पर्यावरण संवर्धनातून समाजहित

    30-Sep-2024   
Total Views |
environment conservation work
 
कचरा व्यवस्थापन क्षेत्रात पर्यावरणपूरक कार्य करणार्‍या छत्रपती संभाजीनगरच्या चंद्रकला सागर शिंदे. त्यांच्या कार्यविचारांचा या लेखात घेतलेला हा मागोवा...

नाना कांदा विकून पैसे घेऊन येतील, मग आपल्याला दिवळीला नवे कपडे घेऊ,’ या आशेवर बाबासाहेबांची म्हणजे नानांची लेक चंद्रकला होती. बाजारात कांदा विकायला गेलेले नाना घरी आले, मात्र, रिकाम्या हाताने आणि डोळ्यात पाणी. कारण, बाजारात कांद्याला भाव मिळालाच नाही. कर्ज काढून कांद्याचे पीक उभे केले. मात्र, बाजारात कांद्याला भावच मिळाला नाही. ट्रकमधून कांदा उतरवण्यासाठी हमाल हवे होते. त्या हमालांना वेगळे पैसे द्यावे लागणार, कांदा विक्रीसाठीचा मध्यस्त म्हणजे अडत्यालाही पैसे द्यावे लागणार होते. बाबासाहेबांनी हिशोब केला, तर सगळा खर्च कांद्याच्या नफ्यापेक्षा तोटा देणारा होता. कांदा परत न्यावा, तर परतीच्या ट्रॅक्टरचे पैसेही नव्हते. शेवटी कांदा तसाच बाजारात सोडून, डोळ्यात पाणी घेऊन बाबासाहेब घरी आले. कांद्यातून पैसे मिळालेच नाही. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याचा प्रश्नच नव्हता. विजापूर तालुक्यातील शिवराई गावच्या शेतकरी बाबाची आणि कुटुंबाची ही परिस्थिती चंद्रकला यांनी अनुभवली होती. ही परिस्थिती पिकपाणी आल्यावरची. मात्र, वर्षानुवर्षे दुष्काळच पडत असे. त्यामुळे ही शेतजमीन असूनही चंद्रकला यांच्या घरी कधीही शेतीतून चांगले उत्पन्न मिळालेच नाही.

चंद्रकला यांचे वडील बाबासाहेब आणि आई कुसूम हे शिवराई गावचे मराठा कुटुंब. शेतजमीन असली तरीसुद्धा दुष्काळाने आयुष्याला गरिबीची कळा आलेली. दुष्काळ का पडतो? पिकपाणी का येत नाही? पाऊस पडला, तरीपण उन्हाळ्याआधी पाण्याविना गावंच्या गावं का ओस पडतात? हे विचार चंद्रकला यांच्या मनात लहानपणापासून येत असत. या प्रश्नांचा मागोवा घेतानाच त्यांना वाचनाचा छंद लागला. प्रदूषण, पर्यावरण संवर्धन, पर्यावरणाचा र्‍हास या सगळ्यांशी ओळख झाली. बालपण दुष्काळाच्या सावटात गेलेल्या चंद्रकला आज पर्यावरण क्षेत्रातल्या सामाजिक कार्यकर्ता आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या परिसरामध्ये पर्यावरणाबाबत विविध उपक्रम राबवतात. ई-कचरा वर्गीकरण, संकलन आणि त्यातून स्वयंरोजगार या संकल्पनेवर त्या गेले आठ वर्ष काम करतात. पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून स्वत:ची आणि कुटुंब समाजाचीही कशी प्रगती करू शकतो, याबाबत त्या समाजात जागृती करतात. निसर्गाने भरभरून दिले. मात्र, माणसाने ते संवर्धित केले पाहिजे. “निसर्गाला ओरबाडून माणूस निसर्गालाच नाही, तर मानवी आयुष्यालाही संकटात टाकतो” हा विचार त्या वस्तीपातळीवर मांडत असतात. पर्यावरणपूरक कार्यासाठी त्यांना नुकताच ‘घृष्णेश्वर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2024’ पुरस्कारही प्राप्त झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गावखेड्यामध्ये समाजाला ई-कचर्‍याबाबत जागृत करणे सोपी गोष्ट नाही. पण, हे शिवधनुष्य चंद्रकला यांनी पेलले आहे. ऊन असो, पाऊस असो, की कोरोना असो, चंद्रकला या पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असतात. वैजापूरच्या गावखेड्यातल्या मुलीने पर्यावरणाच्या क्षेत्रात चमकदार काम करणे, हा प्रवास तसा अवघड नसला तरी सोपाही नव्हता.

आधीच सांगितल्याप्रमाणे चंद्रकला यांनी गरिबी अनुभवली होतीच. परिस्थिती पालटायची, तर शिकायला हवेच. असो. त्यांनाही ध्यास होताच. त्यांना शिक्षक बनायचे होते. चंद्रकला यांच्या बाबांनीही स्वप्न पाहिले की, लेकीने शिकावे. शेतीवर अवलंबून जगू नये. या पार्श्वभूमीवर चंद्रकला यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आणि नातेवाईकांनी नानांकडे तगादा लावला की, ‘अरे लेकीच लगीन कर.’ आईलाही तसेच वाटे. पण, नाना म्हणत, “नाही, माझ्या लेकीला मी शिकवणार. तिला तिच्या पायावर उभे राहू दे.” हे सगळे पाहून आणि एकूण चंद्रकला यांच्या मनात हुरूप येई. नाना आपल्यावर इतका विश्वास ठेवतात, आपण शिकायलाच हवे, या जिद्दीने त्या शिकू लागल्या. दहावीनंतर त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीनंतर ‘डीएड’चे शिक्षण घेतले. शिक्षिका बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. पण, त्यांच्या मनातली पर्यावरणाची ओढ काही संपत नव्हती. त्यामुळे शाळेत शिक्षिका असूनही त्या वेळ मिळेल तशा शेतात जात. शेतीच्या समस्या आणि त्यावर उपाय काय, हा विचार करताना त्यांना एकच उत्तर मिळे, ते म्हणजे ‘पर्यावरणाची हानी झाली, प्रदूषण वाढले म्हणूनच शेतीची समस्या आहे.’ पाऊस वेळेत योग्य पद्धतीने पडावा असे वाटत असेल, तर प्रदूषण थांबले पाहिजे, कचरा त्यातही प्लास्टिकचा वापर थांबला पाहिजे. त्यामुळेच प्रदूषण होते, हा विचार त्यांच्या मनात येई. या विषयातच आपण काम करायला हवे, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे नोकरी करत असतानाच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे दैवी संकेतच होते की, सामाजिक कार्याचा विचार करणार्‍या चंद्रकला यांचा विवाह सामाजिक कार्याची तळमळ असलेल्या सागर शिंदे यांच्याशी झाला. वैजापूरहून चंद्रकला पुण्यात आल्या. इथे त्यांनी ‘एमएसडब्लू’चे शिक्षण पूर्ण केले. सामाजिक कार्यातले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर त्या एका स्वयंसेवी संस्थेत पर्यावरण संवर्धनासंदर्भात काम करू लागल्या. आज पश्चिम महाराष्ट्रात पर्यावरण क्षेत्रात चंद्रकला शिंदे यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्या म्हणाल्या, “देश, समाज आणि मुख्यत: माणूस म्हणून जगण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील जागृती मी आयुष्यभर करणार आहे. पर्यावरण क्षेत्रात निष्ठेने कार्य करणार्‍या चंद्रकला यांचे कार्यविचार समाजासाठी महत्त्वाचे आहे.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.