माणगांवात संकटग्रस्त कोळसुंद्यांचे दुर्मीळ दर्शन; कळपात आहेत इतके रानकुत्रे

    20-Sep-2024   
Total Views |
wild dog mangoan



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात 'संकटग्रस्त' असणाऱ्या कोळसुंद्यांचे म्हणजेच रानकुत्र्यांचे दर्शन झाले आहे (wild dog sighting in mangaon). बुधवार दि १८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील डोंगरोली गावात १० रानकुत्र्यांचा कळप पहिल्यांदाच नजरेस पडला. डोंगरोली बांबू नर्सरीच्या दया आणि आनंद पत्की या दाम्पत्याने हे कुत्रे पाहिले आणि छायाचित्रित देखील केले (wild dog sighting in mangaon). यानिमित्ताने कोकणात विस्तारणाऱ्या रानकुत्र्यांचा अधिवास हा अभ्यासाचा विषय बनला आहे. (wild dog sighting in mangaon)
 
 
रानकुत्रा या सस्तन प्राण्याचा समावेश हा 'संकटग्रस्त' जीवांच्या यादीत होतो. कोकणात या प्राण्यांना कोळसुंदा, कोळीसना, देवाचा कुत्रा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पूर्वी सह्याद्री पर्वतरांग आणि त्याला लागून असणाऱ्या कोकणातील गावांमध्ये या प्राण्याचा अधिवास समिती होता. मात्र, आता हे सस्तन प्राणी कोकणातील किनारी तालुक्यांमध्येही नजरेस पडू लागले आहेत. बुधवारी सायंकाळी ६:१५ च्या सुमारास माणगांव डोंगराली येथील दया पत्की यांना आपल्या बांबू नर्सरी समोर रस्त्यालगत रानकुत्रे दिसून आले. त्यांनी तातडीने माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना संपर्क साधला. कुवेसकर यांच्या मार्गदर्शनानुसार आनंद पत्की यांनी आपल्या फोनच्या माध्यमातून रानकुत्र्यांची छायाचित्रे टिपली. त्यानंतर रानकुत्रे लगतच्या जंगलात पळून गेले. पाहणी केली असता गवतावर रक्त आणि आतडे पडले असल्याने रानकुत्र्यांनी काहीतरी शिकार केले असल्याचे पत्की यांच्या निदर्शनास आले.
 
 

शंतनु कुवेसकर यांनी डोंगरोली गावात चौकशी केली असता सायंकाळी डोंगरोली गावातील काही बकऱ्या गायब असल्याचे कळले. प्रथम दर्शनी बिबट्यानेच बकऱ्या खाल्या असल्याचा ग्रामस्थांचा समज होता. परंतु, रानकुत्रे बकऱ्या मारत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. कुवेसकर आणि पत्की दाम्पत्याने दुसऱ्याच दिवशी सकाळी रानकुत्र्यांच्या शोधात आजुबाजुचा सर्व परिसर पिंजून काढला. आजूबाजूच्या गावातून देखील काही दिवसांपासून बकऱ्या मारल्या जात असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. येथील स्थानिकांना कोळसुंदा म्हणजेच रानकुत्र्यांबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे बिबट्या, कोल्हा किंवा इतर गावातून भटके कुत्रे येऊन बकऱ्या खाल्या असाव्यात असा समाज होत आहे. परंतु येथे हे रानकुत्रेच बकऱ्या खात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
मागील १० वर्षांमध्ये माणगांव तालुक्यातील विविध गावांमधून रानकुत्र्यांच्या मी नोंदी केल्या होत्या पण छायाचित्रित नोंद मात्र मिळत नव्हती, अशी माहिती शंतनु कुवेसकर यांनी दिली. डोंगरोली शेजारील गोवेले गावात देखील रानकुत्र्यांचे फार दुर्मिळ दर्शन होते. रायगड जिल्ह्यात रोहा, तळा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि माणगांव परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये रानकुत्र्यांचा वावर वाढला आहे. जुनी जाणकार लोकं सोडली असता स्थानिकांना रानकुत्र्यांबद्दल फारशी माहिती व जनजागृती नसल्यामुळे, कोल्हा किंवा भटका कुत्रा समजून रानकुत्र्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.असे शंतनु कुवेसकर यांनी सांगितले.
 
 
कोकणातील रानकुत्र्यांच्या विस्तारणाऱ्या अधिवासाविषयी दै. मुंबई तरुण भारतने मे महिन्यामध्ये देवरुख येथे रानकुत्रा कृती आरखडा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कोकणातील गावकरी, संशोधक आणि वन विभागाने एकत्रित येऊन रानकुत्र्यांच्या संवर्धनाविषयी मंथन केले होते. या बैठकीचे अहवाल २१ सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार आहे.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.