दोडामार्गचा निसर्ग संशोधक

    18-Sep-2024   
Total Views |
vishal gopal sadekar


सिंधुदुर्गातून दुसर्‍यांदा शोधलेल्या ‘मायरिस्टिका स्वॅम्प’ या दुर्मीळ जंगलाचा शोधकर्ता विशाल गोपाळ सडेकर याच्याविषयी...

बालपणी निसर्गाच्या सहवासात राहूनही या मुलाची निसर्गासोबत गट्टी जमली नाही. मात्र, निसर्गाने जन्मतःच या मुलाभोवती आपले पाश गुंडाळले होते. त्यामुळे कालांतराने हा मुलगा वन्यजीव संशोधनाचा पाईक बनला. ग्रामीण भागात शिकून आणि त्याच मातीत राहून वन्यजीव क्षेत्रात करिअर करता येते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे दोडामार्गचा विशाल गोपाळ सडेकर....

विशालचा जन्म दि. 15 फेब्रुवारी 1996 रोजी दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे या गावात झाला. वडील गोपाळ सडेकर हे शेतकरी. सर्वसामान्य कोकणी माणसाप्रमाणे शेती आणि बागायती हेच उत्पन्नाचे मूळ साधन. दोडामार्गसारख्या जैवविविधतेच्या खाणीतच विशालचा जन्म झाल्याने जंगल हे त्याच्या पाचवीला पूजलेले होते. तिलारी धरणाच्या निर्मितीमुळे आयनोडे गाव पाण्याखाली गेले. त्यामुळे सडेकर कुटुंबीय शेजारील झरे बांबर गावात पुनर्वसित झाले. निसर्गात राहूनही विशालची निसर्गाशी काही गट्टी जमत नव्हती. शालेय शिक्षण हे झरे बांबर गावात झाले. पुढे विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे दोडामार्गात पार पडले. कुटुंब शेती करत असल्याने विशालचा पुढील शिक्षणाकडील ओढा हा शेतीविषयकच होता. मात्र, जंगल हे पाचवीलाच पूजले असल्याने जंगलाने त्याला जणू काही आपला वाटाड्या म्हणूनच निवडले होते. दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘वनशास्त्र’ पदवीच्या अभ्यासक्रमासाठी तो पात्र झाला आणि पुढील चार वर्षे जंगलाने त्याला आपल्या कवेत सामावून घेतले. या शिक्षणादरम्यान विशालची खर्‍या अर्थाने जंगलाशी गट्टी जमली. जंगल फिरुन त्यामधील बारकावे टिपण्याची संधी त्याला याच शिक्षणादरम्यान मिळाली. पक्ष्यांना न्याहाळण्याची सवय लागली. शेवटच्या शैक्षणिक वर्षात विशालला मिळालेल्या एका संधीमुळे त्याच्या आवडी-निवडीला कलाटणी मिळाली.

धनेश अभ्यासक पूजा पवार तिलारीच्या जंगलात धनेश आणि इतर पक्ष्यांवर संशोधन करण्यासाठी आल्या होत्या. त्यांना स्थानिक माहितीगार तरुण साहाय्यकाची गरज होती. त्यावेळी विशालला ही संधी मिळाली. तिलारी खोर्‍यात बदलत्या अधिवासाचा धनेशावर आणि त्या अनुषंगाने इतर पक्ष्यांवर होणारा परिणाम अभ्यासण्याचे काम विशालने पूजा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले. या अभ्यासादरम्यान विशालचे पक्ष्यांसोबत नाते जुळले. पक्ष्याचे आवाज, वर्ण, रंग यांवरुन पक्ष्यांची ओळख कशी करावी, याची समज त्याला आली. एरव्ही बालपणी बघूनदेखील न बघितल्यासारखा केलेला पक्षी पर्यावरणीय परिसंस्थेत किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव झाली. जन्मभूमीतील पक्ष्यांची विविधता पाहून तो अचंबितही झाला आणि इतके वर्ष आपण त्याकडे दुर्लक्ष केल्याची जाणीव झाल्यावर हिरमूसला देखील. महत्त्वाचे म्हणजे वन्यजीव संशोधन म्हणजे काय आणि त्याचे गांभीर्य त्याला उमगले. या सगळ्यामुळे संशोधनाकडे त्याचा कल निर्माण झाला. तिलारीत केलेल्या पक्ष्यासंबंधीच्या संशोधनाचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला असून, विशाल या निबंधांचा सहलेखक आहे. दरम्यानच्या काळात वन्यजीव संशोधक रोहित नानिवडेकर आणि दोडामार्गात ‘वानोशी फोरेस्ट होम स्टे’ चालविणारे निसर्गप्रेमी प्रवीण देसाई यांच्यासोबत त्याची ओळख झाली.






