क्रीडाविश्व आणि खेळाडूंचे आयुष्य हे कायमच सामान्य जनांसाठी एक विशेष आकर्षण असते. जगात मात्र अनेक ठिकाणी या खेळाडूंना स्पर्धेदरम्यान पायाभूत सुविधांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्वांवर मात करून, जो खेळासाठी आयुष्य वेचतो त्याला काहीच कमी पडत नाही, खेळाडूंच्या जीवनातील घडामोडींचा घेतलेला आढावा...
मराठीत एक म्हण आहे, ‘घरोघरी मातीच्या चुली.’ या म्हणीचा अर्थ असा की, प्रत्येक घरातील प्रश्न जवळपास एकसारखेच असतात. ‘मलेशियन ओपन सुपर १०००’ हे बॅडमिंटनचे विदेशातले आंतरराष्ट्रीय सामने, नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात चालू असतानाची एक घटना आहे. ती या लेखाच्या प्रारंभी बघणार आहोत. म्हणजे, आपल्याला त्या म्हणीचा क्रीडाक्षेत्रातला अर्थ समजून येईल.
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील ‘एक्सियाटा एरिना स्टेडियम’वर, बॅडमिंटनचे सामने सध्या खेळवण्यात येत आहेत. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी आयोजकांची फजिती उडाली होती. कारण, छतगळतीमुळे सामन्यात आलेला व्यत्यय आणि त्यामुळे मॅच पुढे ढकलण्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत असा प्रकार होणे म्हणजे हास्यास्पदच आहे.
भारताचा एच.एस. प्रणॉय आणि कॅनडाचा ब्रायन यांग यांच्यातील ‘मलेशिया ओपन सुपर १०००’च्या पहिल्या फेरीतील सामना, तांत्रिक समस्यांमुळे दोनदा थांबवावा लागला होता. क्वालालंपूर येथील सामन्याचे ठिकाण असलेल्या छतावरून, पाणी गळू लागल्याने तीन क्रमांकावरील सामना स्थगित करण्यात आला.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमधून १६ फेर्यांमधून बाहेर पडल्यानंतर, प्रणॉय पहिल्यांदाच जागतिक सामन्यात खेळत असताना आणि त्याचा प्रतिस्पर्धी यांग हा दुसर्या सामन्यामध्ये जोरदार रॅलीमध्ये व्यस्त असताना, ही घटना घडली. रॅलीच्या पंचांपैकी एकाच्या लक्षात आले की, सामन्याच्या जागेवर पाणी ठिबकते आहे. आयोजकांनी घोषित केले की, तीन क्रमांकावरील सामने स्थगित करण्यात येत आहेत, त्यानंतर पृष्ठभाग कोरडे करण्यासाठी टॉवेल वापरण्यात येत होते.
प्रणॉयने सुरुवातीचा गेम २१-१२ असा जिंकला होता आणि खेळात व्यत्यय आला, तेव्हा दुसर्या गेममध्ये ६-३ने आघाडी घेतली होती. नंतर सामना पुन्हा सुरू झाला असला, तरी छतातून पाणी गळू लागल्याने त्यांचा सामना पुन्हा पुढे ढकलावा लागला. या घटनेमुळे, तीन नंबरच्या कोर्टवर तेव्हा होणार्या उर्वरित सामन्यांच्या वेळेवरही परिणाम झाला. कोर्टवर पाणी जमा झाल्यामुळे अनेकदा ब्रेक घेतल्यावर, अखेर सामना पुढच्या दिवशी जेथून थांबला तेथून पुढे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. छतगळतीमुळे कोर्टवर पाणी पडत असल्याची पहिली तक्रार ही, कॅनडाच्या खेळाडूने केली होती. पण, त्यानंतरही ही मॅच सुरू ठेवण्यात आली. दुसर्यावेळी प्रणॉय रॉयने आक्षेप नोंदवत “पाणी पडणार्या कोर्टवर खेळणे जोखमीचे आहे,” असे सांगितले होते. तत्पूर्वी, याच कोर्टवर खेळताना, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने थायलंडच्या ऑर्निचा जोंगसाथापोर्न आणि सुकिता सुवाचाई यांचा अवघ्या ३० मिनिटामध्ये, २१-१०, २१-१० असा पराभव केला होता. महिला एकेरी खेळाडू आकर्षी कश्यपदेखील, मंगळवारनंतर डेन्मार्कच्या ज्युली दावॉल जेकोबसेन विरुद्ध त्याच कोर्टवर खेळणार होती.
छतातून पाणी गळण्याचा हा असा प्रकार जर आपल्या देशात घडला असता तर! अनेकांनी आरडाओरड करत क्रीडाक्षेत्रात पायाभूत सुविधांचा अभाव आहे, आपल्याकडील सरकारी कारभार असाच असतो, बॅडमिंटन फेडरेशन तसेच मार्केटिंग पार्टनर संथ आहे, अशी सगळीकडे चर्चा दिसायला लागली असती. तथापि, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, पूर्वी अशाच परिस्थितींशीही विविध खेळांना दोन हात करावे लागले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरल प्रॉब्लेम कोणत्याही देशात कधीही होऊ शकतात , याचे हे मलेशियातले ज्वलंत उदाहरण आहे.
