समृद्धी महामार्गाच्या प्रगतीचा आलेख

    03-Sep-2024   
Total Views |
samruddhi expressway maharashtra


राज्यातील 24 जिल्ह्यांना सर्वार्थाने समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे सर्वांगीण चित्र बदलणारा ठरला आहे. या महामार्गाचे काही टप्पे पूर्ण झाले असून, काही टप्पे पूर्णत्वाच्या जवळ आहेत. या महामार्गाची निर्मिती करताना, सगळ्यांच्याच हिताचा व्यापक अंगाने विचार झालेला दिसतो. त्यामुळे हा महामार्ग प्रगतीचा महामार्ग ठरणार हे नक्की. समृद्धी महामार्गाच्या व्यापकतेचा घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांच्या विकासाशी निगडित अशा, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाची संकल्पना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास प्रस्तावाने, दि. 30 नोव्हेंबर 2015 रोजी घोषित झाली होती. प्रकल्पाची धुरा ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ अर्थात ‘एमएसआरडीसी’यांच्याकडे सोपविली गेली.
 
राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणार्‍या इतर मार्गाने प्रवास करायचा झाल्यास, तब्बल 16 तास लागतात आणि या दोन शहरांपर्यंत मालवाहतूक करायची असेल तर, 24 तासांहून जास्त वेळ लागतो. परंतु प्रस्तावित समृद्धी द्रुतगती मार्गाने हा वेळ, निम्म्यावर येणार आहे. एवढीच या मार्गाची मर्यादित ओळख नसून, या महामार्गामुळे मुंबई शहर थेट राज्याच्या पूर्वेकडील अनेक जिल्ह्यांशी जोडले जाईल. 701 किमी लांब आठ मार्गिकांचा हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधील 26 तालुक्यांना, आणि 392 गावांना थेट जोडला जाणार आहे. शिवाय, महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या राज्यातील इतर 14 जिल्ह्यांनादेखील या द्रुतगती महामार्गाचा लाभ मिळणार आहे.


प्रकल्पाची थोडक्यात माहिती

पहिला टप्पा 520 किमी अंतराचा असून, नागपूर ते शिर्डी असा आहे. हा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पित केला गेला. तर या महामार्गाचा दुसरा टप्पा 80 किमी आसून, तो शिर्डी ते भारवीर असा आहे. मे 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण झाले. तसेच, या महामार्गाचा तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी अस असून, याचा 25 किमी भाग पूर्ण झाल्यावर, 625 किमी लांबीचा प्रवासटप्पा वाहतुकीस खुला झाला आहे.

चौथा आणि शेवटचा टप्पा ठाणे जिल्ह्यातील आमने ते इगतपुरी हा पूर्ण होत आला असून, त्यातील 76 किमी लांबीचा भाग यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे ‘एमएसआरडीसी’च्या व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. या चौथ्या टप्प्यात 16 पूल आणि चार बोगदे असून, आठ किमी लांबीचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा असेल. तसेच, हा बोगदा सर्वाधिक रुंदीचा असून, त्याची रुंदी 17.61 मी. एवढी आहे. तसेच या बोगद्याची उंची देखील, 9.12 मी. असणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या या अखेरच्या टप्प्यात शहापूर येथील पूल, ‘सेगमेंटल’ पद्धतीने उभा होत आहे. त्यामध्ये पुलाचे एकेक भाग मोठ्या केबलमध्ये टाकून, पुढे ढकलले जातात. सुई-धाग्यात मणी गुंफल्यासारखी ही उभारणी असते. हा 2.38 किमी लांबीचा आणि 35 मी. उंचीचा हा पूलदेखील, अभियांत्रिकी अविष्काराचा चमत्कार ठरला आहे.