वनशास्त्रातील पदवीच्या शिक्षणानंतर विशाल पुन्हा आपल्या जन्मभूमीत परतला. त्यावेळी त्याला ‘वानोशी फॉरेस्ट होम स्टे’सोबत काम करण्याची संधी मिळाली. प्रवीण देसाई यांच्यासोबत तो ‘नॅच्युलिस्ट’ म्हणून तो काम पाहू लागला. आलेल्या पर्यटकांना जंगलदर्शन घडवायचे, तेथील जैवविविधतेची जाणीव करुन देण्याचे काम तो करत होता. यामुळे ‘नॅच्य्रुलिस्ट’ या वन्यजीव शाखेतील करिअरच्या वाटेवरचे नवीन दालन त्याच्यासमोर खुले झाले. ‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’ने (एनसीएफ) आयोजित केलेल्या ‘नॅच्य्रुलिस्ट’ प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये तो सहभागी झाला आणि त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण मिळवले. मात्र, संशोधनाची वाट त्याला खुणावत होती. म्हणूनच रोहित नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एनसीएफ’च्या विविध शोधकार्यामध्ये तो पुढल्या काळात सहभागी झाला. कर्नाटकातून जाऊन त्याने जंगलातील बदलत्या अधिवासाचा बेडकांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास केला. तसेच कोकणात आणि घाटमाथ्यावर होणार्‍या जंगलतोडीचा तेथील सरीसृपांवर कशा पद्धतीने परिणाम होतो, याचादेखील त्याने साहाय्यक संशोधक म्हणून अभ्यास केला. तिलारीतील काजू-रबराच्या बागायतींमुळे पक्ष्यांच्या विविधतेवर कसा परिणाम होतो, हेदेखील त्याने अभ्यासले. तसेच कोकण आणि घाटमाथ्यावरील वनस्पतींचादेखील त्याने अभ्यास केला. या सर्व अभ्यासांचे शोधनिबंध लवकरच प्रकाशित होणार आहेत.


सध्या विशाल ‘एनसीएफ’ या संस्थेसोबत कोकणात अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पावर काम करत आहे. दरम्यानच्या काळात त्याने आपले पदव्युत्तर पदवीचे शिक्षणदेखील ‘संशोधन’ या विषयामधून पूर्ण केले आहे. बदलत्या अधिवासाचा सूर्यपक्ष्याच्या आहारावर होणारा परिणाम, याविषयी त्याने अभ्यास केला आहे. काही आठवड्यांपूर्वीच प्रवीण आणि शीतल देसाई यांच्यासोबत विशालचा सिंधुदुर्गातून दुसर्‍यांदा शोधलेल्या ‘मायरिस्टिका स्वॅम्प’ जंगलाविषयीचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. भविष्यात वन्यजीव संशोधन क्षेत्राला विशालसारख्या स्थानिक मातीत जन्मलेला आणि महत्त्वाचे म्हणजे, त्या मातीतच संशोधनाचे काम करु पाहणार्‍या तरुणांची नितांत गरज आहे. विशालला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.