‘योनेक्स सनराईज इंडिया ओपन बॅडमिंटन टूर्नामेन्ट’चे यजमानपद यावेळेस भारताकडे आहे. त्या स्पर्धा इंदिरा गांधी स्टेडियममधल्या, के. डी. जाधव इनडोअर स्टेडियममध्ये दि. १४ जानेवारी रोजीपासून होत आहेत. लक्ष्य सेनचे बर्याच कालावधीनंतर पुनरागमन होत असून, पीव्ही सिंधू लग्नानंतर प्रथमच कोर्टवर उतरत आहे. लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधू यांच्या सहभागासहित, २१ सदस्य असलेला भारतीय संघ या स्पर्धेत उतरेल. परदेशात भारतीय खेळाडूंचा मोठा संघ पाठवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, अनेक भारतीय खेळाडूंना अशा आंतरराष्ट्रीय मोठ्या स्पर्धेत सहभागी होता येत नाही. इंडियन ओपनसारख्या स्पर्धेत आपले जास्तीत जास्त खेळाडू प्रेक्षकांना दिसणार असून, अनेक दिग्गज विदेशी खेळाडूंना या स्पर्धेत खेळताना, भारतीय क्रीडा रसिक पाहू शकणार आहेत. बॅडमिंटनचा भारतासाठीचा एक मोठा वर्षारंभ या स्पर्धेने होणार आहे. भारतात बॅडमिंटनचा प्रचार अन् प्रसार होण्यासाठी, ही स्पर्धा मोलाची ठरणार आहे.
आता पुन्हा खेळायला उतरणार्या पीव्ही सिंधू हिच्या विषयी अजून एक वार्ता असून, ती म्हणजे फोर्ब्सच्या यादीनुसार दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू जगातील सर्वाधिक कमाई करणारी महिला शटलर बनली आहे. २०१९ साली सुवर्णासह पाच बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणार्या सिंधूने, २०२४ साली ७.१ दशलक्ष डॉलर्स कमावले. ती यादीत १७व्या क्रमांकावर असून, या कमाईसह सिंधू ही भारतातील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडूदेखील आहे. पीव्ही सिंधूच्या मैदानावरील कमाईच्या आकड्यांमध्ये मूळ वेतन, बोनस, स्टायपेन्ड आणि बक्षीस रक्कम यांचा समावेश होतो, या व्यतिरिक्त अन्य कमाई वेगळीच. आता तर तिच्या आर्थिक कमाईत भर घालायला, व्यकंट दत्ता या पतीच्या रुपाने थोड्या धनाची भर पडली आहे.
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या कमाई पाठोपाठ, भारतीयांचाही सहभाग असलेल्या बुद्धिबळपटूंच्या कमाईवर आपण एक नजर टाकू. या बुद्धिबळपटूंच्या अशा आकडेवारीमध्ये प्रवाहित महसूल, कोचिंग उत्पन्न, देखावा शुल्क, प्रायोजकत्व, रॉयल्टी, सरकारी अनुदान, राष्ट्रीय स्पर्धा, सांघिक स्पर्धा किंवा छोट्या स्पर्धांचा समावेश नाही. बक्षिसे जिंकणे हा बुद्धिबळाच्या परिसंस्थेचा एक भाग आहे!
मागील २०२४ सालच्या १७ खेळाडूंच्या यादीतील ठळक जागतिक स्तरावरचे बुद्धिबळपटू आणि त्यांची कमाई डॉलरमध्ये पाहू :-
- (ग्रॅण्ड मास्टर = जीएम तसेच = डॉलर)
- प्रथम क्रमांकावर या वेळचा विजेता भारताचा जीएम गुकेश डोम्माराजू १५,७७,८४२,
- दुसरा जीएम डिंग लिरेन ११,८३,६००
- चौथा जीएम मॅग्नस कार्लसन ६,३३,३६९,
- नववा जीएम प्रज्ञानंधा रमेशबाबू २,०२,१३६,
- तेरावी भारताची जीएम हम्पी कोनेरू १,२३,४९७
- पंधराव्या स्थानावर भारताचाच जीएम अर्जुन एरिगाईसी १,१९,७६७ आहे.
यावर्षी १७ खेळाडूंपैकी तब्बल १५ खेळाडू हे गेल्या वर्षीचे परिचित चेहरे आहेत. त्यातील हम्पी आणि जीएम व्होलोदार मुर्झिन ही फक्त नवीन नावे आहेत. ज्यांनी २०२४ साली वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकून, त्यांच्या मोठ्या रकमेची कमाई केली.
या नामावली समवेतच आपण दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजीपर्यंतच्या, सर्वकालीन स्पर्धेतील बक्षीस विजेत्या लक्षाधीशांची ही संपूर्ण यादीदेखील बघू.
