आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक! राज्यभरात रास्ता रोको
23-Sep-2024
Total Views |
मुंबई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सोमवारी राज्यभरात रास्ता रोको करण्यात आलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली शांततामय आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले. सरकारने तात्काळ एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, "महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची आमची मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून हा संघर्ष सुरु आहे. आदिवासी समाजातील मुळ ७ टक्के आरक्षणाला धक्का लागावा असं धनगर समाजाचं म्हणणं नाही. अतिक्रमण करणं किंवा घुसखोरी करणं हा धनगर समाजाचा स्वभाव नाही. त्यांच्या ७ टक्के आरक्षणाचा एसटी अ असा वेगळा प्रवर्ग करावा आणि धनगर जमात जी भटक्या विमुक्तांमध्ये आहे त्यांचं साडेतीन टक्के आरक्षण वेगळं आहे. हे साडेतीन टक्के आरक्षण एसटी ब असं वेगळं करावं. त्यामुळे एसटी आणि धनगर या दोन्ही समाजांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आरक्षण वेगळं राहिल. यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही."
"तरीसुद्धा आदिवासी जमातीचे आमदार वारंवार सरकारला धमकी देत आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रातील धनगर जमातीने रस्त्यावर उतरण्याचं ठरवलं आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागत नसतानाही धनगर जमातीच्या आरक्षणाला विरोध सुरु असल्याने आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. सरकारने तात्काळ एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी माझी त्यांना मागणी आहे," असे त्यांनी सांगितले.