सिव्हीलच्या डायलिसिस सेंटरमध्ये सहा महिन्यात १००० सेशन !
19-Sep-2024
Total Views |
ठाणे,दि.१९ : प्रतिनिधी : (Thane Civil Hospital) ठाणे सिव्हील रुग्णालय मूत्रपिंड (किडनी) रुग्णांसाठी आधारवड ठरताना दिसून येत आहे. सिव्हील रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या सहा महिन्यात रुग्णांचे एक हजार सेशन्स पूर्ण झाली आहेत. तरी सध्या दोन सत्रात सुरू झालेल्या या डायलिसिस सेंटरचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचे नैसर्गिक कार्य किडनीमार्फत होत असते त्यामुळे मनुष्यांसाठी किडनी खूप महत्त्वाचे कार्य करते. मात्र, वयोमानानुसार अथवा आजारामुळे किडनीची प्रक्रिया मंदावल्याने मूत्रपिंडाचे विकार जडून डायलिसिस करावे लागते. सर्वसामान्य रुग्णांना नियमित डायलिसिस करण्याचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. सुसज्ज असणाऱ्या डायलिसिस सेंटर मध्ये दर दिवशी रुग्णांवर उपचार होत आहेत. गेल्या सहा महिन्यात एक हजार डायलिसिस सेशन्स पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
सिव्हीलमधील डायलिसिस सेंटरमध्ये एकूण १४ मशीन असून, एका सत्रात नऊ रुग्ण उपचार घेऊ शकतात. रुग्णांची संख्या वाढली तर उर्वरित मशीन उपयोगात आणल्या जाणार आहेत. अद्ययावत ठेवलेले डायलिसिस सेंटर पुढील टप्प्यात दोन ते तीन सत्रात सुरू ठेवले जाणार आहे.
रक्तामध्ये जे दूषित पदार्थ साठून राहतात ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे डायलिसिस होय. आपली किडनी हेच काम नैसर्गिकरित्या करत असते. किडनी जेव्हा रक्त शुद्धीकरणाचे काम थांबवते त्यावेळी डायलिसिसची आवश्यकता भासते. डायलिसिस सेंटरमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. या सेंटरचा उपयोग जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हाच जिल्हा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.