उठा...उठा...

    10-Sep-2024   
Total Views |
sharad pawar at lalbaugcha raja


नेहमी सत्य बोलावे? मीसुद्धा सत्यच बोलतो. पण, माझे सत्य म्हणजे सत्तेत येण्यासाठी जे काही करावे लागते, तेच सत्य आहे. लोकांचे मला काय करायचे आहे? पडू देत तिकडे. जरा पावसात भिजले आणि शेतीला भाव मिळत नाही म्हटले की, जनता गपगुमान मागे येते. तर लोकहो, मला सत्य गवसले आहे. कसे म्हणजे? मी देवाचा बाप आहे? मागेच म्हटले होते नाही का? मला सत्य काय सापडले आहे. तर आपण जे बोलतो ते थोडी करायचे असते? महाराष्ट्रातला मराठी माणूस भोळा आहे. या भोळ्या माणसाला वेड्यात काढणे म्हणजे चुटकी वाजवण्याइतके सोपे आहे. आपण गावरान रांगडा गडी आहोत. आपणच काय ते शेतीभातीत रमतो. गावची भाषा बोलतो. हे दाखवायला काय पैसे लागतात का? तर तसे वागण्याबोलण्याचा आव आणायचा. उठसूट म्हणायचे, शेतीला भाव मिळत नाही. अमूकच झाले, तमूकच झाले. आम्ही असतो तर? आम्ही आलो तर हे करू, ते करू. हे असे बोलायला कोणाचे काय जाते? तसेच हिंदू साथ देत नसतील तर, मुस्लिमांना चुचकारायचे. ही सगळी सत्ये मला गवसली आहेत. या सत्यांचा मी सत्तेसाठी वापर करतो. आता हेच बघा ना, माझ्याकडे लोक आले (तेच लोक ज्यांच्या इफ्तार पार्ट्यांना मी जोषात जातो) तर मी त्यांना म्हणालो, ’वक्फ संशोधक विधेयक कोणत्याही परिस्थितीत पारित होऊ देणार नाही.’ दुसरीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो. इथून मुस्लिमांना खूश करायचे, तिथे गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन धार्मिक हिंदूंच्या मनात सहानुभूती निर्माण होईल, असे करायचे. सोपे आहे का? पण, सत्तेसाठी आत्मा-स्वतःची वैयक्तिक मते मेली तरी चालेल, शो मस्ट गो ऑन! तर माझे आवाहन आहे की, माझ्या सोबत्यांना, उठा उठा, महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याची वेळ झाली. कधी पावसात भिजणे, कधी बॉम्बस्फोटात मुंबई होरपळली असताना 12 ऐवजी मुद्दाम 13 बॉम्बस्फोट सांगणे, भरीस भर मराठा, ओबीसी, मागासवर्गीय जातीपाती शोधून काय समस्या आहेत त्यात भांडणे लावणे या सगळ्याची वेळ झाली. उठा उठा. अरे उठा उठा म्हटले, तर वांद्—याचा आमचा पुतण्याच आशेने पाहतोय. नाही नाही, आशेने पाहू नको बरं. कल्पवृक्ष केवळ माझ्या कन्येसाठी! माझी हुशार, कर्तृत्ववान लेक. एकरात कोटी रुपयाची वांगी लावणे सोपे असते का राव? उठा उठा, कन्येसाठी कल्पवृक्ष पुन्हा लावण्याची वेळ झाली!

‘नो एन्ट्री’ची अ‍ॅक्शन

"रोहिंग्या मुसलमान आणि बाहेरच्या फेरीवाल्यांना गावात फिरण्याला, व्यवसाय करण्याला मनाई आहे. असे जर कोणी भेटले तर त्याच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होईल,” असे फलक उत्तराखंडच्या रूद्रप्रयाग जिल्ह्यातील अनेक गावांबाहेर नुकतेच झळकले. गावकर्‍यांनी मिळून तो निर्णय घेतला होता. मात्र, गावकर्‍यांनी फलक लावल्यानंतर तेच ते विचारवंत एकवटले आणि त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना साईन बोर्डविरोधात पत्र लिहिले. अर्थात, संविधानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, भारतीय नागरिकांना आणि त्यात फेरीवालेही आले, त्यांना देशातील कोणत्याही भागात जाण्याचा, राहाण्याचा, उद्योगधंदे करण्याचा हक्क आहे. पण, नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर काय दिसते? तर प्रत्येक नागरिकाला त्याची सुरक्षा करण्याचा अधिकार आहे. उत्तराखंडमध्ये लागलेल्या साईन बोर्डवर रोहिंग्या मुसलमानांना प्रवेश वर्जित केला होता. ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्यही आहेच. तसेच ज्या गावात हे साईन बोर्ड लागले, त्या गावातल्यांना काही ना काही वाईट अनुभव आलाच असेल. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’च्या घटना घडल्याच असतील. त्यामुळेच तर साईन बोर्डचे समर्थन करताना खुद्द उत्तराखंडचे गावकरी म्हणतात की, “गावातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर जातात. दिवसभर घरातील वृद्ध आणि महिला, बालक घरात असतात. असे दिसून आले आहे की, गावाबाहेरील लोक गावात येऊन महिलांना, मुलींना फूस लावून पळवून नेत आहेत. तसेच गावातील देऊळामधील वस्तूंचीही चोरी झालेली आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला.” असो. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये अचानक काही जिल्ह्यांमध्ये मूळच्या हिंदूंची संख्या कमी झाली असून, मुस्लिमांची संख्या वाढली आहे, असे आढळून आले. असे अचानक कसे काय होऊ शकते? अचानक संख्येने वाढलेले लोक कोण याचा तपास करण्यासाठी उत्तराखंडमध्ये सरकारने नागरिकांचे ‘वेरिफिकेशन अभियान’ सुरू केले. एकंदर काय, उत्तराखंडमध्ये सरकार आणि जनताही धर्मसंस्कृती जपण्यासाठी आणि घुसखोरांना धडा शिकवण्यासाठी ‘अ‍ॅक्शन मोड’वर आहे.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.