संगणकापासून ते अगदी भाजीपाल्यापर्यंत ऑनलाईन वस्तूंची खरेदी ही आता भारतीयांच्या सवयीचा एक अविभाज्य भाग. त्याच पठडीत पुस्तकांचीही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी-विक्री जगासह भारतातही होताना दिसते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी ‘ऑनलाईन सेल’ झळकणार असून, यादरम्यान पुस्तकांवरही मोठ्या प्रमाणात सवलती पाहायला मिळतात. त्यानिमित्ताने भारतातील ऑनलाईन पुस्तक खरेदी-विक्रीच्या वाढत्या प्रमाणाविषयी विविध पुस्तके विक्री करणारी संकेतस्थळे, काही प्रकाशन संस्था आणि वाचक यांच्या प्रतिक्रियांचा घेतलेला हा कानोसा...
ऑनलाईन माध्यमांमुळे
पुस्तके लवकर उपलब्ध
आमच्या संकेतस्थळावर विविध विषयांवरील लाखोंच्या घरात पुस्तके उपलब्ध आहेत आणि त्या पुस्तकांना मागणीदेखील फार मोठी आहे. ‘बूकगंगा’वर ऑनलाईन पुस्तके खरेदी करणार्या वाचकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जवळपास पाच हजारांहून अधिक प्रकाशन संस्था आणि मराठीतील तर जवळपास सर्वच प्रकाशन संस्था आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार्या पुस्तकांची संख्याही अधिक आहे. आमच्या संकेतस्थळावरील पुस्तकांच्या प्रती कमी झाल्या की आम्ही तत्काळ त्या वाचकांना उपलब्ध करून देतो. पुस्तकांची ऑनलाईन होणारी खरेदी-विक्री वाचक, प्रकाशक, विक्रेते आणि लेखक अशी सर्वांच्याच दृष्टीने सोयीची आहे. कारण, लेखकाचे एखादे पुस्तक प्रकाशित झाले, तर ते ऑनलाईन माध्यमांमुळे लवकर वाचकांपर्यंत पोहोचते आणि वाचकांनाही हवे ते पुस्तक कुठूनही खरेदी करता येते.
सुप्रिया लिमये, संचालक, बूकगंगा
ऑनलाईन पुस्तक खरेदीत दरवर्षी २५टक्के वाढ
‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ (नॅशनल बुक ट्रस्ट) ही भारत सरकारची शाखा आहे. प्रकाशन, वाचनसंस्कृती वृद्धिंगत करणे आणि उत्तमोत्तम साहित्याचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याचे काम ही संस्था करते. २०२३-२४ या वर्षात ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ने ३ हजार, ८०० पुस्तके छापली. त्यामध्ये ८०२ पुस्तके पूर्णतः नवीन आहेत. ३७० भाषांतरित आहेत. ३ हजार, १७०स्तके पुनर्मुद्रित केलेली आहेत आणि जवळपास ७०पुस्तके काही बदल करून, काही घटक नव्याने समाविष्ट करून पुनर्मुद्रित केलेली आहेत. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ ई-पुस्तक आणि ऑनलाईन पुस्तक खरेदी करणे अशा दोन्ही सोयी वाचकांना उपलब्ध करून देते. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ची ई-पुस्तकांची संख्या ३५० च्या आसपास आहे. पण, आमच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पुस्तक खरेदी करणार्यांची संख्या मात्र खूप मोठी आहे आणि गेल्या दोन वर्षांत आम्ही केलेल्या निरीक्षणानुसार, ऑनलाईन पुस्तके खरेदी करणार्यांची संख्या दरवर्षी २५टक्क्यांनी वाढते आहे.
मिलिंद मराठे, अध्यक्ष, राष्ट्रीय पुस्तक न्यास
ऑनलाईन पुस्तक खरेदी-विक्री वाचनसंस्कृतीसाठी फायदेशीर
‘ग्रंथालय भारती’ ही संस्था वाचनसंस्कृती टिकून राहावी आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी कार्यरत आहे. ऑनलाईन पुस्तके मिळवणे सध्या अधिक सोयीचे झाले आहे आणि ग्रंथालयांच्या दृष्टीनेही ते फायद्याचे आहे. ग्रामीण भागात ऑनलाईन पुस्तके ही संकल्पना अजून फार मोठ्या प्रमाणात कार्यरत नाही. पण, आमच्या ग्रंथालयांमध्ये आम्ही काही ऑनलाईन पुस्तकांची सोय केलेली आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत होणे खूप गरजेचे आहे. प्रकाशकांनी वाचकांची आवड लक्षात घेऊन पुस्तके प्रकाशित केली पाहिजेत. आणि आता ऑनलाईन माध्यमे उपलब्ध आहेत. त्यामुळे ती पुस्तके अधिकाधिक प्रमाणात वाचकांपर्यंत पोहोचवता येतील, यासाठीही प्रयत्न केले पाहिजे.
अनिल पाठक, अध्यक्ष, ग्रंथालय भारती, कोकण प्रांत
ऑनलाईन पुस्तकविक्री प्रकाशकांच्या दृष्टीने सोयीचीच!
