हात बांधलेले असताना आरोपीने गोळीबार कसा केला? सुप्रिया सुळेंचा सवाल
24-Sep-2024
Total Views |
मुंबई : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे हात बांधलेले असताना त्याने गोळीबार कसा केला? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. अक्षय शिंदेचा पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर केला. यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी. हा देश नियम, कायदे आणि संविधानाने चालतो. त्यामुळे त्या नराधमाला फाशी मिळावी, ही आजही माझी मागणी आहे. कुणीही असं घाणेरडं, गलिच्छ कृत्य केलं तर त्या व्यक्तीला फास्ट ट्रॅक कोर्टने चौकात फाशी द्यावी, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. पण हा देश संविधानाने चालतो. त्यामुळे असा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. काल झालेल्या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. त्या आरोपीचा मृत्यू झाला हा भाग वेगळा पण मला त्या पोलिसाची काळजी आहे. कारण जर आरोपीचे दोन हात बांधलेले आहेत तर त्याने बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर गोळीबार कसा केला? त्या पोलिसाला काही गंभीर झालं नाही, हे आपलं भाग्य आहे. पण जर काही गंभीर झालं असतं तर काय? याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवं." असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "एक गुन्हेगार पोलिसावर गोळीबार करतो. म्हणजे राज्यातील पोलिसही सुरक्षित नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे या राज्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर आहेच पण आता पोलिस सुरक्षित नाही का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.