देवभूमी हिमाचल प्रदेशमधील शिमला येथील संजोली मशिदीविरोधात स्थानिक जनता प्रचंड आक्रोशाने रस्त्यावर उतरली. आंदोलने झाली, मोठ्या संख्येने मोर्चेही निघाले. नुकतेच मशीद कमिटीने जाहीर केले की, मशिदीचे अनधिकृत बांधकाम ते स्वत: पाडतील. या अनधिकृत बांधकामाबाबत मशीद समितीला वेळा न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली होती, तर ४४ वेळा याबाबत न्यायालयात सुनावणीही झाली होती. त्यानिमित्ताने संजोली मशिदीविरोधात आक्रमक जनमताचा मागोवा घेणाराहा लेख...
आम्हाला ही अनधिकृत बांधकाम केलेली मशीदच नको’ म्हणत हिमाचल प्रदेशातील हिंदू बांधव संजोली येथे रस्त्यावर उतरले. या हिंदूंचा आक्रोश इतका परिणामकारक होता की, संजोली मशीद समितीने पुढाकार घेत म्हटले की, ते मशिदीचा अनधिकृत भाग पाडून टाकतील. हे एक आक्रितच म्हणावे लागेल. कारण, आजपर्यंत या मशिदीच्या अनधिकृत बांधकामाबद्दल मशिदीला ३४ वेळा न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली होती आणि मशिदीच्या अनधिकृत बांधकामाबद्दल न्यायालयात ४४ वेळा सुनावणीही झाली होती. तेव्हा कधीही समितीने स्वत:हून म्हटले नाही की, ‘आम्ही मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडू.’ पण, आता त्यांनी तसे जाहीर केले आहे. असो. या सगळ्या प्रकरणात एक मुद्दा ऐरणीवर आहे तो म्हणजे, अनेक वर्षे विवादात असलेल्या या संजोली मशिदीविरोधात आज हिंदू बांधव इतके आक्रमक का झाले?
शिमल्यातील संजोलीमध्ये साधारण दहा वर्षांपूर्वी एक कुणाल नावाचा माणूस राहायला आला. या कुणालने यथावकाश येथील हिंदू मुलीशी प्रेमविवाहही केला. पण, मुळात कुणाल हा कुणाल नव्हता, तर तो ‘गुलनवाज’ होता. तो ‘कुणाल’ बनून आला, त्याने हिंदू महिलेशी विवाह केला. त्यानंतर स्वत:ला स्थिरस्थावर केले. काही वर्षांतच तिथे तीन दुकानेही खरेदी केली आणि दुकानांत काम करण्यासाठी हिमाचल प्रदेशाच्या बाहेरील त्याच्या गावची मुस्लीम कुटुंबांनाही बोलावून घेतले. हे सगळे पाहून हिमाचलच्या लोकांना वाटले की, अरे असेही होऊ शकते का? गुलनवाजकडे अचानक इतके पैसे कुठून आले की, तो तीन-तीन दुकाने खरेदी करु शकला. त्याला हिमाचली लोकांनी स्थैर्य दिले. मात्र, दुकानांमध्ये सगळ्या कामांसाठी त्याने स्थानिक हिमाचलींना विचारले नाही, तर बाहेरून मुस्लीम लोकांना बोलावले आणि तिथेच वसवले.
एक गुलनवाज दहा वर्षांपूर्वी आला आणि संजोलीचे सामाजिक, धार्मिक रूपडे पालटू लागले. या सगळ्यामुळे संजोलीमधले हिंदू सजग झाले. अशाच वातावरणामध्ये दि. ३१ ऑगस्ट रेाजी संजोलीचा एक दुकानदार विक्रम सिंग रात्री दुकान बंद करून घरी येत होता. गुलनवाजच्या दुकानासमोर मुस्लीम युवकांचे टोळके गलिच्छ भाषेत आरडाओरड करताना त्याला दिसले. विक्रम सिंगने गुलनवाजला याबाबत विचारले, तेव्हा त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे विक्रम यांनी बाजार समितीचे सदस्य यशपाल शर्मा यांना बोलावले. मात्र, गुलनवाजने सारिक, सैफअली, रिहान, समीर आणि रियानसह यशपाल आणि विक्रमला रॉडने मारहाण सुरू केली. पोलिसांनी एका-दोघांना पकडलेही. पण, बाकीचे फरार झाले. स्थानिक जनतेचे म्हणणे होते की, यशपाल आणि विक्रम यांना मरेपर्यंत मारहाण करणारे ते गुन्हेगार संजोलीतील मशिदीमध्ये लपून बसले. मशिदीचा असा वापर? त्यामुळे स्थानिक हिंदूंना भीती वाटली की, उद्या मोठ्या प्रमाणात काही तरी षड्यंत्र रचून त्याची कार्यवाही होऊन गुन्हेगार अशाच प्रकारे मशिदीच्या आश्रयाला गेले तर? कारवाई कशी होणार? त्यामुळे हिंदूंनी या मशिदीविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले.
तसे पाहायला गेले, तर हिमाचल प्रदेशात मुस्लिमांची लोकसंख्या १.९०लाख आहे. मात्र, ही लोकसंख्या नोंद झालेल्यांची आहे. प्रवासी मुस्लिमांची संख्या यात नोंदवलेली नाही. तसेच २००१ ते २०११च्या दरम्यान येथे मुस्लीम लोकसंख्या २५ टक्क्यांनी वाढली. हिमाचल प्रदेशची मुस्लीम लोकसंख्या २००१ साली १.१९लाख होती, जी २०११ साली १.४९लाखांपर्यंत पोहोचली. याचाच अर्थ मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर २५.६टक्के आहे, तर हिंदूंची लोकसंख्या वृद्धीचा दर केवळ १२ टक्के इतका आहे. ‘हिंदू जागरण मंचा’च्या एका अहवालानुसार, कोरोना काळापूर्वी राज्यात एकूण ३९३मशिदी होत्या, त्यांची संख्या आता अचानक वाढून ५२० इतकी झाली आहे. तसेच या मशिदी १०० टक्के हिंदू असलेल्या परिसरातच अनधिकृतरित्या बांधल्या जात आहेत. या सगळ्यामुळे हिमाचल प्रदेशातील हिंदू जागृत झाला. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षांत काही घटना अशाही घडल्या की, ज्यामुळे हिंदू समाज आक्रमक झाला. स्थानिकांचे म्हणणे आहे की, हिमाचल प्रदेशच्या चंबा, तीसा, सलोली, साहू, नूरपूर, बनीखेत, बैजनाथ, भवारना, बरोट, चातड़ा, इंदौरा, ज्वाली, फतेहपूर, वल्ह वगैरे भागांत मुस्लीम जे मुख्यत: ‘गुज्जर’ म्हणून ओळखले जातात, त्यांच्यामध्ये कुठे बरेलवी, तर कुठे देवबंद, तबलिगी जमात सक्रिय झाली. ते मुस्लिमांना कट्टरतावादी प्रवचने देऊ लागले.
