महायुतीच्या शासनांतर्गत कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्देश आणि संकल्पना कार्यान्वित केली की, आयटीआय प्रशिक्षणांतर्गत ‘हर घर दुर्गा अभियाना’द्वारे राज्यातील प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे पायाभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाबद्दल प्रत्यक्ष संबंधित काय म्हणतात, याचा घेतलेला हा कानोसा...
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
रमन्ते तत्र देवताः।
अर्थात जिथे स्त्रियांची पूजा होते, तिथे देवता निवास करतात. यानुसारच, सध्याच्या महायुती सरकारने महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सन्मानासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. त्याचा सुवर्णमध्य साधत राज्याचे कौशल्य उद्योग रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींसाठी स्वरक्षणाच्या प्रशिक्षणाचाही अंतर्भाव केला आहे. तर ‘हर घर दुर्गा’ महाराष्ट्र राज्यातील आयटीआयमधील विद्यार्थिनींसाठी कराटे, ज्युदो यांसारख्या स्वरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीतकमी दोन तासिका घेण्यात येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद विद्यार्थिनींमध्ये येणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक परिसरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार असून विद्यार्थिनींना नियमित सरावासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे. सज्जनशक्तीचे आणि भारतीय धर्मसंस्कृतीचे पूरक असे महायुतीचे शासन असल्याने मुली-महिलांच्या सामाजिक आर्थिक सुरक्षिततेसाठी तत्काळ पाऊले उचलली जात आहेत. या योजनेबद्दल जेव्हा कळले, तेव्हा ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ काहीच नाही, तर घरगुती हिंसाचारात मरणार्या, पिचणार्या मुली डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. जेव्हा आफताब पुनावालाने श्रद्धा वाळकरचा खून, 36 तुकडे करून केला, इकबाल शेखने रूपाली चंदनशिवेचा गळा चिरून खून केला, साहिल कुरेशीने साक्षीच्या पोटात 20 वेळा चाकू खुपसून तिचा चेहरा दगडाने चिरडून खून केला, नवाब खानने पुनम क्षीरसागरचा खून गळा दाबून केला, यशश्री शिंदेची निघृण हत्या दाऊद शेखने केली. या सगळ्या दुर्देवी आणि संतापजनक घटना. त्याबद्दल वाटते की, या बळी गेलेल्या मुली स्वसंरक्षणाचे धडे शिकलेल्या असत्या तर? त्यांच्याकडे प्रतिकार करण्याची मानसिक,शारीरिक क्षमता असती तर? तर त्या जीवंत असत्या. नव्हे, त्यांना फसवण्याची हिंमतही त्या नराधमांना झाली नसती.
आपल्या मुलींना पुस्तकी किंवा स्वयंरोजगाराचे शिक्षण प्रशिक्षण आपण देतच असतो. आता वेळ आली आहे, मुलींना स्वरक्षणाचे पाठ शिकवण्याची. अत्याचार्याची मुंडी मुरगळायला शिकवण्याची. आपल्या मुलींमध्ये ती हिंमत आहे. मात्र, त्या हिमतीचा उपयोग करण्याची क्षमता ओळखता यावी, यासाठी आयटीआयच्या विद्यार्थिनींसाठी स्वरक्षणाच्या धड्यांचे आयोजन केले आहे. याबाबत आयटीआयच्या संचालकांशी तसेच प्राचार्यांशी आणि विद्यार्थिनींशी संवाद साधला, तर वाटले समाज जागृत झाला आहे.
राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली महाराष्ट्राची भूमी आहे. आजवर दुर्गारूपाने असंख्य महिलांनी या भूमीच्या संरक्षणासाठी प्रगतीसाठी योगदान दिले. त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा! आज याच महिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी, या उद्देशाने ‘घर घर दुर्गा’ अभियान सुरु करत आहोत. आपल्या सर्वांच्या सोबतीने समजातील नराधम वृत्तीच्या महिषासुरांचा नाश करू.- मंगल प्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र
या निर्णयामुळे प्रेरणा मिळाली...
काही दिवसांपूर्वी आयटीआयमधील विद्यार्थिनींसाठी आत्मरक्षणाच्या तासिका कार्यान्वित करणार असा कौशल्य विकास खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा निर्देश वाचला. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यामुळे आम्ही आमच्या गोरेगाव विधानसभेतील प्रत्येक मंडळासोबत चर्चा करून त्या त्या वस्त्यांमध्ये मुलींसाठी नियमित स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करत आहोत. यासाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक सेवाभावी व्यक्ती आणि संस्था आमच्यासोबत सामील होत आहेत. मंत्री मंगल प्रभात लोढा यांना धन्यवाद. त्यांच्या निर्णयामुळे प्रेरणा घेऊन आम्ही समाजासाठी समाजाच्या माध्यमातून उपक्रम राबवणार आहोत.
-रश्मी उपाध्याय, सामजिक कार्यकर्ता, गोरेगाव
आमच्यावेळी असे प्रशिक्षण असते तर...
2003 साली मी मुलुंड आयटीआयमधून मोटार मेकेनिकचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण तर पूर्ण केले, मात्र हे क्षेत्र पुरुषांचेच, असे चित्र मला दिसले. कोणी छेडले, कोणी काही विचित्र वागले, तर मी प्रतिकार करू शकेन का, असे वाटायचे. त्यामुळे प्रशिक्षण घेऊनही असुरक्षिततेच्या भावनेमुळे मी क्षेत्रात काही करू शकले नाही. आज मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आयटीआयच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देणार हे जाहीर केल्यावर वाटले की, हा निर्णय आमच्यावेळी झाला असता तर? मंगल प्रभात लोढा आणि आज जे आहे, ते महायुतीचे सरकार तेव्हा असते तर? तर कदाचित मी आज मोटार मेकेनिक क्षेत्रात कार्यरत असते.
- गायत्री शिंदे, माजी विद्यार्थिनी, मुलुंड आयटीआय, विक्रोळी
अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वाचा निर्णय
मी आयटीआयमधून फूड प्रीझरवेशन प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय सुरू करण्यासाठी मी धावपळ सुरू केली. त्यावेळी एकटीने प्रवास करणे, अनोळखी लोकांना भेटणे हे करावे लागले. हे सगळे करताना मनात एक प्रकारची असुरक्षितता असे. काही वाईट घडले तर प्रतिकार करू शकेन का, हा विचारही मनात येत असे. शेवटी मी उद्योगधंद्यांचा विचारच सोडला. जर त्यावेळी मला स्वसंरक्षण करू शकते हा आत्मविश्वास असता, तर आज दृश्य काही वेगळे असते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला सुरक्षा महत्त्वाची. मंत्री मंगल प्रभात लोढा आणि कौशल्य विकास खात्यातर्फे अत्यंत स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे.
- मानसी पराडकर, माजी विद्यार्थिनी, दादर आयटीआय
सुरक्षित वातावरणाची हमी मिळाली
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजपत्राद्वारे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा पक्का आराखडा तयार केला आहे. शासनाने महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिल्यामुळे या गंभीर विषयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. विशेषत: पालकांचा व पोलिसांचा समावेश असल्याने आम्हा विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागेल. सुरक्षित आत्मविश्वासाच्या मानसिकतेतून आम्ही आमच्या कार्यक्षेत्रात वावरू अशी खात्री वाटते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींना ‘हर घर दुर्गा’ अभियानामुळे सुरक्षित वातावरणाची हमी मिळली आहे. आम्हा विद्यार्थिनींमधला आत्मविश्वास आणखीन वाढणार आहे.
-सायली खोब्रागडे, विद्यार्थिनी, दादर आयटीआय
...आणि आमच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला
मुलगी म्हणून पुढे कामाला जाताना काय काय आव्हाने येऊ शकतात, याबद्दल विचार करते, तेव्हा वाटायचे की, मी परिस्थिती हाताळू शकते का? पण, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्र्याच्या नव्हे, तर पालकाच्या भूमिकेतून आम्हा विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आम्ही स्वसंरक्षण शिकलो, तर आमचेच नव्हे, तर आमच्या कुटुंबाचेही रक्षण करू शकू. हा आत्मविश्वास केवळ आणि केवळ मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या ‘हर घर दुर्गा’ या अभियानातून आला आहे. त्यांचे खूप खूप आभार
- स्नेहा गायकवाड, आयटीआय विद्यार्थिनी, जालना
स्वरक्षणाचे प्रशिक्षण अत्यावशक
शासनाने आणि मुख्यतः मंत्री मंगल प्रभात लोढा सरांनी आम्हा विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा विचार करून खूपच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाअंतर्गत आम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःचे रक्षण कसे करायचे, हे शिकणार आहोत. काळ-वेळ सांगून येत नाही. मात्र, दुर्देवाने अशी वेळ आलीच, तर आम्ही विद्यार्थिनी त्या प्रसंगाला खंबीर आणि यशस्वीपणे तोंड देऊ, असे वाटते. कारण, आम्ही स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन तितके मानसिकरित्या आणि सर्वचदृष्ट्या सक्षम होणार आहोत.
