मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर सार्वजनिक बहिष्कार टाकणार
राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांचा निर्णय
14-Sep-2024
Total Views | 15
नवी दिल्ली, दि. १३ : विशेष प्रतिनिधी : "बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि आपले कर्तव्य पार पाडण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वर्तन 'लेडी मॅकबेथ'प्रमाणे असून आपण त्यांचा सार्वजनिक बहिष्कार करू," असा घणाघात प. बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, "बंगाल समाजासोबत एकजुटीने मी मुख्यमंत्र्यांवर सामाजिक बहिष्कार टाकणार असल्याचा संकल्प करतो. सामाजिक बहिष्कार म्हणजे आपण मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाही. राज्यपाल म्हणून आपली भूमिका घटनात्मक बंधनांपुरती मर्यादित असेल. कोलकाता पोलीस आयुक्तांवर म्हणजेच कोलकाता येथे गुन्हेगारी रोखण्याचे काम करणाऱ्या सर्वोच्च अधिकाऱ्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर आरोप लावण्यात आल्याचे आपल्याला खूप दुःख झाले आहे," असे राज्यपालांनी गुरुवारी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री बॅनर्जी आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा ठपका राज्यपालांनी ठेवला आहे. ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री बॅनर्जी या गृह आणि आरोग्यमंत्रीदेखील आहेत. मात्र, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्या अपयशी ठरले आहेत. आपल्या मूल्यांकनानुसार, पालक आणि समाजाच्या भावनांना आवर घालण्यात सरकार आपल्या कर्तव्यात अपयशी ठरले आहे," असेही राज्यपालांनी म्हटले आहे.
कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येनंतर बंगालमध्ये संतापाचा आगडोंब उसळला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात डॉक्टर्सनी आंदोलन सुरू केले आहे. त्याचवेळी राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.