सध्या दुकानांची वाढती भाडी आणि अन्य कारणांमुळे पुस्तकविक्री करणार्या आणि खासकरून ललित साहित्याची विक्री करणार्या दुकानांची संख्या कमी होत आहे आणि वाचकांना हवी असलेली पुस्तके बर्याचदा दुकानांमध्येही उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन खरेदीचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. ही पुस्तकांची वाढती ऑनलाईन खरेदी प्रकाशकांच्या दृष्टीनेही सोयीचीच आहे. आम्ही एक प्रकाशन संस्था आणि सोबतच पुस्तकविक्रेतेसुद्धा आहोत. त्यामुळे आमची पुस्तके आमच्या दुकानांमध्येही विकली जातात. पण, अन्य ज्या प्रकाशन संस्था आहेत, त्यांना ऑनलाईन सोय उपलब्ध असल्यामुळे स्वतःच्या पुस्तकांचीसंकेतस्थळावरुन विक्री करता येते. ‘मॅजेस्टिक प्रकाशन’ संस्थेचे सुद्धा ‘मॅजेस्टिक रीडर्स डॉटकॉम’ हे ऑनलाईन पुस्तके उपलब्ध करून देणारे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरुन दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहक ऑनलाईन पुस्तके खरेदी करतात.
अशोक कोठावले, मॅजेस्टिक प्रकाशन, संचालक
ऑनलाईन पुस्तक खरेदी-विक्री वाचनसंस्कृतीसाठी फायदेशीर
‘ग्रंथालय भारती’ ही संस्था वाचनसंस्कृती टिकून राहावी आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी कार्यरत आहे. ऑनलाईन पुस्तके मिळवणे सध्या अधिक सोयीचे झाले आहे आणि ग्रंथालयांच्या दृष्टीनेही ते फायद्याचे आहे. ग्रामीण भागात ऑनलाईन पुस्तके ही संकल्पना अजून फार मोठ्या प्रमाणात कार्यरत नाही. पण, आमच्या ग्रंथालयांमध्ये आम्ही काही ऑनलाईन पुस्तकांची सोय केलेली आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत होणे खूप गरजेचे आहे. प्रकाशकांनी वाचकांची आवड लक्षात घेऊन पुस्तके प्रकाशित केली पाहिजेत. आणि आता ऑनलाईन माध्यमे उपलब्ध आहेत. त्यामुळे ती पुस्तके अधिकाधिक प्रमाणात वाचकांपर्यंत पोहोचवता येतील, यासाठीही प्रयत्न केले पाहिजे.
अनिल पाठक, अध्यक्ष, ग्रंथालय भारती, कोकण प्रांत
ऑनलाईन पुस्तक मागवणे अधिक सोयीचे
सध्या लोकांचा दिनक्रम खूप व्यस्त असतो. कामाच्या वेळा आणि इतर गोष्टींमुळे सगळ्यांनाच प्रत्यक्ष दुकानात जाऊन पुस्तक खरेदी करणे शक्य नसते आणि दुकानात गेल्यावरसुद्धा ते पुस्तक मिळेलच, याची खात्री नसते. त्यामुळे घरी बसून ऑनलाईन पुस्तक मागवणे मला अधिक सोयीचे वाटते. ऑनलाईन पुस्तकांची खरेदी सध्या वाढत आहे. माझ्या ओळखीतले तर जास्तीत जास्त वाचक सध्या ऑनलाईनच पुस्तके खरेदी करत आहेत. ऑनलाईन पुस्तके वाचकांपर्यंत अधिक जलद पोहोचतात. मला जर ऑनलाईन एखादे चांगले पुस्तक सापडले, तर मी त्याची लिंक शेअर करून माझ्या इतर वाचकमित्रांना देखील ते खरेदी करण्यास सूचवतो. अशा रितीने ऑनलाईन पुस्तके खरेदी करणारा वाचक दिवसेंदिवस वाढतच आहे.
ओमकार जाधव, पुस्तकप्रेमी आणि ऑनलाईन पुस्तक खरेदीदार
ऑनलाईन माध्यमांमुळे पुस्तक विक्रीचे प्रमाण वाढले
जवळपास सर्वच प्रकाशन संस्था ‘अक्षरधारा’सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि २५ हजारांहून अधिक पुस्तके ‘अक्षरधारा’वर आजघडीला उपलब्ध आहेत. दररोज १००च्या आसपास पुस्तके ‘अक्षरधारा’वर खरेदी केली जातात. वाचकांना पुस्तके मिळवण्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागायचे ते ऑनलाईन माध्यमांमुळे कमी झाले आहेत. आता राहत्या घरातून पुस्तके मागवता येतात आणि परदेशात राहणार्या व्यक्तीलासुद्धा भेट म्हणून ऑनलाईन पुस्तके पाठवता येतात. आम्ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांवर त्याची जाहिरात करतो. वाचकांना अधिक पुस्तके खरेदी करता यावी, म्हणून त्यावर सवलतही देतो. लेखकांच्या प्रत्यक्ष स्वाक्षरीसह काही पुस्तकांच्या ठराविक प्रती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रमही आम्ही केलेला आहे. पूर्वीच्या काळी एखाद्या लेखकाच्या पुस्तकाची एखाद्या आवृत्तीच्या विक्रीला खूप वर्षे लागायची. पण, आता ऑनलाईन माध्यमांमुळे विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सण-उत्सवांच्या काळात तर पुस्तकांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी केली जाते.
रमेश राठिवडेकर, मालक, अक्षरधारा
लेखिका - दिपाली कानसे