याने दामोदर यांचे निधन झाले. गिरी कुटुंंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी आनंद महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षी शिकत होते. कुटुंंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. सकाळी महाविद्यालय, त्यानंतर आईला शेती आणि किराणामालाच्या दुकानात मदत करणे, असा त्यांचा दिनक्रम असे. मात्र, घराची आर्थिक घडी विस्कटली होती. पन्हाळ्यावरून कोल्हापूरला महाविद्यालयात शिकण्यासाठी जावे लागे. त्यावेळी ‘एसटी’चे तिकीट काढण्यासाठीचेही पैसे जुळवणे कठीण जाई. मग आनंद हे घरीच अभ्यास करत, परीक्षेच्या दिवसात महाविद्यालयात जात. कला शाखेतून पदव्युतर शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी ‘बी.एड.’ केले. राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास या तीन विषयांमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. कारण, त्यांचे बाबा म्हणाले होते की, “कोणत्याही परिस्थितीमध्ये तू उच्च शिक्षण घेतलेच पाहिजेस.”
पुढे प्राध्यापक म्हणून नोकरी करताना, त्यांचा हजारो विद्यार्थ्यांशी संपर्क आला. युवकांना लोककलेची व्याप्ती आणि महती सांगण्यासाठी आनंद प्रयत्नशील राहिले. लोककलेसंदर्भात ‘गावगाड्याच्या पाऊलखुणा’, ‘गावकुसाचे सोबती’, ‘ही रात्र शाहिरांची’, ‘शाहिरी परिषद’ असे विविध कार्यक्रम उपक्रम त्यांनी राबवले. लोककलेचे अभ्यासक तसेच एक प्रतिभावान लोककलाकार म्हणून, शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवाच्या प्रमुखपदी चारवेळा काम करण्याचा सन्मान त्यांना मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रशियन महोत्सवामध्ये, लोककला सादर केली. त्यांच्या लोककला अभ्यासामुळे अनेक संस्थांशी ते जोडले गेले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना २००च्यावर पुरस्कार प्राप्त झाले. डॉ. आनंद म्हणतात की, “लोककला संस्कृतीचे वहन करते. त्या लोककलेचा जागर, विलुप्त होत चाललेल्या लोककला परंपरांचे संवर्धन आणि लोककलाकारांच्या सन्मानासाठी काम करत राहणार आहे.” लोककलेच्या सोन्याच्या दिवसांसाठी चंदनासारखे झिजणार्या प्रा. डॉ. आनंद गिरी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
९५९४९६९६३८