प्रतिक नंदन तिरोडकर या युवा उद्योजकाने ‘रोबोटिक्स’च्या दुनियेत शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले आहे. त्याच्या या अनोख्या प्रवासाविषयी...
आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील असाच एक मानवी अविष्कार म्हणजे रोबोट्स अर्थात यंत्रमानव. अशा या ‘रोबोटिक्स’ क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारा २७ वर्षीय अवलिया म्हणजे प्रतिक तिरोडकर. शाळेत असताना प्रतिकला ‘रोबोटिक्स’ची काडीमात्र माहिती नव्हती. रोबोट्स कसे तयार होतात, याबद्दलही तो तसा अनभिज्ञचा होता. पण, आज ’पीएनटी रोबोटिक्स’ नावाची स्वतःची कंपनी प्रतिकने तयार केली असून, ‘रोबोटिक्स’च्या दुनियेत तो कार्यरत आहे.
ठाणे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात दि. २७ मार्च १९९७ रोजी प्रतिकचा जन्म झाला. डॉ. बेडेकर विद्यामंदिर या ठाण्यातील एका नामवंत शाळेत त्याने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शाळेत अतिशय शांत, सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी असलेला प्रतिक. विज्ञानाचा तास त्याला अतिशय प्रिय. कारण, प्रयोगशाळेत नवनवीन प्रयोग करायला मिळायचे. इतकेच नाही, तर विज्ञान विषयाला धरुन कुठली स्पर्धा आली की, त्यात सहभाग घेण्यासाठी तो कायम सर्वात पुढे असायचा. त्यासोबतच प्रतिकला क्रिकेटची प्रचंड आवड. शाळेच्या क्रिकेट टीमकडून तो खेळायचा सुद्धा.
प्रतिकचा जन्म तसा मराठमोळ्या मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्यामुळे घरच्यांना आपल्या शिक्षणाचा आर्थिक भार पडू नये, म्हणून दहावीनंतर प्रतिकने डिप्लोमा करण्याचे ठरविले. २०१४-१५ दरम्यान ’गर्व्हमेंट पॉलिटेक्निक, मुंबई’ येथे डिप्लोमाचे शिक्षण सुरु झाले. दुसर्या वर्षाला ’रोबोटिक्स’ची कार्यशाळा भरवण्यात आली होती. त्या दोन दिवसांत प्रतिकला जे काही ज्ञान मिळाले, त्यातच त्याची रोबोट्सशी खरी नाळ जोडली गेली आणि मग त्या दिवसापासून पुढे या विषयात त्याने सखोल अभ्यास करायला सुरुवात केली.
२०१६ मध्ये पहिली मोठी कामगिरी केली, ती म्हणजे ’बिल्ड माय प्रोजेक्ट’ नावाचा स्वतःचा स्टार्टअप सुरु केला. येथून मराठी युवा उद्योजक म्हणून प्रतिकची सुरुवात झाली. रिसर्च करताना समोर बरीच आव्हाने येत होती. परंतु, आव्हाने स्वीकारताना, त्यांना सामोरे जाताना तो कधीच डगमगला नाही. एकीकडे, स्वतःचे कॉलेज सुरु असताना दुसरीकडे, इतर कॉलेजात जाऊन मुलांना रोबोटिक्स विषयाचे मार्गदर्शन करू लागला. त्याने आयआयटी, एनआयटी सारख्या ठिकाणी गेस्ट लेक्चर्स दिले आहेत. एका मोठ्या खासगी कंपनीतूनही त्याला नोकरीची संधी चालून आली होती. मात्र, त्याने डिप्लोमानंतर डिग्रीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. २०१६ रोजी खारघरच्या भारती विद्यापीठातून डिग्रीचे शिक्षण सुरु झाले. याचदरम्यान त्याने ’पीएनटी कोर्सेस’ नावाची कंपनीही सुरु केली होती.
२०१८ सालामध्ये पाण्यावर चालणारा दिवा सर्वांना प्रचलित झाला होता. त्याचा शोधही प्रतिकनेच लावला. ‘उरी’ चित्रपटात जो ’ऑर्निथॉप्टर रोबोट’ आहे (उडणारा पक्षी) तो कसा तयार होतो, याचे प्रशिक्षणही प्रतिकच्या मार्गदर्शनाखाली आज दिले जाते. असे असले तरीही अजून बर्याच जणांना ‘रोबोटिक्स’च्या क्षेत्राची इत्यंभूत माहिती नाही. म्हणून मग ‘रोबोटिक्स’ या विषयाची जनजागृतीसाठी प्रतिकने विविध संस्थांमध्ये मोफत ‘गेस्ट लेक्चर्स’ देण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रतिकने ठाणे महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानाअंतर्गत ‘रोबोटिक्स’शी संबंधित काम केले आहे.
‘कोविड’ काळात त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल अनेक माध्यमांपासून ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा घेतली आहे. त्याकाळी परिचारिका, वॉर्डबॉय हे कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करताना पुरेपूर काळजी घेत होते. तेव्हा, डॉक्टरांना मदत होईल या अनुषंगाने प्रतिकने ठाणे महानगरपालिका व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस २२ असे रोबोट्स तयार करून दिले, जे रुग्णसेवेत रुजू होतील. ’आयओटी टेक्नोलॉजी’वर चालणारा जगातील सर्वात पहिल्या रोबोटची निर्मिती प्रतिकने कोरोनाकाळात केली होती. ’मन की बात’मधून पंतप्रधानांनी याचे कौतुक केले होते. प्रतिकने जेव्हा ’पीएनटी रोबोटिक्स’ कंपनी सुरु केली, तेव्हा ’शार्क टॅन्क’च्या २०२१ सालच्या सिझनमध्ये बोलणारा, मनुष्यांची भावना जाणणारा ’अॅडो’ नावाचा रोबट सर्वांसमोर आणला होता. ते पाहून ‘लेन्सकार्ट’चे संस्थापक पियुष बंसल यांनी गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
देशासाठी काहीतरी करण्याची त्याची पूर्वीपासूनच इच्छा होती. आज भारतीय सैन्य, नौदल, डीआरडीओ, टाटा पॉवर यांसारख्या ठिकाणी त्यांच्या ‘कस्टम रिक्वायरमेंट’मध्ये ‘रोबोटिक्स’च्या मदतीने तो हातभार लावत आहे. दहा बाय दहाच्या खोलीत पाहिलेले स्वप्न आज एका प्रशस्त खोलीत येऊन पूर्ण होताना तो पाहतो आहे. त्याचा व्यवसाय वाढवण्यात त्याची पत्नी, आई आणि वडिलांचा मोठा पाठिंबा आहे. आताचा कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर साधारण सहा कोटींपर्यंतचा आहे. पूर्वी १२ लोकांची टिम, आता २२ पर्यंत येऊन पोहोचली आहे. आयुष्यात आपल्या कंपनीला एक अब्ज डॉलर्सची कंपनी बनवण्याचे त्याचे स्वप्न आहे. सध्या कृषीसंबंधित रोबोट्सवर काम सुरु आहे. प्रतिक म्हणतो की, “व्यवसाय म्हटलं की आव्हाने आहेतच, मात्र आव्हानांवर मात करायची हिंमत असेल, तर कुठलाही मराठी माणूस स्वतःचा व्यवसाय करू शकतो.” हाच कानमंत्र प्रतिक नवउद्योजकांना देतो. प्रतिकला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराच्या वतीने अनेकानेक शुभेच्छा!
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक