मविआत उबाठा गटाला 'इतक्या' जागा मिळणार! प्रकाश आंबेडकरांचा दावा
राज्यात सध्या सर्वच पक्षांमध्ये विधानसभेसाठी जागावाटप सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणाला किती जागा मिळणार यावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
28-Sep-2024
Total Views |
सांगली : राज्यात सध्या सर्वच पक्षांमध्ये विधानसभेसाठी जागावाटप सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणाला किती जागा मिळणार यावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला १५० जागा हव्या आहेत तर, ८८ जागांच्या खाली यायचं नाही असं शरद पवारांनी ठरवलं आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त ४४ जागा सोडायला ते तयार आहेत. या फॉर्म्युल्यामुळे बरंच राजकारण होईल असं मला ओबीसीचे नेते सांगत आहेत. सर्वात मोठा पेच हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर राहणार आहे," असा दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "एका सर्व्हेनुसार, उद्धव ठाकरेंकडे जे ५.७ टक्के मतदान होतं त्यापैकी २.७ टक्के मतदान लोकसभेनंतर एकनाथ शिंदेंकडे वळले आहे, असे काँग्रेसमधील लोकांचं मत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अधिक जागा देणं हे परवडणारं नाही. यावरून मविआत बराच संघर्ष सुरु आहे," असं त्यांनी सांगितलं.
आमच्यात कोणतंही भांडण नाही : संजय राऊत
प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आमच्यात काहीही भांडणं नाही. प्रकाश आंबेडकरांनी जर लोकसभेचे निकाल पाहिले असतील तर आमची वज्रमुठ मजबूत होती. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो. प्रकाश आंबेडकर जर आमच्यासोबत असते तर ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि भाजप शंभर टक्के नेस्तनाबूत झाला असता," असे ते म्हणाले.