कुमार यांनी दि. 9 ऑगस्ट रोजी स्वतः कार्यस्थळावर येऊन प्रकल्पाचे कामकाज तपासले. तेव्हा ‘व्हायाडक्ट’वरचे ‘वॉटरप्रुफिंग’चे काम सुरू होते. बांधकामातील महत्त्वाचे जोडणीकाम पूर्ण झाल्यावर, हा भागही वाहतुकीकरिता खुला होणार आहे. त्यानंतर आमने ते इगतपुरीचा प्रवास 90 मिनिटे वा अधिक असण्याऐवजी, फक्त 20 मिनिटांचा असेल. त्यामुळे इंधनात मोठ्याप्रमाणात बचत होईल. कारण या जोडणीमुळे कसारा घाटाचा प्रवास टाळला जाणे शक्य होणार आहे. आमने येथून ’बडोदा-मुंबई एक्स्प्रेस वे’ही जाणार आहे.समृध्दी महामार्ग प्रकल्पाचा अंदाजे खर्च रुपये 55 हजार, 335 कोटी रुपये असून, महामार्गासाठी लागणारी एकूण जमीन ही 9 हजार, 599 हेक्टर्स एवढी आहे . त्यापैकी महामार्गासाठी लागणार्‍या एकूण जमीनीपैकी 8 हजार, 391 हेक्टर्स अर्थात 86 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.

या महामार्गावर उड्डाणपुलांची संख्या 50 असून, सर्वात लांब उड्डाणपूल ठाणे व नाशिकच्या दरम्यान 17 किमी लांबीचा आहे. तर या महामार्गावर सहा बोगदे असून, सर्वात लांब बोगदा नऊ कि.मी लांबीचा इगतपुरी व कसार्‍यादरम्यान आहे. महामार्गावर वाहनांना जाण्यासाठी आंतरबोगदे 300 असून; प्रवाशांना जाण्यासाठी आंतरबोगदे 400 आहेत. या महामार्गावर कमाल वेगाची मर्यादा ताशी 150 किमी असली तरीही, वेगाची ही मर्यादा तात्पुरत्या काळासाठी ताशी 120 किमी करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाची रुंदी 120 मी.असून, त्यावर एकूण आठ मार्गिका आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 3.4 मी. उंच भिती बांधणार असून; या महामार्गावर सुरुवातीची 40 वर्षेच टोल घेतला जाणार आहे. टोलची किंमत अंदाजे रु. 1 हजार, 200 असणार आहे. या महामार्गावरून सुरुवातीची काही वर्षे वाहतूक करणार्‍या वाहनांची अपेक्षित संख्या, रोजची 30 हजार ते 35 हजार असण्याचा अंदाज आहे.

महामार्गाच्या वाटेतील अभयारण्यातील वन्यजीवांचा सांभाळ करण्यासाठी, काही ठिकाणी 117 किमी लांब वरून अथवा खालून जाणारा मार्ग असणार आहे, ठाण्यातील तानसा, अकोल्यातील कातेपुरा, वाशिममधील करंजासोहोल इथे ही व्यवस्था असणार आहे. तर यमुना द्रुतगती व लखनौ-आग्रा मार्गांसारखे या मार्गावर देखील संकटकालीन काळात, भारतीय हवाई दलाच्या व मालवाहतुक विमानांना तीन किमीवर रन वेसारखे उड्डाण करण्याची, वा विमान उतरवण्याची मुभा देण्यात येणार आहे.
या महामार्गावरून डिसेंबर 2022 पासून दि. 23 मे 2024 पर्यंत एक कोटी वाहनांनी प्रवास केला आहे.
 
समृद्धी महामार्गाचा विस्तार

नागपूर-गोंदिया 127 किमीचा मार्ग असून त्यासाठी रु. 7 हजार 345 कोटी अंदाजे खर्च आलेला आहे. तर भंडारा-गोंदिया या 28 किमीच्या टप्प्यासाठी रु. 1 हजार 587 कोटी अंदाजे खर्च झाला आहे. नागपूर-चंद्रपूर 194 किमीसाठी झालेल्या खर्चाची रक्कम रु. 9 हजार 543 कोटी इतकी आहे अंदाज आहेे.


