ताईला आणि त्या वहिनीलापण खीर द्यायला हवी. त्या काही सख्ख्या पक्क्या नाहीत. पण, स्वार्थ जपण्यासाठी जोडावी लागतात नाती. तर त्या दोघींपैकी एकीलाच ती खीर मिळणार. जसे मी त्या दोघींचे नाव घेतले, तसे माझेपण नाव कोणीतरी घ्यायला हवे. खरे म्हणजे, मलाच खीर पाहिजे. म्हणूनच मी त्या दोघींची नावे घेतली. एकीचा बाप आणि एकीचा पती यांना खीर खाण्याचा अनुभव दांडगा. पण, माझ्याही वडिलांपर्यंत खिरीचा वाटा आलेलाच होता. मग माझे नाव का कोणी घेत नाही? असे बोलून तिने सावध पवित्रा घेतला. आता कोणीतरी म्हणेल की, पण तिला खीर मिळावी म्हणून कोणीही तिचे नाव घेतले नाही. दुसरीकडे तिने ज्या दोन महिलांना खीर मिळावी, यासाठी विधान केले होते, त्यांच्याबाबत समाज म्हणत होता, आधीच खीर खाल्लेल्या किंवा खिरीतला बेदाणा तूप-दूध ओरपलेल्या घरातल्या बायांनाच खीर द्यायची का? ज्यांच्या सात पिढ्यांमध्ये खीर कोणी चाखली नाही किंवा कधी म्हणून पाहाता आली नाही, अशा गुणवान कर्तृत्ववान लोकांपर्यंत आता खीर पोहोचली पाहिजे. याच साध्या लोकांनी चूल पेटवण्यापासून खीर बनवण्याचे काम निस्वार्थीपणे केले होते. खरे तर, खीर त्यांच्याच हक्काची. ती त्यांनाच मिळायला पाहिजे. हाच खरा सामाजिक न्याय. अमूक साहेबाची लेक म्हणून, तमूक साहेबाची पत्नी म्हणून त्याच घरातल्या पुरुष आणि स्त्रीलाही सगळे मिळायला पाहिजे, हा विचार म्हणजे घराणेशाही आणि सरंजामशाहीच आहे, असा प्रश्न लोक विचारू लागली. आता त्या दोघींच्या नावालाच लोक काट मारतात, तर आपले काय? दोघीच खिरीच्या दावेदार आहेत, असे आपण म्हटले खरे. पण, खरेच जर खीर त्या दोघींपैकी एकीला मिळाली, तर त्यांच्या घरातील पुरुषमंडळीच त्या खिरीवर यथेच्छ ताव मारतील. बाकी त्या घरातील महिला नावापुरत्या असतील. पण, आपल्याला काय? खिरीवर ताव मारताना कुठेतरी आपल्यालापण ते खिरीतला बेदाणातरी देतीलच. खीर नसू दे, पण खिरीचा अंश लागलेले काहीतरी मिळेल. याचसाठी केला होता अट्टहास, असा तिने विचार केला. इथेच आपली खीरकथा संपली. माझ्या खिरीच्या कथेचा संदर्भ कुठेही लावू नये. सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या असल्या, तरी आपण खिरीबद्दलच बोलतोय!
मला राजकारणात रस हाय!
"राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायला हव्यात, पण त्यात रश्मी ठाकरेंचे नाव नको. त्या जरी पतीसोबत नेहमी असल्या, तरी त्यांना राजकारणात रस नाही,” मुंबईच्या माजी महापौर किशोरीबाई पेडणेकर म्हणाल्या. ‘राजकारणात रस नाय’ म्हटल्यावर मुख्यमंत्री कशा होतील रश्मी वहिनी? पण, मग कोण होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? पेडणेकर बाय स्वतःसाठी तर म्हणत नसंल ना? त्यांचं जाऊ दे, पण रश्मी वहिनींना कशावरून राजकारणात रस नसेल? बया, तसं असलं तर मग माझं काय? नावात ‘अंधार’ हाय, पण मलापण राजकारणात चमकायचं बरं! याबाबत संजय भाऊ त्यो काय म्हणतो, ते एकदा बघायला पाहिजे. तर आम्हा दोघा भावाबहिणींची चुलत बहीण शोभावी, अशी पेडणेकर बाई. ती म्हणाली की, रश्मी वहिनीचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी नको. कारण, त्यांना राजकारणात रस नाही. एक नंबर म्हणाली पेडणेकर. मला किती म्हणजे किती राजकारणात रस हाय. ते दाखवण्यासाठी आयुष्यभर मी काय नाय केलं? राष्ट्रवादीत असताना मला वाटलं होतं, शरद पवार साहेब मला सत्तेत बसवतील. त्यामुळे त्यांना बरं वाटेल, त्यांच्या मतदारांना बरे वाटेल. तेच मी आरडून ओरडून बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या नावानं लोकांना कायबाय सांगत गेले. हिंदूंच्या देवीदेवतांची चांगली शेलकी निंदानालस्ती केली. हिंदू धर्म म्हटलं की मस्तकात तिडीक जायची. मग काय, मान कापलेल्या कोंबडीसारखी थयथयाट करायचे. पण, मला काय संधी मिळाली नाय. माझ बोलणंच फाटकं आहे. कायम ‘सुया घे, दाभण घे, मी काय सांगतो बग बाई’ अशा थाटात हेल काढत भाषण करणं म्हणजे मोठं विद्वान असतं का, असे लोक म्हणतात. आता मी पार्टीच बदलली. आली उद्धव ठाकरेंकडे. आता हायका? यांचे जुने मतदार तर देवाबिवाला मानणारे हिंदू लोक. मी वारीत गेले. चपात्या लाटल्या. देवदेव केले. भजन-कीर्तनपण केले. का तर, हिंदू मतदारांनी मला स्वीकारावं म्हणून. पण, तसलं काय होत नाय. आता महिला मुख्यमंत्र्याबाबत वर्षा गायकवाड, किशोरी पेडणेकर कायबाय म्हणाल्या. पण, पेडणेकरबाई काखेत कळसा अन् गावाला वळसा का? मुख्यमंत्रिपदासाठी माझं नाव घ्या की! मला राजकारणात रस हाय.
9594969638