"काँग्रेस आणि तुतारी रोज उठसुठ ठाकरेंना..."; नितेश राणेंचा घणाघात
23-Sep-2024
Total Views |
मुंबई : काँग्रेस आणि तुतारी रोज उठसुठ उद्धव ठाकरेंना लायकी दाखवत आहेत, असा घणाघात भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे. नाना पटोलेच मुख्यमंत्री व्हावेत. त्यांना जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही मुख्यमंत्रीपद खेचून आणू, असं वक्तव्य नागपूरमधील काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी केलं होतं. यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.
नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि उबाठाला महाविकास आघाडीत दमडीचीही किंमत नाही. त्यामुळे तुम्ही घराबाहेर कितीही भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावले तरी या विधानसभा निवडणूकीत ठाकरे संबंधित कोणीही मुख्यमंत्री होत नाही. काँग्रेस आणि तुतारी रोज उठसुठ उद्धव ठाकरेंना लायकी दाखवत आहेत," असे ते म्हणाले.
मातोश्रीचं रिमोट १० जनपथवर ठेवलंय!
ते पुढे म्हणाले की, "दिल्लीच्या एका नेत्याने उद्धव ठाकरेंना सांगितलंय की, तुम्हाला मविआमध्ये राहायचं नसल्यास तुम्ही स्वबळावर लढू शकता. तरीसुद्धा उद्धव ठाकरे मविआच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी तो आवाज दिल्लीला जाईपर्यंत म्याऊ म्याऊ असा होईल. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना सरकारचे रिमोट कंट्रोल मातोश्रीवर असायचं. आता मातोश्रीचं रिमोट हे १० जनपथवर ठेवलेलं आहे. तिथून जो आदेश येईल तो पाळला जातो," असेही ते म्हणाले.