विस्तारित प्रकल्पाचे फायदे

राज्याच्या पूर्व आणि पश्चिम सीमा एकमेकांना जोडणे या महामार्गामुळे शक्य होणार आहे.तसेच उत्तरेकडील व ईशान्येकडील इतर राज्ये देखील एकमेकांना जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे पूर्व महाराष्ट्रातील अल्प विकसित भागांचा, आर्थिक व सामाजिक विकास होईल. पायाभूत सुविधांचा लाभ सर्वांना मिळून आणि वनवासी विभागांचाही विकास होईल. समृद्धी महामार्गालगत नवनगरात ‘म्हाडा’ची घरे नव्याने बांधली जाणार आहेत.‘एमएसआरडीसी’ने विविध सरकारी यंत्रणांकडून रु. एक हजार कोटीपर्यंत कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्याऐवजी समृद्धीलगत नवनगरात घरे बांधण्यासाठी जमिनी मिळाव्या, अशी मागणी ‘म्हाडा’ने केली आहे. नवनगरांमध्ये जमिनी उपलब्ध झाल्यास, तेथे अल्प आणि मध्यम गटासाठी ‘म्हाडा’चे घरे बांधण्याचे नियोजन आहे.


पेट्रोलपंप आणि फूड मॉल

महामार्गाच्या दोन्ही दिशांनी पेट्रोलपंप बांधले आहेत. प्रत्येकी आठ पंप म्हणजे एकूण 16 पंपाची उभारणी करण्यात आली आहे. नागपूर-मुंबई दिशेकरिता - वायफळ, गणेशपूर, शिवणी, डव्हा, मांडवा, कडवंची, मरळ, आमणे येथे फूड मॉल देखील बांधण्यात येणार आहेत. तसेच मुंबई-नागपूर दिशेकरिता आमणे, देवला, मांडवा, डव्हा, शिवनी, रेनकापूर, मानकापूर, वायफळ येथे फूड मॉल बांधण्याचे प्रस्तावित आहे. या मार्गालगत मुबलक मोकळी जागा आहे. तेथे सौरऊर्जेचा सदुपयोग करण्यासाठी महामंडळाने 200 मेगावॅटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभा करण्याबाबतचा अहवाल मंजूर झाल्यानंतर निविदा तयार करावयाची आहे.

 
महामार्ग सुरक्षाकक्षेत

मुंबई-नाशिक, मुंबई-नागपूर समृद्धी आणि पुणे-सातारा या महामार्गांवर अपघात रोखण्यासाठी दि. 1 डिसेंबर 2022 पासून, सहा महिन्यांकरिता वाहन तपासणी हाती घेतली आहे. वाहनांच्या चाकातील हवेच्या दाबाची, तसेच टायरची तपासणी करण्यात येत असल्याचे राज्य सुरक्षाकक्षाचे अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर एके दिवशी 2 हजार, 877 वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात आले. 579 वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

वन्यप्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी महामार्गावर भुयारी मार्ग केले असून, त्यांचा वन्यप्राण्यांकडून वापर होऊ लागला आहे. भरधाव वाहनांखाली वन्यप्राण्यांचे मृत्यू थांबवण्यासाठी, डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने सुचविल्याप्रमाणे 700 कोटी रुपये खर्चून उपाययोजना करण्यात आल्या.वन्यप्राण्यांसाठी नऊ हरित उड्डाणपूल, आणि 17 भुयारी मार्ग तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी 64 कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांचे अपघात कमी होण्यासाठी व त्यांनी महामार्गावर प्रवेश करू नये म्हणून, 13 प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीवर बंदी घातली आहे.

 
महामार्गावरील अपघात टळणार
 
वेगमर्यादांचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक दहा किमीवर, वाहनांचा वेग मोजणारी यंत्रणा बसविण्यात येणार असून, यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे. महामंडळातर्फे रु. 1 हजार 498 खर्चून ‘इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ची स्थापना केली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या माहितीनुसार ही प्रणाली मार्चपासून, कार्यादेश दिल्यानंतर 21 महिन्यांत ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे.अपघात रोखण्यासाठी 15 इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी महामार्ग पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत.

या महामार्गावरील अपघातातील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांकडून ‘मृत्युंजय दूत’ नेमण्यात आले असून, हे दूत खर्‍या अर्थाने देवदूत ठरले आहेत. दि. 1 मार्च 2021 ते दि. 30 जून 2023 पर्यंत या मृत्युंजय दूतांनी 1 हजार, 634 जणांचे प्राण वाचवले आहेत.
 

 

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.