"देवाच्या हातातील काठी दिसत नाही, पण..."; संजय राऊतांवर भाजपची टीका

    26-Sep-2024
Total Views |
 
Sanjay Raut
 
मुंबई : देवाच्या हातातील काठी दिसत नाही, पण तिचा आवाज येतो. पण त्या लाठीचा जेव्हा फटका बसतो तेव्हा खूपच वेदना होतात, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊतांना एका मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "देवाच्या हातातील काठी दिसत नाही, पण तिचा आवाज येतो. पण त्या लाठीचा जेव्हा फटका बसतो तेव्हा खूपच वेदना होतात. देवाच्या लाठीपासून वाचण्यासाठी कर्म चांगली करा असं संत सांगतात. पण स्वत:ला सगळी अक्कल आहे असे सांगणा-या संजय राऊतांसारख्यांना न्यायालयाव्दारे देवाच्या लाठीचा फटका बसतो."
 
हे वाचलंत का? -  राऊतांच्या मुद्द्यावर मला काही घेणंदेणं नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
 
"भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमैय्या यांच्यावरही खोटे आरोप करणा-या संजय राऊतांचे पितळ न्यायालयाने उघडे पाडले. याच संजय राऊत यांच्या विरोधात अन्य तक्रारी पोलीसांकडे आहेत. आता ते बदलापूर प्रकरणातील पिडितेच्या नव्हे तर अक्षय शिंदेच्या मागे ऊभे आहेत," असेही ते म्हणाले.
 
नेमकं प्रकरण काय?
 
मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात न्यायालयाने संजय राऊतांना दोषी ठरवले आहे. त्यांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर संजय राऊतांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.