त्यामुळे कधी नव्हे ते इथले मुस्लीम पुरूष दाढी राखून टोपी घालू लागले, तर बायका बुरखा घालू लागल्या. मुस्लीम कट्टरतेकडे झुकू लागले. ‘लव्ह जिहाद’च्या घटनाही वाढू लागल्या. एक प्रातिनिधिक घटना पाहू. २०२३साली हिमाचल प्रदेशातील मंडी येथे जम्मू-काश्मीरमधील एक युवक आला. आपले नाव सोनू असून, आपण हिंदू आहोत, तसेच भारतीय लष्करात सैनिक असल्याचे सांगत, तो तिथे भाड्याने राहू लागला. तिथे एका हिंदू मुलीसोबत त्याने ओळख वाढवली. त्याने त्या हिंदू मुलीला पळवून काश्मीरमध्ये नेले. तिथे गेल्यावर मुलीला कळले की, तो ना हिंदू होता, ना तो सैन्यातला सैनिक होता. तो तर काश्मीरचा अयाज नावाचा मुस्लीम होता. त्याने तिला हिंदू अशी ओळख पटवून देत फसवले. या घटनेमुळेही हिमाचल प्रदेशमध्ये वातावरण तापले. दुसरीकडे मनोहर नावाचा एक हिंदू युवक आणि मुस्लीम युवतीचे प्रेम होते. म्हणून मुस्लीम कुटुंबाने मनोहरचे तुकडे तुकडे करून नाल्यात फेकल्याची घटनाही उघडकीस आली होती. तसेच एका घटनेत गाय कापून फेकून देण्यात आली आणि त्याच परिसरातील शिवलिंगाची नासधूसही करण्यात आली होती. अशा एक ना अनेक घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडू लागल्या. धार्मिक विद्वेष वाढावा अशाच या सगळ्या घटना. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये जंगलांत लोक त्यांची गुरं चरण्यासाठी नेतात. केंद्र सरकारच्या अधिनियमानुसार, या जमिनीवर हक्क वनखात्याचा आहे. तिथे एक-दोन गुज्जर मुस्लीम कुटुंब पूर्वी वास्तव्यास होती. मात्र, काही वर्षांपासून या गुज्जर मुस्लिमांनी हिमाचल प्रदेशाबाहेरील मुसलमानांना येथे आणून वसवले. आता हे सगळे मिळून वनविभागाच्या चराऊ जमिनींवरही हक्क सांगत आहेत. कुणाही हिंदूने या जमिनीवर पशू चरायला नेले की ते मारहाण करतात. हे जे सगळे आहे, त्याने हिमाचल प्रदेशातीलच काय, पण जगभरातील कुणाही हिंदूंना आनंद वाटण्यासारखे आहे का? तर अजिबात नव्हे. कारण, येथे हिंदूंच्या जागी मुस्लीम आणि मुस्लिमांच्या जागी हिंदू असते, तर काय झाले असते? त्यामुळे हिमाचल प्रदेशातील हिंदू खडबडून जागा झाला आहे. संजोली मशीद प्रकरण तर प्रातिनिधिक आहे.
या मशिदीच्या बाबतीत दावेही विचार करण्यासारखे आहेत. वक्फ बोर्डाने ही मशिदीची जमीन त्यांच्या मालकीची आहे, असे सांगितले. मशिदीविरोधात न्यायालयात जाणार्यांनी ही मशीद १९६० साली बांधली होती आणि ती एकमजली होती. पण, ती आता पाचमजली झाली आहे, असे सांगितले तर तिथल्या मौलवीने सांगितले की, ही मशीद १९४७ सालापासून आहे. यावर काही लोकांचे म्हणणे असे की, नशीब १९४७ सालापासून आहे, असे मौलवी साहेब म्हणाले, नाही तर ’कयामतसे मशीद तिथेच आहे’ असेही ते म्हणू शकतात. संजोली मशीदनंतर हिमाचल प्रदेशामध्ये अनधिकृत मशिदींविरोधात जागोजागी आंदोलने सुरू झाली.
या सगळ्या घटना पाहून कुणीही सांगेल की, हिंदूंच्या संयमाचा बांध फुटला म्हणून हे सगळे घडले. मात्र, या सगळ्या घटनेकडे तथाकथित पुरोगामी, निधर्मी, मानवतावादी, डावेबिवे कसे पाहतात? तर त्यांनी संजोली मशीद वादाला कारणीभूत काय झाले, याबद्दल दोन वेगवेगळया कथा पसरवल्या.
