छत्रपतींचा आदर्श?

    04-Sep-2024   
Total Views |
mva maharashtra sharad pawar statement


छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ म्हणू नये, अशी भूमिका घेणारे शरद पवार आणि त्यावर छत्रपतींऐवजी शरद पवारांनाच ‘जाणता राजा’ म्हणणारे त्यांच्या आजूबाजूचे लाभार्थी गट-तट अवघ्या महाराष्ट्राच्या परिचयाचे. पण, आज हेच शरद पवार काय म्हणत आहेत, तर ‘छत्रपतींच्या आदर्शानुसार लोकांच्या हितांचे रक्षण करणारे सरकार जोपर्यंत बनत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.’ काय म्हणावे? छत्रपतींवर त्यांचे प्रेम खरेच आहे का? छत्रपतींच्या पायी त्यांची निष्ठा होती, तर मग प्रतापगड येथे अफजलखानाची कबर उखाडण्याची धमक त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात का दाखवली नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींनी पावन झालेल्या गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण त्यांची सत्ता असताना का हटवली गेली नाही? थोडक्यात, शरद पवार काय, राहुल गांधी काय, आणि यांच्या नादाला लागलेले उद्धव ठाकरे काय, यांना आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे प्रेम उफाळून आले, ते केवळ सत्तास्वार्थासाठी आणि लोकांना मूर्ख बनवण्यासाठीच. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, आता समजा जर मुस्लीम समाजाने औरंगजेब किंवा टिपू सुलतान किंवा अफजलखान अशा लोकांच्या समर्थनार्थ काही मागणी केली, तर शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल? छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेच्या सुतळीच्याही तोड्याला कोणी हात लावू नये, या विचारांचे होते. कोरोनाकाळात महाविकास आघाडीची म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राहुल गांधींची सत्ता होती. त्या काळात जे काही घडले, ते महाराष्ट्र कसा विसरेल? पालघर साधू हत्याकांड, दिशा सालियन, मनसुख हिरेन हत्या, 100 कोटी वसुली प्रकरण आणि उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकांची पेरणी... कोरोनाकाळात लोक मूलभूत सुविधांसाठी तडफडत होती. त्यावेळी केंद्रातील भाजप सरकारने आणि समाजाने स्थानिक स्तरावर रा. स्व. संघ आणि मान्यवर स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी मोलाचे काम केले. तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी कुठे होते? हीच शरद पवार यांची आदर्श सत्तेची व्याख्या आहे का? छे! या असल्या वृत्तीचा आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचा दुरान्वयेही संबंध नाही. त्यामुळे येणार्‍या काळात महाविकास आघाडीची ही अशी सत्ता हवी आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे.

‘खटाखट’सारखे स्वप्न

"जर काँग्रेस पक्ष सत्तेत आला, तर राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत,” असे नुकतेच अभिषेक मनू संघवी म्हणाले. ‘मम्मा, आता तर मी पक्का पंतप्रधान बनणार. फक्त समोर लढण्यासाठी भाजप नसू दे आणि उमेदवार मोदीच काय कोणीही भाजपवाला नेता नसू दे. तसे तर आम्ही राजकुमारच आहोत ना?’ या देशावर किती वर्षे सत्ता केली गं मम्मा आपण? आहाहा... काय ते दिवस होते! दादीला निर्णय आवडला नाही, तर आणीबाणी लावून देशच बंद करून टाकला होता. मम्मा मी जे संविधान संविधान बोलतो, त्या संविधानाची ती उद्देशिका का काय असते, तीपण दादीने बदलली होती. केवढी ‘पॉवर’ होती आपल्या कुटुंबाकडे! त्यामुळे या देशाचे राजाकरण आपल्याभोवतीच होते. काय म्हणायचे गं, ‘लो इंडिया इज इंदिरा.’ मम्मा, बघ देश म्हणजे दादी होती. कसे सगळे आपले सुखात सुरू होते. पण, आज सगळे बदलले मम्मा! लोकांना सगळे कळायला लागले. विकास, प्रगती, देशप्रेम आणि समाज वगैरेचा आता भारताचे लोक विचार करायला लागले आहेत. प्रभू रामचंद्र म्हणून खरेच कोणी होते का? रामसेतू नव्हताच वगैरे वगैरे मुद्दे आपण रेटून मांडले होते. पण, त्यांनी धर्म-इतिहासाचा आधार घेत न्यायालयीन खटलाच जिंकला. अयोध्येमध्ये त्यांनी रामचंद्राचीच प्राणप्रतिष्ठा केली. 70 वर्षांत आपल्या काळात काय झाले, याचा मागोवा भारतीय जनता घेऊ लागली आहे. आपण जे जे म्हणून केले, त्या सगळ्यांना या भाजपवाल्यांनी, मोदींनी उत्तरे दिली. काँग्रेसची सत्ता असताना चीन आणि पाकिस्तान देशांसमोर केवढेतरी मोठे आव्हान देत असत. पण आज भाजपच्या केंद्र सरकारने तो भोपळा फोडून टाकला. संविधानाप्रमाणे सगळ्या भारतात राज्य सुरू आहे. हे असे चालले तर कसे होणार? आपणच देशावर राज्य करायला हवे. संघवी म्हणाल्याप्रमाणे, मी पंतप्रधान होणार. पण, मोदी पुन्हा पंतप्रधान याच वर्षी 2024 सालीच झाले ना. मग संघवी कोणत्या पंतप्रधानपदासाठी माझे नाव घेत आहेत? काय मी लोकांना 8,500 रुपयांचे कधीही पूर्ण न होणारे ‘खटाखट’ स्वप्न दाखवले, जसे आलूतून सोना बनवायचे कपोकल्पित स्वप्न दाखवले, अगदी तसेच कधीही पूर्ण न होणारे स्वप्न मला संघवी दाखवत आहेत?

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.