आधी विज्ञानाची असलेली आवड पुढे कलाविश्वात घेऊन गेली. जाणून घेऊया ध्यान आणि रंग ही संकल्पना रूजवणार्या नाशिकच्या संध्या प्रभाकर केळकर यांच्याविषयी.
संध्या प्रभाकर केळकर यांचा जन्म नागपूरचा. आई गृहिणी, तर वडील पोस्ट खात्यात नोकरीला. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण सुळे महिला विद्यालयात पूर्ण केले. गणित आणि विज्ञान विषय संध्या यांच्या आवडीचे होते. शाळेत छोटी-मोठी चित्रे, घरी रांगोळ्या काढण्यापुरता रंगांशी संबंध होता. इयत्ता दहावीनंतर त्यांनी ’धरमपेठ सायन्स कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. या महाविद्यालयामधून त्यांनी १९७९ विज्ञान विषयात पदवी घेतली. महाविद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शनादरम्यान त्यांनी काही चित्रे काढली. त्यामुळे चित्रकलेत पुढे काहीतरी करता येईल, असा विश्वास त्यांना निर्माण झाला. पुढे पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे कलेची आवड जोपासण्यास त्यांनी प्राधान्य दिले. बाबुराव आठवले यांच्याकडे त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक धडे घेतले. प्रभाकर यांच्याशी विवाहानंतर संध्या यांची, नाशिक हीच कर्मभूमी झाली.
नाशिकमध्येच त्यांनी एलिमेन्ट्री आणि इंटरमिजिएट परीक्षा दिल्या. संध्या यांच्या सासूबाईंना त्यांची चित्रे भावली. त्यामुळे चित्रकलेत शिक्षण घेण्याविषयी सासूबाईंनी संध्या यांना विचारणा केली. अगदी मनातली इच्छाच सासूबाईंनी बोलून दाखविल्यामुळे, संध्या यांनीही लगेच होकार दर्शविला. नाशिकमधील चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. पाच वर्षांचे ‘डिप्लोमा इन आर्ट अॅण्ड पेटिंग’चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. गोदाकाठावर जाऊन त्या चित्रकलेचा सराव करत असत. चित्रे काढण्यासाठी यशवंतराव पटांगण, बुधवार पेठ, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर या ठिकाणांना त्यांचे नेहमी प्राधान्य असे. पुढे ‘एसएनडीटी विद्यापीठा’तून त्यांनी पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. पुढे एसएमआरके महाविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून रूजू झाल्या. कालांतराने त्यांनी विभाग प्रमुख म्हणून देखील जबाबदारी सांभाळली. तब्बल ३०वर्षांनंतर त्या निवृत्त झाल्या. ‘बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स’ या अभ्यासक्रमाच्या निर्मितीत त्यांचे योगदान होते. निवृत्तीनंतर ‘एसएमआरके’ आणि ‘नाशिक कलानिकेतन’मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. नेहरू सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, अमेरिका, नाशिक अशा अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. कुठेही भ्रमंतीला गेल्यानंतर संध्या या तेथील निसर्गाला कागदावर उतरवतात. अमेरिकेत गेल्यानंतर तेथील निसर्गाची अनेक चित्रणे त्यांनी काढली. वाराणसी, हंपी, चितौडगढ या ठिकाणीही त्यांनी चित्रे काढली. संसार, नोकरी या दोन्ही गोष्टींची सांगड घालत त्यांनी आपली कलेची आवड जोपासत, आतापर्यंत हजारो चित्रे रेखाटली आहे. संध्या यांनी घरातच एक स्वतंत्र स्टुडिओदेखील तयार केला आहे. संध्या यांना बाबुराव आठवले, शिवाजी तुपे, वा. गो. कुलकर्णी, गुरू अरूणाताई गर्गे, रवी परांजपे यांचे मोलाचे सहकार्य तथा मार्गदर्शन लाभले. वाचनाची आवड असल्याने संध्या यांनी कलेसंदर्भातील, तसेच भारतीय वैशिष्ट्यांची अनेक पुस्तके वाचली. महाविद्यालयात शिक्षणासंदर्भात मुलींच्या समस्या जशा त्यांच्यासमोर येत गेल्या, त्यानुसार त्यांनी लिहायला सुरुवात केली. मुलींना येणार्या अडचणींवर त्यांनी लिखाण सुरू केले. मागील वर्षी त्यांचे ‘चित्रसौंदर्य ः बोध आणि विचार’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
पुस्तकाला प्रस्तावना वासुदेव कामत यांची, तर दत्ता पाडेकर यांनी परीक्षण केले आहे. वासुदेव कामत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. सौंदर्य म्हणजे काय, चित्राचे सौंदर्य समजून कसे घ्यायचे, यावर पुस्तकात भाष्य केले आहे. संध्या ‘मिसळ क्लब’च्या सदस्या असून, यामध्ये कलाक्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे. या क्लबद्वारे प्रदर्शनासह विविध उपक्रम राबविले जातात. ‘ध्यान आणि रंग’ या संकल्पनेवर आधारित वर्गही संध्या सध्या घेतात.
विज्ञान ही पहिली, तर कला ही शेवटची पायरी आहे. चित्रकलेतून आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो. कलाक्षेत्रात प्रचंड मेहनत आणि कष्ट आहेत. त्यामुळे ज्याला कलेची आवड आहे, त्यानेच हे क्षेत्र निवडावे. आवड असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. भारतीय चित्रकला फारच सुंदर आहे. तिचा अभ्यास पुढे व्हावा, अशी मनोमन इच्छा आहे. पाश्चिमात्य कलेपेक्षा आपली भारतीय कला अतिशय उच्च दर्जाची आहे. आपल्या ऋषिमुनींनी आपल्यासाठी जे मांडून ठेवले आहे, ते फार उच्चकोटीचे आहे. त्याचे पाश्चिमात्य लोक अनुकरण करत असतात. कलेवर भरपूर लिखाण आधी झाले आहे. त्यामुळे भरपूर वाचन करायचे, आणि लोकांना समजेल अशा भाषेत लिहायचे, हा माझ्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. आपल्या मनात जे विचार आहेत, ते आपण सहज कागदावर उतरवू शकतो. रेषा, आकार, छाया यांचा थोडा जरी अभ्यास केला, तरी चित्र समजू लागते. कोणालाही चित्रकला शिकता येते. आपण तर लहानपणीच रेघोट्या मारत असतो, असे संध्या सांगतात.
भारतीय वैशिष्ट्ये, संस्कृती यांवरही त्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकातही यावर बरेच लिखाण केले आहे. भरतकाम आणि विणकाम त्याचबरोबर घरीच त्या गणेशमूर्ती घडवितात. सध्या त्या बासरीवादनाचे धडेही घेत आहेत. विज्ञानक्षेत्रातील प्रवासानंतर पुढे कलाक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणार्या, संध्या केळकर यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा.