मुष्टिसह बुद्धी अन् बळाचा स्नेहावतार

    15-Sep-2024
Total Views |

Para Olympics 2024
 
भारताचा पॅरा ऑलिम्पिक संघ घवघवीत यश घेऊन परतला आहे. सध्या बुद्धीबळ आणि मुष्टीयुद्धाचे आंतराष्ट्रीय स्पर्धांचे वारे वाहत आहेत. तसेच या दोन्ही खेळांच्या एकत्रीकरणातून चेसबॉक्सिंग नावाचा नवीन क्रीडाप्रकार आला असून, भारताची स्नेहा वायकर त्यात अव्वल आहे. स्पर्धा ते राजकारण अशा क्रीडाक्षेत्राशी निगडीत घटनांचा घेतलेला हा आढावा..
 
दिव्यांगांची जेथ प्रचिती : दि. २८ऑगस्टपासून ते दि. ८ सप्टेंबर पर्यंत पॅरिसमध्ये दिव्यांग खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अर्थात पॅरा ऑलिम्पिक, अन् तत्पूर्वी सर्वसाधारण खेळाडूंचे उन्हाळी ऑलिम्पिक, दि. २६जुलै ते दि. ११ऑगस्ट रोजी दरम्यान पार पडले. ऑगस्टमध्ये भारतीय ऑलिम्पिकचे पथक जसे भारतात परतले होते, त्यावेळेसारखे आपले पॅरा ऑलिम्पियन पथकदेखील, पॅरिसमधील स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन परतले आहे. भारताने आपल्या ऐतिहासिक पॅरिस पॅरा ऑलिम्पिक मोहिमेचा समारोप विक्रमी २९पदकांसह केला. ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. हे पथक भारतात परत आल्यावर , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवासस्थानी त्यांना भेटीचे निमंत्रण देत, या खेळाडूंशी गुरुवार, दि. ११सप्टेंबर रोजी मनमोकळा संवाद साधला होता. आपल्या पंतप्रधानांनी ‘अपंग’ऐवजी ‘दिव्यांग’ हा शब्द काही वर्षांपासून प्रचलित केला आहे. त्या दिव्यांग खेळाडूंच्या दिव्यत्वाच्या प्रचितीपुढे, सार्‍या दुनियेने मनोभावे आपले हात जोडलेले आपण पाहिले, तसेच त्यांची पाठ थोपटलेलीही पाहिली. हे पाहिले की माझ्या तोंडी बा. भ. बोरकरांचे ते शब्द आपसूकच उमटतात.
 
दिव्यत्वाची जेथ प्रचिती। तेथे कर माझे जुळती॥
 
सर्वसामान्य खेळाडूंसारखेच दिव्यांगांचेही दिव्यत्व दर्शवणारा पॅरा खेळाडूंचा चमू, या काव्यपंक्तीला खरा न्याय देत आला आहे. आता पुढील काही दिवस सगळ्याच पॅरिसवारी करुन आलेल्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन, त्यांना आर्थिक पुरस्कार देण्याचे कार्यक्रम चालूच राहतील, आणि मग लगेच पुढच्या स्पर्धांच्या तयारीत सगळे गर्क होतील. काही क्रीडाप्रकारातील संघांत नव्या खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या जातील. असे मंथन सुरु होईल, आणि एकेका स्पर्धेत संघ उतरवले जातील. २०२८ लॉस एंजल्सला पोहोचण्यास आपल्याला अजून किती अंतर कापायचे आहे, याचे मोजमाप यातून घेतले जाईल. भारताची दोन कांस्य पदके पटकावणारी नेमबाज मनू भाकर आता तीन महिने आराम घेत असली, तरी ऑक्टोबरमध्ये दिल्लीत होणार्‍या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील रायफल, पिस्तूल आणि शॉर्टगन अशा प्रकारांत आपला बाकीचा भारतीय संघ उतरणार आहे. तसेच हॉकीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लागोपाठ दुसरे कांस्य पदक मिळवलेल्या भारतीय हॉकी संघाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिली स्पर्धा खेळत आहे. पी. आर. श्रीजेश या भारताच्या गोलरक्षकाच्या निवृत्तीनंतर जबाबदारी मिळालेला सुरज करकेरा आणि कृष्णन बहादूर पाठकच्या कामगिरीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना, ’हिरो आशियाई चॅम्पिअन करंडक स्पर्धे’तील गतविजेता भारतीय संघ समाधानकारक कामगिरी करत आहे. आशियाई देशांत मलेशिया, चीन, कोरिया अशा नामांकित संघांना धूळ चारत आहे. तसेच तो आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावर मात करुन पुढील फेरीत देखील गेला आहे. चीनमधील स्पर्धेत आक्रमक युवक संघाने, मैदानी गोल करण्याचा जणू चंग बांधलेला दिसत आहे. प्रत्येक सामन्यात पाच गोलची सरासरी राखत ते असेच खेळत राहिले, तर भविष्यात इतर युरोपीय संघांच्या नाकी नऊ आणतील हे नक्की. हे भारतीय हॉकीपटू आपल्या सरपंचाच्या अर्थात ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीतच्या नेतृत्वात असेच चालत राहिले, तर ते चार वर्षांनंतर कांस्य पदकाच्या वरचे पदक नक्की मिळवतील.
 
