औषधनिर्माणशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवणार्या डॉ. साधना साठ्ये. महाराष्ट्र ‘अॅकॅडमी ऑफ सायन्स’ने त्यांना ‘फेलो’ म्हणून गौरवले. त्यांच्या कर्तृत्वाचा इथे मागोवा घेतला आहे.
औषधनिर्माणशास्त्र आणि विष विज्ञान क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून गेली 27 वर्षे , डॉ. साधना साठ्ये कार्यरत आहेत. सध्या त्या ‘रासायनिक तंत्रज्ञान संस्था’ मध्ये प्राध्यापक आहेत. डॉ. साधना साठये यांनी मधुमेहाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, आणि अत्यंत जटिल अशा मेंदूच्या व्याधी यांच्यावर संशोधन केले आहे. मधुमेहामुळे होणारा मोतिबिंदू कमी, किंवा नाहीसा व्हावा यावर त्यांनी औषधोपचार शोधला आहे. मोतिबिंदूवर होणारी शस्त्रक्रिया यामुळे टळू शकेल, आणि त्याचा फायदा समजाला होईल.
त्यांच्या घरी रामनामाचे महात्म्य फार होते आणि आहे. रामायणातील एका प्रसंगात माता सीता लंकेतील अशोकवनात ज्या अशोक वृक्षाखाली बसल्या होत्या, त्या वृक्षाचे शास्त्रीय नाव ’सराका अशोका’. आयुर्वेदामध्ये मधुमेहावर गुणकारी असे याचे वर्णन केले आहे. या वृक्षाच्या फुलांचा अर्क काढून, त्यापासून साधना यांनी डोळ्यांमध्ये घालायचे औषध निर्माण केले. त्या औषधाचे पेटंट डॉ. साधना साठ्ये यांच्या नावावर आहे. कोविड काळात कोरोना होऊ नये, म्हणून लस शोधण्यात आली. डॉ. साधना यांनीही कोरोनावर उपचार म्हणून औषध शोधून काढले. त्या संशोधनासाठी त्यांना केंद्र सरकारकडून साहाय्यता प्राप्त झाली. या औषधाचे पेटेंट त्यांच्या आणि त्यांच्या साहाय्यकांच्या नावावर आहे. त्यांनी भृंगराज म्हणजेच माक्याचा अर्काचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि वापर करून, अपस्मार या आजारावरही औषध निर्माण केले. हे औषध नाकाद्वारे द्यायचे असून, त्याचे पेटंट साधना यांच्या नावावर आहे.
डॉ. साधना साठ्ये माहेरच्या साधना भागवत. भागवत कुटुंब मुळचे संगमेश्वरजवळील सरंध गावचे. मात्र काही पिढ्यांपूर्वी भागवत कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. वैजनाथ भागवत अणि निर्मला भागवत या दाम्पत्याला दोन अपत्ये. त्यांपैकी एक साधना. साधना या जात्याच हुशार. त्यातच घरात आर्थिक आणि संस्काराचीही श्रीमंती. वैजनाथ हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. भागवतांचे अख्खे कुटुंबच संघ विचारांचे. वैजनाथ दैनंदिन जीवनातून साधना यांना शिकवत असत की, जे काही काम करायचे ते निष्ठापूर्वक करणे, जे काही काम कराल, त्याचा उपयोग समाजाला, देशाला व्हायला हवा. साधना यांचे बाबा साधनाला सांगत की, तुझी संपत्ती चोरीला जाऊ शकते, पण तुझा मेंदू कोणी चोरू शकत नाही. तर त्या मेंदूची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न कर.
