‘उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं हा विरोधकांचा अपप्रचार’

‘रीन्यू पॉवर’च्या निवेदनाचा दाखला देत फडणवीसांचे प्रत्युत्तर

    21-Sep-2024
Total Views |

renew
 
मुंबई, दि. २०: (ReNew power plant) राज्यातील प्रकल्प गुजरातला आणि राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधी पक्ष काँग्रेस आणि मविआ सातत्याने करत आहे. नुकतेच काँग्रेसने आमदार आणि विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘रिन्यू पॉवर प्लांट’ महाराष्ट्रातून गुजरातला गेला, अशी माहिती दिली. मात्र या अपप्रचाराची खुद्द कंपनीनेच निवेदन काढत पोलखोल केली. इतकेच नाही, तर महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवणार असल्याची माहितीही दिली. याच निवेदनाचा हवाला देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
 
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आमचा विरोधी पक्ष सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहे. ‘रिन्यू पॉवर प्लान्ट’ महाराष्ट्रातून गुजरातला गेला, असा अप्रचार त्यांनी केला. मात्र आता ‘रिन्यू पॉवर प्लान्ट’ कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी सांगितलं आहे की, ’आम्ही महाराष्ट्रातच आहोत. आम्ही महाराष्ट्रातून कुठेही जाणार नाही. उलट आम्ही येथील गुंतवणूक वाढवणार आहोत. आम्ही राज्याला एक वचन दिले आहे, जे तंतोतंत पाळणार आहोत’. ‘रिन्यू पॉवर प्लान्ट’च्या या निवेदनामुळे विरोधी पक्ष तोंडावर पडला आहे,” असे फडणवीस म्हणाले.
 
महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात १८ हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. “हिंदू-मुस्लीम वाद, जीभ कापा-जिभेला चटके द्या, पक्ष फोडा, आमदार पळवा सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातेत गेला,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
 
कंपनीचे निवेदन नेमके काय?
 
नागपुरातील माध्यमांमध्ये प्रसारित केलेल्या बातम्या दिशाभूल करणार्‍या आहेत. हे आरोप केवळ दिशाभूल करणारा आणि वस्तुस्थितीनुसार चुकीचाच नाही, तर बेजबाबदारही आहे. कंपनी महाराष्ट्रात सौर उत्पादनाच्या अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. कंपनी गुजरात किंवा इतर कोणत्याही राज्यात तत्सम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत नाही. रिन्यू ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नवीकरणीय ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी राज्यातील आपल्या वचनबद्धतेवर कायम आहे. कंपनीकडे महाराष्ट्रात ५५० मेगावॅटची स्थापित क्षमता आहे आणि अतिरिक्त दोन हजार मेगावॅट निर्माणाधीन आहे. १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत दोन हजार मेगावॅट स्थापित करण्याच्या मार्गावर आहे. कंपनी राज्य सरकारच्या सहकार्याने काम करत राज्यात पंपयुक्त हायड्रो स्टोरेजसह ग्रीन हायड्रोजन उत्पादनक्षमता स्थापित करण्याचा विचार करत आहे. हे प्रकल्प सुमारे ३० हजार नोकर्‍या निर्माण करतील. रिन्यू महावितरणला अतिशय स्पर्धात्मक दराने ५५० मेगावॅट वीजपुरवठा करत आहे. विद्यमान आणि वचनबद्ध एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह राज्यात स्वच्छ ऊर्जा वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रिन्यू महाराष्ट्र राज्याशी असलेल्या आपल्या संबंधांना मनापासून महत्त्व देते आणि राज्याच्या विकासासाठी वचनबद्ध भागीदार आहे.