काँग्रेस, ठाकरेंचे स्वप्नरंजन

    26-Sep-2024   
Total Views |
 
 Congress And UBT
 
 मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये,’ असे म्हणतात. पण, उंदराला मांजर साक्ष असलेल्या महाविकास आघाडीला ते कोण समजावेल? लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे तोंडावर काय आपटले, काँग्रेस आणि शरद पवारांनी त्यांची गोची करण्यास सुरुवात केली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असे ’पेड’ सर्व्हे काही माध्यमांनी दाखवल्यानंतर प्रदेश काँग्रेसमधील पुढार्‍यांची छाती इतकी फुगली की श्वास घेणेही अवघड. काहींना तर मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडले आणि त्यांनी त्या खुर्चीवर बसायलादेखील (स्वप्नात) सुरुवात केली, अशी कुजबूज टिळक भवनात ऐकू येते.
 
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये,’ असे म्हणतात. पण, उंदराला मांजर साक्ष असलेल्या महाविकास आघाडीला ते कोण समजावेल? लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे तोंडावर काय आपटले, काँग्रेस आणि शरद पवारांनी त्यांची गोची करण्यास सुरुवात केली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असे ’पेड’ सर्व्हे काही माध्यमांनी दाखवल्यानंतर प्रदेश काँग्रेसमधील पुढार्‍यांची छाती इतकी फुगली की श्वास घेणेही अवघड. काहींना तर मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडले आणि त्यांनी त्या खुर्चीवर बसायलादेखील (स्वप्नात) सुरुवात केली, अशी कुजबूज टिळक भवनात ऐकू येते. असो. पण, या सगळ्यात उद्धव ठाकरेंची चूक काय? मविआच्या वाटपात त्यांनी १०० जागांची मागणी केल्यावर काँग्रेस नेत्यांनी आकांडतांडव का सुरू करावा? बिचार्‍या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी हायकमांडसमोर मुजरे झाडल्यानंतरही नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि स्वतः शरद पवारांनी त्यांच्या वाटेत काटे पेरले. बरे, ‘मुख्यमंत्रिपद नको, त्याऐवजी १० जागा द्या,’ अशी मागणी त्यांनी कातर स्वरात करून पाहिली. पण, त्यांचे ऐकतील ते काँग्रेसी कसले? शरद पवारांनी आधीच कान भरल्यामुळे काँग्रेसने ठाकरेंसमोर केवळ ८० जागांचा प्रस्ताव ठेवला. पवार ८० लढतील, त्यामुळे तुम्हालाही तेवढ्याच जागा लढावाव्या लागतील, असे उपदेशाचे डोसही पाजले.
 
एका अर्थी काँग्रेसचेही बरोबर म्हणा. ५० जागांवर सक्षम उमेदवार देताना पंचाईत, तिथे १०० उमेदवार कुठून आणणार? पण, ठाकरेंना सल्ला देणार्‍या काँग्रेसची तरी अवस्था कुठे चांगली? तरी ते १२५ जागांवर ठाम असल्यामुळे म्हणे उद्धवरावही १०० वर अडून बसलेत. या दोघांचे भांडण शरद पवार सोडवतील, अशी अपेक्षा. पण, त्यांना त्यात अजिबात रस नाही. १०० लढवा किंवा १५०, शेवटी तुमच्या गळ्यात निवडून न येणार्‍याच जागा मारणार, असा पवारांचा होरा. पवारांनी ८० जागा आधीच निवडल्या, उमेदवारही ठरवलेत. त्याची यादी मविआच्या अंतिम बैठकीत ठेवतील. ती निमुटपणे मंजूर करावी लागेल. यात नुकसान होईल ते काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचे! त्यामुळे आपल्याच पोळीवर तूप ओढण्याची स्पर्धा यांनी वेळीच थांबवली नाही, तर पवार ऐनवेळी डाव असा टाकतील, की मुख्यमंत्रिपदच काय, इच्छुकांना मतदारसंघ वाचवणे देखील अवघड होऊन बसेल.
 
राऊतांच्या जिभेला वेसण
 
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे’ ही ग्रामीण महाराष्ट्रातील प्रचलित म्हण. ’येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे’ असा तिचा अर्थ. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना ती तंतोतंत लागू पडते. दररोज सकाळी ९ वाजता राऊतांच्या तोंडाचा भोंगा वाजतो. ना-ना तर्‍हेच्या आरोपांची राळ उठवत महायुतीच्या, विशेषतः भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचा त्यांचा दिनक्रम. हाती कोणतेही पुरावे नसताना, केवळ जीभेची हौस भागवावी म्हणून की काय राऊत बरळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नसावी. या महनीय व्यक्तींचे काम इतके मोठे की, राऊतांसारख्यांच्या थिल्लर विधानांकडे पाहण्यास वेळच नाही. त्यामुळे राऊत वेळोवेळी कचाट्यातून सुटतात.
 
अशा बिनबुडाच्या आरोपांकडे सगळेच दुर्लक्ष करतील, असे नाही. संजय राऊत चुकून एकदा मेधा सोमय्यांच्या तावडीत सापडले आणि त्यांनी राऊतांच्या नाकात बिनदोर्‍याची वेसण घातली. झाले असे की, खोटी देयके सादर करून सोमय्यांनी मीरा-भाईंदर पालिकेच्या अधिकार्‍यांना फसवल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. मेधा यांचे पती किरीट सोमय्यांना टार्गेट करायच्या नादात ऐकीव माहितीच्या आधारे तोंडाचा विचका केला. माहिती निघाली खोटी. सोमय्या कुटुंबीयांनी थेट न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला.
 
न्यायालयाने सगळे पुरावे पाहत, राऊतांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावताना, त्यांच्या कृत्याची कठोर शब्दांत निंदा केली. पत्राचाळ गैरव्यवहारात कोट्यावधी खाऊन पचवलेले राऊत दुसर्‍यांवर बिनबुडाचे आरोप करताना स्वतःच्या घरात कधी झाकून पाहत नाहीत. भांडुपमधील पंचतारांकीत बंगला, दादर आणि आरे कॉलनीतील फ्लॅट, अलिबागमधील जमीन, पालघर आणि रायगडमधील बिगरशेती मालमत्ता, भांडुप-सायनसह मुंबईतील अन्य ठिकाणी असलेल्या मालमत्ता कशा जमवल्या, याचा एकदा हिशेब त्यांनी द्यावा. त्याचप्रमाणे, स्वप्ना पाटकर यांच्यावर झालेल्या अत्याचारांबाबत एखादी जाहीर पत्रकार घेऊन दाखवावी, म्हणजे तुम्ही खरेच धुतल्या तांदळासारखे आहात, हे सिद्ध होईल!
 

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.