स तीर्थराजो जयति प्रयागः

    12-Jan-2025
Total Views |
Prayagraj Mahakumbh

प्रयागराजमध्ये होत असलेला, महाकुंभ हा परमेश्वरी कृपा आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणे, म्हणजे मोक्षप्राप्तीच. हा एक धार्मिक विधी नाही, तर आत्मशुद्धी, तपश्चर्या आणि भगवंताशी संपूर्णतः एकरूप होण्याचा अनुपम योग आहे. वेद, उपनिषदे आणि पुराणांमध्ये महाकुंभाचे महत्त्व अनादिकालापासून सांगितले गेले आहेच. महाकुंभ म्हणजे हा परमात्म्याच्या साक्षात्काराचा आणि ईश्वरी तेजाच्या अनुभूतीचा प्रसादच. या महाकुंभाविषयी परंपरेचा घेतलेला हा आढावा...

ग्रहाणां च यथा
सूर्यो नक्षत्राणां यथा शशी।
तीर्थानामुत्तमं तीर्थ प्रयागाख्यमनुत्तमम्॥

ज्याप्रमाणे ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र श्रेष्ठ आहेत त्याप्रमाणे तीर्थांमध्ये प्रयागराज सर्वोत्तम तीर्थ आहे. ज्याप्रमाणे सनातन धर्म अनादि अनंत आहे त्याप्रमाणे प्रयागराज क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे. उत्कृष्ट यज्ञ आणि दानधर्म संपन्नता पाहून, भगवान विष्णु आणि भगवान शिवशंकर आदि देवतांनी, या तीर्थाचे नामकरण ‘प्रयागराज’ केले असा उल्लेख अनेक पुराणात आला आहे.

प्रकृष्टं सर्वयोगभ्यः
प्रयागमिति गीयते।
दृष्ट्वा प्रकृष्टयागेभ्यः
पुष्टेभ्यो दक्षिणादिभिः।
प्रयागमिति तन्नाम कृतं हरिहरादिभिः॥

भारताला विश्वाचे आत्मतत्त्व आणि तीर्थराज प्रयागराज या क्षेत्राला, भारताचे प्राणतत्त्व म्हटले गेले आहे. अरण्य आणि सरिता यांच्या संस्कृतीमध्ये जन्म घेतलेले हजारो-लाखो ऋषी, मुनी, तत्त्वज्ञ, दार्शनिक, ब्रह्मवेत्ते तपस्वी यांच्या तपोभूमीसह पंचतत्त्वाला पल्लवित करणार्‍या तीर्थराज प्रयागराज पुण्यक्षेत्रावर, शतकानुशतके कुंभ, अर्धकुंभ, महाकुंभ, पूर्णकुंभ आणि माघमेळा आयोजित होत असतो. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर स्नान करून, भारताच्या प्राणशक्तीचा हुंकार कुंभमेळ्यातून निनादतो. कुंभमेळा सनातन वैदिक हिंदू धर्मातील महापर्व आहे. जगातील सर्वात मोठ्या उत्सवात कोटी, लाखो श्रद्धाळू भाविक, हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभस्नान करण्यासाठी, ठराविक वर्षांनी एकत्र येतात. यासोबतच कुंभ पर्वाचे आयोजन चार ठिकाणी म्हणजेच, पहिला कुंभ हरिद्वार येथे, त्यानंतर तीन वर्षांनी दुसरा कुंभ प्रयागराज येथे, त्यानंतर तिसरा कुंभ तीन वर्षांनी उज्जैन येथे आणि चौथा कुंभ तीन वर्षांनी नाशिक येथे होतो. क्रमशः चार कुंभ झाल्यावर म्हणजेच बारा वर्षांनी, महाकुंभ प्रयागराज येथे साजरा केला जातो. यासोबतच हरिद्वार आणि प्रयागराज येथे दोन कुंभामध्ये म्हणजे, प्रत्येकी सहा वर्षांनंतर अर्धकुंभ आयोजित करण्यात येतो. प्रत्येक १२ वर्षांनंतर महाकुंभ म्हणजेच, पूर्ण कुंभाचे आयोजन केले जाते. पूर्णकुंभ किंवा महाकुंभ केवळ तीर्थराज प्रयाग येथेच होतो. असे १२ महाकुंभ झाले की, त्यानंतर येणार्‍या कुंभाला पूर्णकुंभ म्हणतात. म्हणजेच, यंदाचा कुंभ हा १४४ वर्षांनंतर येणारा पूर्णकुंभ असून, पृथ्वीवरील मनुष्याच्या जीवनातील पहिला आणि शेवटचाच पूर्णकुंभ असणार आहे.

कुंभाचा पौराणिक इतिहास

दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथेच महाकुंभ का आयोजित केला जातो? कोटी, लाखो हिंदू भाविक, नागा साधू, संन्यासी आणि साधू-संत, कुंभमहापर्वात स्नान करण्यासाठी का येतात? खरं तर, कुंभपर्व पृथ्वीवरील सर्वात मोठे धार्मिक आयोजन आहे. हा असा एक सामाजिक उत्सव आहे, ज्याचे कितीही वर्णन केले, तरी जोपर्यंत आपण ‘याचि देही याचि डोळा’ त्यात प्रत्यक्ष सहभागी होत नाही, तोपर्यंत कुंभातील हर्षोल्लास, तपोनिष्ठ ऋषी मुनी आणि तेथील पवित्र वातावरण याचा केवळ अंदाज बांधू शकतो. असे म्हणतात की, कलियुगात कुंभमेळ्यात जाऊन पवित्र जलस्नान केल्याने, मोक्षदायिनी अलकनंदा मुमुक्षु साधकांवर प्रसन्न होते. महाकुंभ आयोजनाचा संबंध, पुराणातील समुद्रमंथनासोबत आहे. कथेनुसार, महर्षि दुर्वास यांच्या शापामुळे जेव्हा इंद्र आणि देवता शक्तीहीन झाले, तेव्हा दानवांनी देवतांवर आक्रमण करून त्यांना पराजित केले. या घटनेनंतर समस्त देवता भगवान विष्णुंजवळ पोहोचले. सगळा वृत्तांत कथन ऐकल्यानंतर, श्रीहरी विष्णुने देव आणि दैत्य यांना मिळून क्षीरसागराचे मंथन करून, त्यातून अमृत काढण्याचा सल्ला दिला. श्रीहरी विष्णुंच्या या सल्ल्यानंतर, देवदानव संधी झाली आणि समुद्रमंथन करण्याबाबत योजना आखली गेली. समुद्रमंथनातून अमृतकुंभ निघाल्यावर देवांचा इशारा मिळताच, इंद्र पुत्र ‘जयंत’ अमृतकलश घेऊन आकाशातून उडू लागला. या अचानक घडलेल्या घडामोडीनंतर दैत्य गुरू शुक्राचार्य यांच्या आदेशानुसार, दानवांनी अमृतकुंभ प्राप्त करण्यासाठी जयंताचा पाठलाग केला. सतत पाठलाग आणि अमृत प्राप्त करण्याची लालसा, यामुळे वाटेतच दानवांनी जयंताला पकडले आणि अमृतकुंभावर अधिकार प्राप्त करण्यासाठी देव आणि दानव यांच्यात, बारा दिवस भयंकर युद्ध झाले. कथेनुसार या युद्धात पृथ्वीवरील चार क्षेत्रात, अमृतकुंभातून अमृतबिंदू पडले होते. ज्यातील पहिला बिंदू प्रयागराज, दुसरा शिवनगरी हरिद्वार, तिसरा उज्जैन आणि चौथा अमृतकण नाशिक येथे पडला. याच पौराणिक कारणाने कुंभमेळ्याचे आयोजन या चार पवित्र क्षेत्रात केले जाते. देवतांचे बारा दिवस म्हणजे, मनुष्याचे बारा वर्ष असतात. म्हणूनच, कुंभदेखील बारा होतात. यातील चार कुंभ पृथ्वीवर आणि आठ कुंभ देवलोकात होतात, अशी मान्यता आहे. पृथ्वीवरील कुंभमेळ्याचा उगम आठव्या शतकातील महान तत्त्वज्ञानी आदी शंकराचार्य परंपरेत आहे.

