"राहूल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जीभेला..."; खासदार अनिल बोंडेंची राहुल गांधींवर टीका
18-Sep-2024
Total Views |
मुंबई : राहूल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जीभेला चटके द्यायला हवेत, अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी राहूल गांधींची जीभ छाटणाऱ्याला माझ्यावतीने ११ लाखांचं बक्षीस देईल, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. याबद्दल बोलताना आता अनिल बोंडेंनी टीका केली आहे.
अनिल बोंडे म्हणाले की, "जीभ छाटण्याची भाषा योग्य नाही. पंरतू, राहूल गांधी जे आरक्षणासंदर्भात बोलले ते भयानक आहे. त्यामुळे जर असं कुणी विपरित बोलत असल्यास त्याची जीभ छाटू नये पण जीभेला चटके मात्र दिले पाहिजे. राहूल गांधी असो, ज्ञानेश महाराव असो, श्याम मानव असोत किंवा भारतातील बहुजन समाजाला जे जे दुखावतात त्या लोकांना कमीतकमी जाणीव करून द्यायला हवी. त्यामुळे जीभ छाटू नये पण जीभेला चटके द्यायला हवेत," असे ते म्हणाले.
राहूल गांधींनी अमेरिका दौऱ्यात आरक्षण रद्द करण्याबाबत भाष्य केलं होतं. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात आली. यातूनच संजय गायकवाड यांनी राहूल गांधींचा समाचार घेतला होता त्यानंतर आता अनिल बोंडे यांनी राहूल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.