दर चार वर्षांनी होणार्‍या या दोन्ही ऑलिम्पिकनंतर आता दर दोन वर्षांनी होणारे ४५ वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड, हंगेरी देशाची राजधानी असलेल्या बुडापेस्ट येथे दि. १०ते २३सप्टेंबर या कालावधीत सुरु आहे. सन १९९६ मध्ये बुडापेस्टने दुसर्‍या अनधिकृत बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन केल्यानंतर, हंगेरीमध्ये होणारे हे पहिले बुद्धिबळ ऑलिम्पियाड आहे. आत्ताच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या आधी २०२२ मध्ये, चेन्नईत त्याचे आयोजन करण्याचा मान भारताला मिळाला होता. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेने २०२२ रोजी ते वर्ष ‘बुद्धिबळातील स्त्रीचे वर्ष’ म्हणून घोषित केले होते. बुद्धीची देवता असलेल्या गणपतीच्या महोत्सवाच्या काळात, भरत असलेल्या यावेळच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन एरिगाईसी, विदित गुजराथी आणि पेंटाला हरिकृष्णा या बालगजाननांसमवेत, सहभागी होत असलेल्या भारतीय संघात आर प्रज्ञानंदाची बहीण आर. वैशाली, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल, द्रोणावल्ली हरिका आणि तानिया सचदेव या भारतीय ‘गौराई’ही सहभाग घेत आहेत. हे ऑलिम्पियाडचे बुद्धिबळ सर्वसाधारण बुद्धिबळाच्या डावांपेक्षा थोड भिन्न असते, जसे की, या स्पर्धेत प्रत्येक डावासाठी पहिल्या ४०चालींसाठी ९०मिनिटे असे वेळेचे बंधन असते, त्यानंतर उर्वरित डावांसाठी ३०मिनिटे प्रत्येक चाल, असे डाव खेळले जातात. राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या जाणार्‍या या बुद्धिबळातील ‘स्विस’ प्रकारच्या स्पर्धेत, खुल्या विभागात १९६ संघ आणि महिला विभागात १८४ संघ उतरत आहेत. प्रत्येक संघाला आणि खेळाडूला ऑलिम्पियाडमध्ये ११सामने खेळायला मिळतील. यातील खुल्या विभागात विजेत्या संघाला ‘हॅमिल्टन-रसेल कप’ मिळतो. महिला विभागातील विजेत्या संघाला ‘वेरा मेंचिक कप’ मिळतो. एकत्रित विजेत्या महासंघाला ‘नोना गॅप्रिंदाश्विली ट्रॉफी’ दिली जाते. प्रत्येक संघातील जोड्यांमध्ये वैयक्तिक पदकेदेखील दिली जातील. त्यात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकेही प्रदान केली जातात. असे स्वरुप असलेले हे ऑलिम्पियाड गणेशोत्सव काळात चालू आहे.
 