पीव्ही सिंधूच्या गतवर्षाच्या आर्थिक कमाईबरोबर बातमीत असलेला तिचा विवाह सोहळा वाचल्यावर, यावर्षी नुकताच झालेला एका विदेशी बुद्धिबळपटूचा विवाह सोहळा पाहू.
एका बुद्धिबळाच्या खेळाच्या बळावर आपला चरितार्थ चालवणारा कार्लसन, त्याच्या मैत्रिणीच्या पटावर कधी चेकमेट पत्करून गेला ते त्यालाच कळले नाही. जगात सगळ्यांना कालपर्यंत हरवत आलेला कार्लसन, हा २६ वर्षीय एला व्हिक्टोरिया हिला आपली क्विन बनवून गेला. प्रख्यात जीएम मॅग्नस कार्लसन हा २०२५ सालची सुरुवात, आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यासह २६ वर्षीय एला व्हिक्टोरिया मॅलोनशी लग्न करुन करत आहे. नॉर्वेजियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे लवकरच एका अज्ञात ठिकाणी लग्न करणार आहेत. त्या रिपोर्ट्सनुसार कार्लसनचा दीर्घकाळचा मित्र मॅग्नस बारस्टाड यांच्यामार्फत या बातमीची पुष्टी करण्यात आली आहे.
बुद्धिबळ स्पर्धांपासून जीवन भागीदारीपर्यंत कार्लसन आणि मालोन हे पहिल्यांदा २०२३ सालच्या फेब्रुवारीमध्ये जर्मनीत ‘फ्रीस्टाईल चेस चॅलेंज’ स्पर्धेदरम्यान सार्वजनिकरित्या एकत्र दिसले होते तेव्हापासून ओस्लोमधील चॅम्पियन्स चेस टूर फायनल्स आणि डिसेंबरमध्ये न्यूयॉर्कमधील वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिपसह मॅलोन त्याच्या स्पर्धांमध्ये सतत एकत्र दिसत होते.
सप्टेंबरमध्ये स्पीड चेस चॅम्पियनशिप दरम्यान एका मुलाखतीत, कार्लसनने मॅलोनची उपस्थिती त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे व्यक्त केले, “तिला माझ्यासोबत असणे खूप छान वाटते. ती समजूतदार आणि सपोर्टिव्ह आहे, मी चांगली कामगिरी करत नसल्यास काही विचलित होणे स्वाभाविक आहे.”
एला व्हिक्टोरिया मॅलोन, नॉर्वेजियन आई आणि अमेरिकन वडिलांच्या पोटी जन्मलेली, ओस्लोमध्ये वाढली. परंतु, तिने सिंगापूरमध्ये अनेक वर्षे घालवली, जिथे तिचे कायमस्वरूपी निवासस्थान आहे. बुद्धिबळाविषयी वार्ता देणार्या ‘चेस डॉट कॉम’च्या मुलाखती दरम्यान तिने, बुद्धिबळ विश्वातील तिच्या अनुभवांबद्दल स्पष्टपणे सांगितले, “मला या वेड्या पण गोड बुद्धिबळाच्या जगाचा भाग बनण्याचा आनंद वाटतो.” मॅलोन म्हणाली, “तिने अनेक नवीन मित्र बनवले आहेत. ती कार्लसनच्या वेगवान आणि ब्लिट्झ गेमचे बारकाईने अनुसरण करत असताना, प्रगती समजून घेण्यासाठी ती मूल्यांकन बारवर अवलंबून असल्याचे कबूल केले. कार्लसनला तिचा पाठिंबा अटूट आहे.”
बुद्धिबळ स्टारने सुरुवातीच्या मुलाखतीदरम्यान नॉर्वेपासून दूर जाण्याचा इशारादेखील दिला. “मी नॉर्वेमध्ये पूर्णवेळ राहणार नाही. कारण, माझ्या भावी पत्नी आणि मुलांनी हा दबाव अनुभवावा, असे मला वाटत नाही.” नुकतेच जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असलेल्या ओस्लोच्या बर्फाळ टेकड्यांमध्ये, एका नयनरम्य समारंभात या जोडप्याने लग्नाची शपथ घेतली आहे अशी बातमी आहे.
घरोघरी जशा मातीच्या चुली असतात, तशाच त्या क्रीडा क्षेत्रातही अगदी देशविदेशात आढळलेल्या आपण पाहिल्या. क्रीडाक्षेत्रात उच्च कामगिरी करणार्याला आर्थिक चिंता, लग्नाची व कुटुंबाची चिंता कशी नसते, याचीपण उदाहरणे आपण या लेखात बघितली. म्हणून सगळ्यांनी खेळालाही आपल्या जीवनात वरचे स्थान जरुर देण्याचा आवर्जून विचार करावा.
श्रीपाद पेंडसे
(लेखातील काही चित्रे चेस डॉट कॉमच्या सौजन्याने)
इति!
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४