कुंभ आयोजन-ज्योतिष गणना

धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार, कुंभमेळ्याची आयोजन तिथी खगोलीय ग्रहस्थितीनुसार ठरते. ज्यात सूर्य आणि बृहस्पति यांचे योगदान असते. सूर्य देव आणि देवगुरू बृहस्पति हे एका राशीतून दुसर्‍या राशीत जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा कुंभमेळ्याचे स्थान आणि तिथी यांची निवड केली जाते. यानुसार, जेव्हा सूर्य मेष राशी आणि बृहस्पति कुंभ राशीत असतो, तेव्हा कुंभमेळा हरिद्वार येथे साजरा करतात. ज्यावर्षी बृहस्पति वृषभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीत राहतो, तेव्हा हा महोत्सव प्रयागराज क्षेत्रात आयोजित करण्यात येतो. बृहस्पति आणि सूर्य यांचा सिंह राशीत प्रवेश होतो, तेव्हा महाकुंभ मेळा महाराष्ट्रातील नाशिक येथे साजरा केला जातो. यासोबतच बृहस्पति, सूर्य आणि चंद्र हे तिन्ही कर्क राशीत प्रवेश करीत असल्यास आणि तेव्हा अमावस्या असल्यास, तेव्हाही कुंभ नाशिक येथेच होतो. बृहस्पति सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करीत असल्यास, उज्जैन येथे कुंभ आयोजन होते. सूर्य सिंह राशीत प्रवेश करीत असल्यास, मध्यप्रदेशातील उज्जैन क्षेत्रात कुंभ होतो आणि ‘सिंहस्थ’ या नावाने ओळखला जातो. पौराणिक कथेनुसार अमृतकलशातील अमृताचे चार बिंदू पृथ्वीवर जिथे पडले, त्या ठिकाणी अमृतबिंदूला नदीचे रूप प्राप्त झाले. या चार पवित्र नद्या म्हणजे, हरिद्वारमधील पुण्यसलीला गंगा, नाशिकमधील गोदावरी, प्रयागराजमधील संगमतीर्थ म्हणजेच गंगा, यमुना व सरस्वती आणि उज्जैन येथे क्षिप्रा नदी. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी आणि क्षिप्रा या नद्यांमध्ये, कुंभपर्व काळात स्नान करणार्‍या सर्वांचे कष्ट आणि दुःख दूर होऊन जीवन मंगलमय होते, अशी श्रद्धा आहे.

पुराणातील दाखले

स्कंद पुराणातील उल्लेखानुसार, भारतातील समस्त पवित्र नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहित होतात. मात्र, क्षिप्रा नदी उत्तरगामी आहे. कुर्म पुराणानुसार, कुंभस्नान केल्याने समस्त पापांचा विनाश होतो, मनोवांछित फल प्राप्त होते आणि मनुष्याला देवलोक प्राप्त होतो. भविष्य पुराणानुसार, कुंभस्नानाने स्व स्वरुप पुण्य आणि मोक्ष प्राप्ती होते. कुंभ, महाकुंभ, अर्धकुंभ आणि सिंहस्थ कुंभ या पर्वकाळात, पवित्र नद्यांमधील जल औषधिकृत व अमृतमय होते, अशी मान्यता आहे. यामुळेच अंतरात्म्याच्या शुद्धिकरिता, पवित्र स्नान करण्यासाठी देशविदेशातून लाखो भाविक येतात. आध्यात्मिक दृष्टीने कुंभपर्व काळातील ग्रहस्थिती एकाग्रता आणि ध्यान साधनेसाठी सर्वोत्तम असते. भारताची प्राणशक्ती धर्म आहे. असेतू हिमाचलमध्ये वसलेल्या भारतातील समस्त जनतेच्या रोमारोमात, धर्मरुपी प्राणाचा अनाहत नाद कायम असतो. भारताचा मुलाधार वेदजनित धर्म आहे. समस्त राग, लोभ, अहंकार, मोह, मद, मत्सर, विद्वेष आपसातील मतभेद यांना विसरून, एका पुण्यक्षेत्रात एक लक्ष्य एक उद्देश आणि एक ध्येय घेऊन सामील होणारे भाविक हीच भारताची अंतरनिहित प्राणशक्ती आहे. अनादि काळापासून आपल्याला असे दिसते की, कुंभक्षेत्रातील हे एकत्रीकरण कोणत्याही दिग्विजयी राजाची राजधानी नव्हे, कोणतीही वाणिज्य-ऐश्वर्यशाली नगरी नव्हे, तर हे स्थान पवित्र तीर्थक्षेत्र समूह-गया, काशी, पुरी, प्रयागराज, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, अयोध्या, वृंदावन, मथुरा, द्वारका, हरिद्वार, नाशिक, उज्जैन हेच राहिले आहे. कुंभाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कुंभाचे वेळापत्रक कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय कारणांनी ठरत नाही. कुंभाचा उद्देशदेखील समस्यांची मीमांसापूर्ती नाही. एक उदात्त संकल्प आणि व्यापक दृष्टिकोन असलेल्या कुंभाचे ध्येय, व्यष्टी आणि समष्टी, जीवनाला उच्चादर्शी परमवैभवी सिंहासनावर सुप्रतिष्ठित करणे आहे. धर्मधारणेच्या अमृत संजीवनीचे शिंपण करून, समाज आणि राष्ट्रीय जीवनातील प्रत्येक स्तराला देव-देश-धर्म या त्रिवेणीने संचारित करून शाश्वत विश्वकल्याण साधणे, हेच तर भारताचे ईश्वरप्रदत्त कर्तव्य आहे.