- निहारिका सिंग, आयटीआय विद्यार्थिनी, लोअर परळ
स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो
महाराष्ट्र शासनाने ‘हर घर दुर्गा’ योजना दिली. त्यामुळे स्वतःचे संरक्षण करता येईल. त्यामुळे आम्हाला आणि आमच्या परिवारालाही खूप आनंद वाटत आहे. कारण, मुली-महिला बाहेर पडल्या, तर अपवादाने का होईना, पण काही विपरित घटना घडली, तर त्याला आम्ही मुली कशा सामोरे जाऊ, याची काळजी घरातल्यांना वाटते. मात्र,हा खूपच चांगला निर्णय आहे. त्यातून मिळणार्या प्रशिक्षणाने आम्हाला फायदा आहे. स्वसंरक्षणाचे पायाभूत प्रशिक्षण घेतल्याने आम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो.
- नैना ढंभारे, आयटीआय विद्यार्थिनी, वर्धा
सुरक्षेचा पक्का आराखडा...
स्त्रीचे सक्षमीकरण करायचे असेल, तर स्त्री सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ‘हर घर दुर्गा’ उपक्रमाअंतर्गत महिला संरक्षण प्रशिक्षण म्हणजे मुलींच्या सुरक्षेचा पक्का आराखडाच आहे. तसेच या शासन निर्णयामुळे संस्था संस्थावर प्राचार्य व शिल्प निर्देशक यांना तातडीचे निर्णय घेणे सुलभ होईल. विशेषतः पालकांचा व पोलिसांच्या समावेशामुळे आश्वासक व परिणामकारक भावना वाढीस लागेल. ज्युदो, कराटे व इतर सुरक्षिततेचे प्रशिक्षण संस्थेत दिल्यामुळे सुरक्षिततेची मानसिकता वाढेल व त्याचा फायदा म्हणजे कारखाने, कार्यालये इथे त्या सहजपणे व खंबीरपणे वावरतील. विद्यार्थिनी प्रशिक्षण पूर्ण करून जेव्हा त्यांचे कार्यक्षेत्र शोधतील तेव्हा या प्रशिक्षणाचा त्यांना फायदा होईल. शासन व मंत्री महोदय यांचा मी खूप खूप आभारी आहे.
-विलेश संख्ये, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
सुरक्षित न्याय्य समाजाची बांधणी
राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ‘हर घर दुर्गा’ अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांसारख्या महिलांच्या धाडसाने जडलेला महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. या सर्व महान मातृशक्ती त्यांच्या स्वतःच्या अधिकारात संरक्षक योद्धा होत्या आणि त्यांचा वारसा कायम आहे. ‘हर घर दुर्गा’ अभियानाद्वारे आम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला त्याच धैर्य आणि सामर्थ्यांचे मूर्त रूप देण्यासाठी प्रेरित करायचे आहे. प्रशिक्षण संस्थेतील प्रत्येक विद्यार्थिनीने या प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे मी आवाहन करतो. एकत्रितपणे आम्ही कोणत्याही धोक्याच्या विरोधात खंबीरपणे उभे राहू शकतो. तसेच, एक सुरक्षित आणि न्याय्य समाज निर्माण करू शकतो.
-प्रदीप दुर्गे, उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय प्रादेशिक कार्यालय मुंबई विभाग
सुरक्षित समाजासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात 419 आयटीआय आणि 163 टेक्लिकल स्कूल आहेत. यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुली प्रशिक्षण घेत आहेत. सर्वच प्रशिक्षण संस्थांत शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक प्रशिक्षणाचे पालकत्व आमच्याकडे असते. विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्वच बाबतीत त्या आत्मनिर्भर व्हाव्या, हा आमचा उद्देश आहे. औद्योगिक संस्थेच्या बाहेर पडल्यावरही आमच्या विद्यार्थिनी सर्वच प्रतिकुल परिस्थितीचा सामना करू शकतील, असा आत्मविश्वास येण्यासाठी विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. त्यामुळे माननीय मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे हे ‘हर घर दुर्गा’ अभियान प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी, संचालक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्हा सर्वांना वाटते की, अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या अंतर्भावामुळे समाजात सुरक्षिततेसंदर्भात महत्त्वाची जागृती होत आहे. ‘हर घर दुर्गा‘ अभियानाचे सर्व स्तरातून स्वागतच आहे.
- सतीश सूर्यवंशी, संचालक, डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अॅण्ड ट्रेनिंग, मुंबई
9594969638