पॅरिसमधील दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांतील क्रीडाप्रकारात भारताने सहभाग घेतला होता. अशा या ऑलिम्पिकमध्ये, बुद्धिबळाचा समावेश एक ऑलिम्पिक क्रीडाप्रकार म्हणून कधीच नसतो. तथापि नेहमीसारखा त्यामध्ये मुष्टियुद्धाचा समावेश मात्र होता. भारताच्या दुर्दैवाने एक हरियाणाची खेळाडू पदकापासून वंचित राहिली होती. त्यामुळे जगभर ती चर्चेतही राहिली होती. तीच खेळाडू आता मुष्टियुद्धाला ठोसा मारत, हरियाणातील विधानसभा निवडणुकीत सक्रिय राजकारणात जिंकण्याच्या उद्देशाने राजकीय रिंगमध्ये उतरली आहे. तिचा ठोसा चुकवत तिला दोन हातात उचलून, खाली आपटायला आता एक ‘लेडी खली’ तयार आहे. त्या युद्धात ती ठोसे मारणार का सटकून आपटणार, हे आपल्याला पुढील महिन्यात कळेलच. राजकारणाच्या रिंगवर उतरलेल्या त्या महिला आपल्याच मैत्रिणीशी दोन हात करताना, तिसर्‍या संघातील प्रतिस्पर्ध्याला नकळत विजयाकडे घेऊन जाताना दिसू शकतात. भाजपला हरवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रितपणे इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका लढवण्याचे ठरवले असले तरी, प्रत्येक पक्षांच्या महत्त्वाकांक्षेमुळे इंडिया आघाडी एकसंध राहू शकली नाही. आता या राजकारणातील प्यादी, कोणाच्या उपयोगी पडतील, ते लवकरच आपल्याला कळणार आहे. असे हे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवापाठोपाठ येणारे हरियाणातील निवडणुकांचा खेळ आपण बघत आहोत.
 
अनोखा स्नेहावतार : तर असे हे बुद्धिबळ आणि मुष्टियुद्ध हे तसे म्हटले तर, भिन्न प्रकारचे खेळ. पण जर त्यांचा उल्लेख आपण एकत्रित केला, तर आपण त्याला इंग्लिशमध्ये ‘चेसबॉक्सिंग’ किंवा आपल्या भाषेत ‘बुद्धिबळ मुष्टियुद्ध’ असे संबोधू शकतो ना! तर होय; आतापर्यंत नसलेला जागतिक पातळीवरील एक क्रीडाप्रकार ‘बुद्धिबळ बॉक्सिंग’, आपल्या मुंबईच्या परळ या गिरणगावतील एक युवती खेळत आहे. जिचे नाव स्नेहा संजय वायकर असून, जिण्कण्यासाठी रिंगमध्ये सज्ज आहे.
 
दि. २६ जुलैला भारताच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांची मोहीम सुरू करण्यापूर्वी, स्नेहा पॅरिसमध्ये तीन दिवस आधी देशाला गौरव मिळवून देण्यासाठी एका प्रदर्शनीय स्पर्धेत जिंकून आली. दि. २३जुलै रोजी ती पॅरिसमधील पौराणिक ऑलिम्पिया हॉलमध्ये, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ सालच्या आयोजकांनी सांस्कृतिक ऑलिम्पियाडचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या, बुद्धिबळ बॉक्सिंगच्या लढतीत फ्रान्सच्या केन्झा मेगझारीशी लढून विजयी झाली होती. तिचे ते बुद्धिबळ बॉक्सिंग नावाप्रमाणेच एक अद्वितीय फ्यूजन आहे. ’चेसबॉक्सिंग’ हा जगभरात आणि भारतात लोकप्रिय होत असलेला एक खेळ आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेसह अन्य २ हजार, ५०० लोकांसमोर, आणि ४०० हून अधिक आंतरराष्ट्रीय पत्रकारांसमोर स्नेहाची मेगझारीशी लढत रंगली होती. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बुद्धिबळ+बॉक्सिंग लढतीत, स्नेहा जिंकून आली होती. याआधी तिने अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेतला असला तरी, तो खेळ अजूनही नवजात अर्भकासारखा राहिलेला आहे.
 
कोलकात्याच्या माँटो दास यांच्या कल्पनेतून अवतरलेल्या या क्रीडाप्रकारात, आज भारतभर अंदाजे तीन हजारांच्या आसपास क्रीडापटू तो खेळ खेळत आनंद घेत आहेत. कोलकात्यात मुख्य स्थापना झालेल्या संघटनेची महाराष्ट्रासहित अनेक राज्यात संघटना नावारूपास येत आहेत.
 