प्रयागराज पूर्णकुंभ २०२५

तीर्थराज प्रयागराजचा उल्लेख पद्मपुराणात आला आहे. पाच योजन विस्तीर्ण पसरलेल्या प्रयागक्षेत्रात आपला प्रवेश होताच, प्रत्येक पावलावर अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते.

पञ्चयोजन विस्तीर्ण प्रयागस्य तु मण्डलम्।
प्रविष्टस्यैव तद् भूयावश्वमेधः
पदे-पदे॥ (पद्मपुराण - ४०)

प्रजापिता भगवान ब्रह्मा यांनी, यज्ञ केलेल्या स्थानावर वेदी निर्माण केली, त्या चार वेदी म्हणजे प्रथम-कुरुक्षेत्र, द्वितीय-प्रयागराज, तृतीय-गया आणि चतुर्थ-पुष्कर. प्रयागराज क्षेत्रात, तपस्वी मुनींच्या उपस्थितीमुळे पावन झालेले तापस वन आहे. याच तापस वनांचा राजा म्हणजे अक्षयवट. आजही शतकानुशतके स्थितप्रज्ञ अचल अक्षय आहे.

आदिवटः समाख्यातः कल्पान्ते अपि च दृश्यते।
शेते विष्णुर्यस्य पत्रे अतो अयमव्ययः स्मृतः॥

अशा या पुण्यपावन प्रयागराज नगरीत २०२५ सालचा पूर्णकुंभ मेळा आयोजित असून, पौष पौर्णिमा मकरसंक्राती दि. १३ जानेवारी २०२५ रोजीपासून, महाशिवरात्री दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजीपर्यंत पर्व काळ आहे. या पर्वकाळात स्नान, जप, तप, दान आदींचे महत्त्व आहे. संगम तटावर समस्त देवीदेवता, ऋषी मुनींसह स्नान करायला येत असल्याने, त्रिवेणी स्नानाचे महत्त्व आहे.

न यत्र योगाचरणप्रतीक्षा न यत्र यज्ञेष्टिविशिष्टदीक्षा।
न तारकज्ञानगुरोरपेक्षा स तीर्थराजो जयति प्रयागः ॥
चिरं निवासं न समीक्षते यो ह्युदारचित्तः प्रददाति च क्रमात् ।
यः कल्पिताथांर्श्च ददाति पुंसः स तीर्थराजो जयति प्रयागः ॥

तीर्थराज प्रयाग यास धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्दिक पुरुषार्थाचा प्रदाता म्हटले गेले आहे. हिंदू संस्कृतीत, मोक्षाची संकल्पना जन्म-मृत्यूच्या सततच्या चक्रातून मुक्तता म्हणून केली गेली आहे. मान्यतेनुसार, प्रयागराज येथील कुंभ कल्पवासात दान आणि पुण्यसंग्रह एकत्रित केल्याने, माणूस ८४ लाख जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो.

हरित कुंभ-एक थाली-एक थैला

जगभरातील १०० देशातून ४० कोटी भविक या भव्य पूर्ण कुंभास भेट देतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे विविध प्रकारे प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महाकुंभ काळात एकदा वापरून फेकण्याचे म्हणजेच ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ प्रकारचे पोलिथीन वापरले गेल्यास, अंदाजे रोज १ हजार, २०० टन प्लास्टिक ग्लास व प्लेटचा कचरा निर्माण होईल. कोट्यावधी टन स्वरूपातील हा कचरा घातक ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विचार परिवाराने, ‘एक थाळी, एक थैली‘ हा उपक्रम नियोजित केला आहे. या उपक्रमात, स्टीलच्या थाळ्या, कापडाच्या पिशव्या दानस्वरूपात देणे किंवा निधी स्वरूपात सहभाग देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाचे स्वरूप बघता, आजवरचा सर्वात विशालकाय हरित कुंभ म्हणून या पूर्णकुंभाची नोंद होणार आहे. आपली सनातन संस्कृती चिरपुरातन नित्यनूतन असल्याची ग्वाही, त्यानिमित्ताने जगाला देता येणार आहे.