आयुष्यभर साधना यांनी मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी ज्ञानसाधना केली. त्यांच्या घरात धार्मिक वातावरण. रामरक्षा स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष यांचे पठण नित्यनियमाने होई. साधना म्हणतात, त्यातूनच त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत झाली. पठणाची आवड निर्माण झाली. वैजनाथ मुलांना वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रकल्पाला आवर्जून नेत असत. घरी सातत्याने संघ स्वयंसेवक, प्रचारक येत. त्यांच्या निस्वार्थी देशप्रेमाविषयी वैजनाथ मुलांशी चर्चा करत. त्यातूनच आपण जे काही करू, त्यात देशहित असलेच पाहिजे, हा बाणा त्यांच्यात रूजला. त्या बालमोहन शाळेच्या विद्यार्थिनी. प्राचार्य दादासाहेब रेगे आणि पुढे महाविद्यालयात डॉ. आर. डी. कुलकर्णी यांच्यामुळे साधना यांना खूप काही शिकता आले.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्या वक्ता म्हणून सहभागी झाल्या. त्यांचे 120 पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्या केवळ शिक्षणक्षेत्राशी संबंधित नसून, औषधनिर्मिती उद्योगांना औषधाच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करतात. जगभरातील विद्यापीठात फार्माक्षेत्रातील शिक्षकांच्या प्रशिक्षक म्हणूनही त्या कार्यरत आहेत. आयुष्यातल्या मार्गदर्शक घटनेबद्दल सांगताना साधना सांगतात, 70चे दशक होते. त्या बॅडमिंटन खेळत असत.
आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा खेळत असताना उपांत्यपूर्व फेरीमध्येच पराभूत झाल्या. मात्र, घरी सांगताना त्या म्हणाल्या की, त्या उपांत्य फेरीला पराभूत झाल्या. मात्र दोन-तीन दिवसांनी या सामन्याबदद्ल वर्तमानपत्रात बातमी आली. त्यात साधना भागवत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या, ही बातमी साग्रसंगीत लिहून आली होती. वैजनाथ यांनी साधना यांना ती बातमी वाचायला दिली, आणि म्हणाले आयुष्यात काहीही झाले, तरी खोटे बोलू नये. साधनाला स्पर्धा हरण्यापेक्षाही आपण खोटे बोललो, यामुळे बाबा दुःखी झाले, हे खूप जिव्हारी लागले. तेव्हापासून त्यांनी काहीही झाले तरी, सत्याची आणि न्यायाची कास सोडली नाही. याचाच उपयोग त्यांना औषधनिर्मिती संशोधनातही झाला. प्रचंड निष्ठा आणि कष्ट ओतून त्यांनी संशोधन केले. आलेले परिणाम सत्य स्वरूपात समाजासमोर अधोरेखित केले.
दहावी आणि बारावी इयत्तेमध्येही गुणवत्ता यादीत आलेल्या साधना यांनी, पुढे कढीपत्त्याचा उपयोग यकृतदाह थांबवण्यासाठी या विषयावर ‘पीएचडी’ केली. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात उपयोगी पडतील, अशी औषधनिर्मिती करणे, कोणत्याही आजारांवर साधेसाधे घरगुती उपचार करणे महत्त्वाचे, तसेच दैनंदिन खाद्यसंस्कृतीतून पोषणशक्ती वाढवणे, विविध आजारांवर औषधांचा भडिमार करण्यापेक्षा जीवनशैली बदलवणे, याविषयी त्या जनसामान्यांमध्ये जागृती करतात. डॉ. साधना साठ्ये आयसीटीच्या वुमेन सेल्सच्या अध्यक्ष आहेत, ‘अॅनिमल एथिक्स कमिटी’च्या पदाधिकारी असून ‘अॅडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड काऊंसिल ऑफ इंडिया’, तसेच ‘मॅस्कोट इथिक्स कमिटी’च्याही सदस्य आहेत. त्या म्हणतात की, आयुष्यात यापुढेही संशोधनाचा उपयोग समाजासाठी, देशासाठी करायचा आहे. मानवी जीवन सुलभ सुरक्षित राहील, यासाठी करायचा आहे, देशाने समाजाने खूप काही दिले ते ऋण फेडायचे आहे. तर अशा डॉ. साधना साठ्ये यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि तितकीच संवेदनशील समाजशीलता समाजासाठी प्रेरणादायी आहे.
9594969638