माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार?
13-Jan-2025
Total Views |
मुंबई : (Prithviraj Chavan) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस वरिष्ठांकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जात आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून याची दखल घेण्यात आली असून त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या नेतृत्वात बदल करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती आहे. परिणामी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदावर पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागू शकते. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.