भारताचे परमलक्ष्य

दररोज भारतातील हजारो नर-नारी, आबालवृद्ध हे तीर्थदर्शन, साधूदर्शन, पुण्यार्जन आणि धर्मलाभ यासाठी, पवित्र कर्म करतात. सांसारिक हानी, आत्मीय स्वजनांचा विरोध तसेच, आपत्ती आणि आर्तनाद यांची सर्वथा उपेक्षा करून, अत्यंत व्याकुलभावाने भारतीय समाज तीर्थयात्रा करतात. भारतीय लोक धर्मासाठी सर्वस्व अर्पण करू शकतात आणि करतातही. धर्मासाठी घर, संसार, आत्मीय स्वजन, सुख, उपभोग, साधन आदि आकर्षणाचा त्याग आणि आसक्तीची उपेक्षा करणार्‍या, भारतीय समाजाची मूळ प्रकृती त्यागाची आहे. भारताचा मूलमंत्र त्याग आहे. भारतवासी या त्याग मंत्राला जाणतात, मानतात आणि विश्वासाने त्याचे पालन करतात. आपापले सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील आचारनुष्ठान करतानादेखील, त्यांच्या ठायी एकच भाव असतो तो म्हणजे, ‘त्यागेकैनेके अमृत्वमानशु:’ अर्थात एकमात्र त्यागानेच अमृत्व प्राप्ती होते. याच त्यागभावनेचा अनुभव घेण्याचे उपादान, म्हणजे कुंभपर्व होय. कुंभपर्व हे भारतीय संस्कृती, सामंजस्य, समरसता आणि परंपरा यांच्या विराट मिलनाचा महोत्सव आहे. ज्ञान, चेतना आणि वैचारिक परस्पर मंथन ही कुंभमेळ्याची फलश्रुती आहे. कोणत्याही औपचारिक आमंत्रणाशिवाय, प्राचीन काळापासून हिंदू धर्माच्या अनुयायांच्या जागृत चेतनेला चैतन्यमयी करून, कार्यप्रवण करणारा कुंभोत्सव म्हणजे चिती जागरणाचा महायज्ञच आहे.

संस्कृती सबकी एक चिरंतन,
खून रगों मैं हिंदू हैं
विराट सागर समाज अपना,
हम सब इसके बिंदू हैं
रामकृष्ण गौतम की धरती,
महावीर का ज्ञान यहां
वाणी खंडन मंडन करती,
शंकर चारों धाम यहां
जिसने दर्शन राहें उतनी,
चिंतन का चैतन्य भरा
पंथ खालसा गुरू पुत्रों की
बलिदानी यह पुण्य धरा
अक्षयवट अगणित शाखाएँ,
जड मैं जीवन हिंदू हैं
विराट सागर समाज अपना
हम सब इसके बिंदू हैं
तर चला तीर्थराज प्रयागला....

 जगातील सर्वात विशालकाय महासागररुपी एकत्रीकरणात, आपणही बिंदू म्हणून सहभागी होऊया आणि नवभारताच्या जयकारात उद्घोष करूया.

स तीर्थराजो जयति प्रयागः
प्रयागराज पुण्यपर्व स्नान तिथी
दि. १३ जानेवारी २०२५-
पौष पौर्णिमा
दि. १४ जानेवारी २०२५-मकरसंक्रांती
दि. २९ जानेवारी २०२५-
मौनी अमावस्या
दि. ३ फेब्रुवारी २०२५-
वसंत पंचमी
दि. १२ फेब्रुवारी २०२५-
माघ पौर्णिमा
दि. २६ फेब्रुवारी २०२५-महाशिवरात्री

डॉ. भालचंद्र हरदास
(लेखक भारतीय शिक्षण मंडळाचे नागपूर महानगर संयोजक आहेत)
९६५७७२०२४२