‘ती’ ची लेखणी

    22-Sep-2024
Total Views |
booker prize womens nominees
 

इंग्रजी साहित्य क्षेत्रातील एक मानाचा आणि महत्त्वाचा पुरस्कार म्हणून, ‘बुकर’ पुरस्कार म्हणून ओळखला जातो. या पुरस्कारासाठी 2024 मधील नामांकने काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली. यावर्षी या पुरस्कारासाठी जाहीर झालेल्या नामांकनांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, कारण जाहीर झालेल्या एकूण सहा नावांपैकी पाच नावे ही स्त्रियांची आहेत.

‘बुकर’ पुरस्काराला 1969 साली सुरुवात झाली. ‘बुकर मॅककॉनेल लिमिटेड’ या संस्थेने या पुरस्काराची सुरुवात केली. इंग्रजी भाषेत लिहिलेल्या दर्जेदार साहित्याचा सन्मान करण्यासाठी, या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. 1969 साली सर्वप्रथम हा पुरस्कार लेखक पी. एच. न्यूबी यांना, त्यांच्या ‘समथिंग टू आन्सर फॉर’ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी या पुरस्काराची नामांकने जाहीर करून, निवडसमिती त्यातून विजेत्याची निवड करते आहे. गेली 55 वर्षे या पुरस्काराची ही परंपरा सुरू आहे. पण, यावर्षी 55 वर्षांमध्ये पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी, मोठ्या संख्येने महिलांना नामांकने मिळाली आहेत.

सहा नावांपैकी पाच नावे ही महिलांचीच आहेत. या पाच नावांमध्ये अमेरिकेच्या रेचेल कुशनर, इंग्लंडच्या सामंथा हार्वे, कॅनडाच्या अ‍ॅनी मायकेल्स, नेदरलँडच्या याएल व्हॅन डेर वुडेन’ आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘शार्लोट वुड’ या लेखिकांचा समावेश आहे. रेचेल कुशनर यांना त्यांच्या ‘क्रिएशन लेक’, सामंथा हार्वे यांना ‘ऑर्बिटल’, अ‍ॅनी मायकेल्स यांना ‘हेल्ड’, याएल व्हॅन डेर वुडेन यांना ‘द सेफकीप’ आणि शार्लोट वुड यांना ‘स्टोन यार्ड डिवोशन’ या पुस्तकांसाठी नामांकित करण्यात आले आहे. नेदरलँडच्या लेखिकेची या पुरस्कारासाठी निवड होण्याचीसुद्धा ही पहिली वेळ आहे, आणि तो मान ‘याएल व्हॅन डेर वुडेन’ यांनी पटकावला आहे. निवडलेल्या पुस्तकांमध्ये जे सहावे पुस्तक आहे, ते म्हणजे लेखक पर्सिवल एवरेट लिखित ‘जेम्स’.

2023-2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या एकूण 156 पुस्तकांमधून, ही नामांकित झालेली सहा पुस्तके निवडण्यात आली आहेत. ही पुस्तके नवोदितांना वाचायला, लिहायला प्रेरित करणारी, आणि वाचून झाल्यावर ती इतरांनाही वाचायला सांगावी, अशी आहेत; अशा प्रतिक्रिया निवडसमितीतील सदस्यांनी मांडल्या आहेत. निवडलेल्या पुस्तकांपैकी अधिक पुस्तके महिलांची आहेत, हे माहीत झाल्यावर निवडसमितीलासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. निवडसमितीतील सदस्यांपैकी एक असणार्‍या लेखिका सारा कॉलिन्स यांनी “निवड झालेली ही सहा पुस्तके उत्तम असल्यामुळेच निवडली गेली आहेत. या सहा पुस्तकांपैकी पाच पुस्तके स्त्रियांनी लिहिलेली आहेत, ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या या साहित्यिक क्षेत्रात, ओळख मिळवण्यासाठी स्त्रियांना अनेक शतके खूप संघर्ष करावा लागला. या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी त्यांना खूप वाट पाहावी लागली. त्यामुळे या यादीत पाच महिलांची नावे असणे, हा त्यांच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे.” अशा भावना मांडल्या.

दि. 12 नोव्हेंबर रोजी लंडनमधील ओल्ड बिलिंग्जगेट येथे ‘बुकर’ पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात विजेत्याची घोषणा केली जाणार आहे. ‘बुकर’ पारितोषिक मिळवणार्‍या लेखकाला 50 हजार पाऊंड स्टर्लिंग आणि इतर पाच नामांकित लेखकांना 2 हजार, 500 पाऊंड स्टर्लिंग इतकी रक्कम पारितोषिकाच्या स्वरूपात मिळणार आहे. शिवाय, ‘बुकर’ पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे, या लेखक-लेखिकांच्या पुस्तकांचा जगभरातील खप भरपूर वाढेल, यात काही शंका नाही.

यावर्षी या सहा लेखक-लेखिकांपैकी ‘बुकर’ पुरस्कार कोण जिंकणार, हे जरी अद्याप निश्चित नसले, तरी ‘बुकर’सारख्या नावाजलेल्या पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीत महिलांची नावे अधिक असणे, यावरून साहित्य क्षेत्रातील महिलांचे योगदान मात्र जिंकलेले आहे, हे ठामपणे सांगता येईल. फक्त इंग्रजी साहित्यातच नाही, तर प्रत्येक भाषेतील साहित्यात स्त्रियांचे योगदान खूप मोलाचे आहे. अनेक शतकांपासून स्त्रिया लिहित आहेत, साहित्यिक क्षेत्रात योगदान देत आहेत, पण वाङमयीन इतिहास पाहिला, तर त्यांच्या योगदानाची फारशी दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे यावर्षीच्या ‘बुकर’ पुरस्काराच्या नामांकनयादीत महिलांचे असणारे वर्चस्व हे फक्त या क्षेत्रातीलच नाही, तर जगभरातील प्रत्येक क्षेत्रातील महिलांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल.

दिपाली कानसे