रोज मरे त्याला कोण रडे! जरांगेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया
25-Sep-2024
Total Views |
पुणे : मनोज जरांगेंनी बुधवारी आपले उपोषण स्थगित केले. यावर रोज मरे त्याला कोण रडे, ते सारखेच उपोषण करतात, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच हिंमत असेल तर विधानसभेला २८८ जागा लढा, असे आवाहनही त्यांनी दिले.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "मनोज जरांगे अनेकवेळा उपोषण करतात आणि सोडतात. ते प्रत्येकवेळी आमरण उपोषण करतात. त्यांनी उपोषण का सोडलं? त्यांना कुणी सरकारतर्फे काही आश्वासन दिलं का, याबद्दल मला माहिती नाही," असे ते म्हणाले. तसेच सरकारने जरांगेंकडे दुर्लक्ष केलं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "रोज मरे त्याला कोण रडे. ते सारखेच उपोषण करतात. सरकारने तेवढंच काम करायचं का?" असा सवालही त्यांनी केला. हिंमत असेल तर विधानसभेला २८८ जागा लढा. किमान ८० जागा तरी लढून दाखवा आणि ८ तरी निवडून येऊ दे. त्यांनी हे आव्हान स्विकारावं, असेही ते म्हणाले.