स्नेहाच्या बुद्धिबळ+बॉक्सिंग या जागतिक स्तरावरील क्रीडाप्रकारात, आळीपाळीने एक आड एक असे बुद्धिबळातील डाव आणि मुष्टियुद्ध खेळले जाते. तीन मिनिटांच्या बुद्धिबळाच्या डावाने या स्पर्धेला सुरुवात होते. जोपर्यंत पूर्ण मात होत नाही, तोपर्यंत दोघे खेळत राहतात. ’चेकमेट’ न मिळाल्यास, खेळाडू बॉक्सिंग फेरीत जातात, जिथे ’नॉकआऊट’द्वारे किंवा पंचमंडळी तीन आकडे मोजल्यानंतर लढत थांबवून, विजेता घोषित करु शकतात. यांपैकी काहीही न घडल्यास, बुद्धिबळ फेरी पूर्वीप्रमाणेच पुन्हा सुरू होते, ज्यामुळे खेळाडूंना एक अनोखे आव्हान मिळत असते.
 
‘बुद्धिबळ बॉक्सिंग फिट’ आणि ‘बुद्धिबळ बॉक्सिंग लाइट’ असे बुद्धिबळ+बॉक्सिंग स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचे दोन गट आहेत. ठोसे कधी व कोठे मारायचे, आणि बुद्धिबळाचे पट कधी खेळायचे याचे विशिष्ट आडाखे बांधत या खेळाची नियमावली शिस्तबद्ध आखण्यात आली आहे. स्नेहाच्या या एकाच क्रीडाप्रकारात दोन खेळ अनुभवण्यासाठी हा बुद्धीचा, ताकद आणि सहनशीलतेचा फायदा मिळवून देत असते. असा आहे हा अनोखा खेळ.
 
नेमबाजी, हॉकी, मुष्टियुद्ध अशा अनेक क्रीडाप्रकारांत पुरुषांबरोबरच महिलादेखील तेवढीच कामगिरी करत आढळून येतात. सर्वसाधारण खेळाडू असो अथवा मोजक्याच ऑलिम्पिक क्रीडाप्रकारात उतरुन नेत्रदीपक कामगिरीबद्दल शाबासकी मिळवणारे दिव्यांगपटू असो, तसेच ऑलिम्पिक क्रीडाप्रकारातील मुष्टियुद्ध असो अथवा ऑलिम्पिक क्रीडाप्रकार नसलेल्या बुद्धिबळासारख्या खेळांत प्राविण्य मिळवणार्‍या महिला असो, स्त्री-पुरुष दोघेही भारताला क्रीडाक्षेत्रात अग्रेसर करत आहेत. आता उद्या क्रिकेटचाही समावेश ऑलिम्पिक क्रीडाप्रकारात होईल, तेव्हादेखील स्त्रिया आपला प्रवेश त्यात हक्काने मिळवत नेत्रदीपक कामगिरीची ग्वाही नक्कीच देतील. तेव्हा अशा विविध क्रीडाप्रकारांत महिला चमकदार कामगिरी करत असताना, महिला क्रिकेटलाही प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ‘आशियाई क्रिकेट परिषदे’ने १९वर्षांखालील महिलांसाठी द्वैवार्षिक टी-ट्वेंटी आशिया चषक स्पर्धा सुरू करण्याची, अधिकृत घोषणा नुकतीच केली आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या त्यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. विश्वचषकापूर्वी ही एक महत्त्वाची तयारी स्पर्धा म्हणून ठेवली जाईल.
 
चला तर आपण या लेखाच्या माध्यमातून भारतीय क्रीडाविश्व जाणून घेत त्या खेळांत रममाण होण्याचा प्रयत्न करीत त्या क्रीडापटूंना प्रोत्साहित करु. राजकारणात रस असेल तर कोण कोणावर ‘चेकमेट’ करणार आहे, ते हरियाणातील निवडणुकीतून जाणून घेऊ.
 
 
इति।
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहे)
लेखक - श्रीपाद पेंडसे