राहुल गांधींच्या सहकाऱ्यांकडून पत्रकार रोहित शर्मा यांना अमेरिकेत धक्काबुक्की

बांगलादेशातील हिंदूंविषयी प्रश्न विचारल्यामुळे टीम राहुल गांधी संतप्त

    14-Sep-2024
Total Views |
 
sam pitroda
 
नवी दिल्ली, दि. १४ : विशेष प्रतिनिधी : बांगलादेशातील हिंदूंविषयी राहुल गांधी बोलणार का, असा प्रश्न सॅम पित्रोडा यांना विचारल्यामुळे राहुल गांधींच्या टीमने आपल्याला धक्काबुक्की केली; असा अतिशय गंभीर दावा  'इंडिया टुडे' या माध्यमसमुहाचे पत्रकार रोहित शर्मा यांनी केला आहे.
 
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी भारतात अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असल्याचा, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या सहकाऱ्यांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य नसल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनस्थित पुरस्कारविजेते पत्रकार रोहित शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अतिशय भयानक पद्धतीने धक्काबुक्की केल्याचे सांगितले आहे. पत्रकार शर्मा यांनी हा सर्व घटनाक्रम 'इंडिया टुडे 'आणि 'आज तक' या संकेतस्थळांवर सविस्तर लिहिला आहे.
 
पत्रकार रोहित शर्मा यांनी लिहिल्यानुसार, ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी मुलाखतीसाठी वेळ दिली होती. मुलाखत सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांचा परदेश दौरा, पंतप्रधान मोदी यांचा आगामी अमेरिका दौरा या प्रश्नांना पित्रोडा यांनी उत्तरे दिली. त्यानंतर बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराविषयी राहुल गांधी काही बोलणार का, असा प्रश्न विचारल्यावर पित्रोडा यांनी त्याविषयी राहुल गांधी हेच बोलतील; असे सांगितले. मात्र, हा प्रश्न ऐकताच राहुल गांधी यांच्या पथकातील त्यांचे सहकारी आणि समर्थक संतापले आणि त्यांनी आपला फोन हिसकावून मुलाखत डिलीट करण्याचा प्रयत्न केल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
 
काँग्रेस नेते पित्रोडा यांनी नेहमीप्रमाणेच याविषयी बेफिकीर प्रतिक्रिया दिली आहे. धक्काबुक्कीच्या या घटनेविषयी आपल्याला काहीही माहिती नाही. पत्रकार शर्मा यांनी अशी घटना सार्वजनिक करण्यापूर्वी आपल्याशी बोलायला हवे होते, असा सूर त्यांनी लावला आहे.
 
भारताच्या सुपूत्राचा अपमान – पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू – काश्मीरमधील डोडा येथील प्रचारसभेत या घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, "मोहोब्बत की दुकान चालविण्याचा दावा करणाऱ्यांनी अमेरिकेत भारताच्या सुपूत्राला धक्काबुक्की केल्याचे वृत्त आजच वाचले. संबंधित पत्रकाराने संपूर्ण घटनाक्रम कथन केला असून स्वत:ला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चॅम्पियन समजणाऱ्यांनी त्यांना क्रूर वागणूक दिल्याचे स्पष्ट झाले आहे," असा घणाघात पंतप्रधानांनी केला.