केरळमध्ये संसर्ग झालेल्या तरुणाचा मृत्यू; आरोग्यमंत्र्यांची माहिती
16-Sep-2024
Total Views |
त्रिवेंद्रम् : (Nipah virus) “केरळमधील मलप्पुरम् मध्ये २४ वर्षीय तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्याला निपाह विषाणूची लागण झाली होती,” अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. त्या म्हणाल्या, “मलप्पुरम् येथील एका तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय होता. दि. ९ सप्टेंबर रोजी तरुणाच्या मृत्यू झाला. त्याला निपाह विषाणू संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. मृत तरुण हा शिक्षणासाठी बंगळुरु येथे राहात होता. त्याने भेट दिलेल्या ठिकाणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.
संबंधित तरुणाने आपल्या मित्रांसह वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला होता. ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आलेल्या लोकांपैकी पाचजणांमध्ये सौम्य ताप आणि इतर लक्षणे आढळून आली. त्यानंतर त्यांचे नमुनेही चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत,” असेही आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. दरम्यान, निपाह संसर्गावर उपचार घेत असलेल्या मलप्पुरम् मधील एका मुलाचाही दि. २१ जुलै रोजी मृत्यू झाला. या वर्षात राज्यातील निपाह संसर्गाची ही पहिलीच घटना होती. सन २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये कोझिकोड जिल्ह्यात आणि २०१९ मध्ये एर्नाकुलम जिल्ह्यात निपाहचा उद्रेक दिसून आला होता.