त्यांच्या मते, संजोली मशिदीला उगीच मध्ये घेतले गेले. हा वाद तर हिंदू-मुस्लीमही नाही. हा वाद दोन व्यक्तींमधला आहे. संजोली मशिदीचा वाद वैयक्तिक आहे असे सांगताना ते पहिली घटना सांगतात की, येथील एका हिंदू व्यक्तीने मुस्लीम स्त्री-पुरूषांना मजुरीवर कामाला ठेवले. काम करून घेतले आणि त्यांना मोबदला दिला नाही. जेव्हा मोबदला मागितला, तेव्हा मग या हिंदू व्यक्तीने त्या मुस्लिमांना हाकलवून लावले आणि वर त्यांच्याविरोधातच कांगावा गेला की, बाहेरून आलेले मुसलमान स्थानिक हिंदूंना त्रास देतात. थोडक्यात, हिंदूच दोषी असून ते मतलबी क्रूर आहेत, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न! तर दुसरी घटना पसरवली गेली की, येथील बाजारात एक मुस्लीम व्यक्ती दुकानाबाहेर मोबाईलवर बोलत होता. समोरून एक नेपाळी माणूस आला. त्याने त्या मुस्लीम व्यक्तीला हटकले.
इतकेच नव्हे, तर मुस्लीम व्यक्तीच्या कानशीलात लगावली. मग दोघांचे भांडण झाले. ते सोडवण्यासाठी एक हिंदू व्यक्ती मध्ये पडली, तर हिंदू व्यक्तीचा धक्का लागून मुस्लीम व्यक्ती खाली पडली आणि तिला इजा झाली, तर लगेच हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिमांविरोधात आंदोलन सुरू केली. हिंदुत्ववादी संघटना उगीचच मुस्लिमांना लक्ष्य करीत आहेत, असे या घटनेतून ते सांगतात. अर्थात, देशाचा देदिप्यमान इतिहास पराभूत गुलामीच्या इतिहासात बदलवणारे हे सगळे भपंक लोक कितीतरी कथा रचूच शकतात; ज्यामध्ये प्रत्येक वेळी हिंदूंचीच चूक असते आणि गैरहिंदू हे सहिष्णू, चांगले, छान वगैरे वगैरे असतात. पण, आता हिंदूंना मूर्ख बनवायचे ’गेले ते दिन गेले गेले.’ हिमाचल प्रदेशातील हिंदूंनी अशा या खेाट्या कथांना भीक घातली नाही.
’मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ या न्यायाने हिंदूंनी सत्याचा मागोवा घेतला. काश्मीर, केरळ आणि प. बंगालच्या हिंदूंना जे भोगावे लागले आणि लागते, ते हिमाचल प्रदेशच्या हिंदूंना भोगावे लागू नये, म्हणून तेथील हिंदू एकवटला आणि यशस्वीही होताना दिसत आहे. हो, एक मात्र राहून गेले की, हिमाचल प्रदेशमध्ये ‘मोहब्बत की दुकान’ची सत्ता म्हणजे काँग्रेसची आहे. ज्यावेळी हिमाचल प्रदेशातील हिंदूंनी संजोली मशीद प्रकरणाविरोधात आंदोलने केली, त्यावेळी हिमाचल प्रदेशच्या सरकारने हिंदूंवर लाठीचार्ज केला. इतके सगळे घडत असताना ‘मोहब्बत की दुकान’चे आका राहुल गांधी किंवा महाराष्ट्रातले त्यांचे समविचारी उद्धव ठाकरे, शरद पवार, गेला बाजार संजय राऊत यांनी कुणीही हिमाचल प्रदेशबाबत ‘ब्र’ही उच्चारला नाही. हो, मणिपूर...मणिपूरचा त्यांचा जप सुरू आहे. ते काहीही असू दे, हिमाचल प्रदेशमध्ये तर एकच मंत्र सुरू आहे - हिमाचलने ठाना हैं, देवभूमी को बचाना हैं!